जॉनी आणि त्याची आई एका रविवारी सकाळी त्यांच्या बागेत लावलेली भाजी तोडायला गेले. झाडावर लागलेले लालबुंद टोमॅटो बघून जॉनी खूश झाला आणि आईला म्हणाला, ‘‘मी हे टोमॅटो तोडतो. मग तू मला त्याचे सूप बनवून दे.’’
आई म्हणाली, ‘‘मलापण तुझ्यासारखे टोमॅटो खूपच आवडतात; पण गंमत म्हणजे- तुझ्याएवढी असताना मी टोमॅटो बघितलासुद्धा नव्हता. थांब, मी तुला त्याची गोष्टच सांगते ना!’’ असे म्हणून आई पुढे सांगायला लागली.
‘‘लहानपणी आम्ही शेतावर रहात होतो. त्या वेळी शहरात राहणारा आमचा एक नातेवाईक नेहमी घरी यायचा. तो आमच्याशी खूप गप्पा मारायचा आणि शहरातल्या गमती सांगायचा. त्यामुळे आम्ही सगळे त्याची वाट बघत असायचो. तो एका शेतावरच्या झाडांच्या फांद्या, लहान रोपे, बिया असे गोळा करायचा आणि दुसऱ्या शेतावर द्यायचा.
एकदा आमच्या घराच्या कुंपणाजवळ एक झाड उगवलं होतं. त्या झाडाला छोटी छोटी पिवळट रंगाची फुले लागली होती. हळूहळू त्या फुलांवर हिरवी फळे आली. ती मोठी व्हायला लागली तसा त्यांचा रंग बदलून ती लालभडक झाली. मला ती सुंदर दिसणारी फळे खाऊन बघायची इच्छा होत होती. ती कडू असतील का? ती खाल्ल्यावर आपल्याला काही होईल का? असे एक ना अनेक विचार मनात आल्यामुळे मी ती खाल्ली नाहीत.
मग मी तुझ्या आजोबांना ती लाल फळे दाखवली आणि विचारलं, ‘‘आपण खाऊन बघूया का कशी लागतात ही फळं?’’
त्यावर ते म्हणाले, ‘‘ती फळे विषारी असतील. उपटून टाक ते झाड.’’
ते ऐकून मी खूप खट्ट झाले. मला ते झाड आणि त्यावरची लालचुटूक फळं खूपच आवडली होती, त्यामुळे मी काही ते झाड उपटले नाही. एके दिवशी मला त्या झाडावर अर्धवट खाल्लेली एक-दोन फळे दिसली आणि माझ्या लक्षात आलं की, पक्षी न घाबरता ती फळे खात आहेत. त्यांना काही झालं नाही म्हणजे ती फळे विषारी नसणार; पण तरीही ती फळे खाऊन बघायचं मला धाडस झालं नाही.
एके दिवशी शहरातला तो नातेवाईक आला असताना त्याने कुंपणाजवळचं ते लाल फळांनी लगडलेलं झाड बघितलं आणि तो म्हणाला, ‘‘काय सुंदर टोमॅटो लागले आहेत. झाडावरून तोडलेले ताजे ताजे टोमॅटो खूप छान लागतील.’’ असे म्हणून त्याने त्यातली दोन-तीन फळे तोडली आणि घरात येऊन त्याच्या चकत्या कापायला सांगितल्या. प्रथम आम्ही त्या फळाच्या चकत्या खायला तयार नव्हतो, पण तो म्हणाला, ‘‘हे टोमॅटो आहेत, विषारी फळ नाही. आम्ही ते रोज खातो.’’
हे बोलणे ऐकल्यावर आम्ही सर्वानी त्या चकत्या खाऊन बघितल्या आणि त्याची आंबट-गोड अशी चव आम्हाला खूपच आवडली. त्या लाल फळाला टोमॅटो म्हणतात हेही आम्हाला नव्यानं कळलं. त्या दिवशी मी पहिल्यांदा टोमॅटो खाल्ला. आजूबाजूच्या शेतावरच्या माझ्या मत्रिणींना त्या लाल फळांबद्दल कळलं आणि ते सगळे जण टोमॅटोचं झाड बघायला आणि त्याची चव चाखायला आमच्या शेतावर आले.
काही दिवसांनी तुझ्या आजोबांनी झाडावरची दोन-चार फळे वाळवून त्यातले बी काढून ठेवले. मी बागेत वाफा करून त्यात ते बी लावले. त्यातून चांगली दहा-बारा रोपं तयार झाली. मग मी ती नीट लावली. त्यांची नीट काळजी घेऊ लागले. काही दिवसांनी त्यावर पिवळट फुले आली. त्यावर हिरवी फळे धरली आणि ती मोठी झाल्यावर लालचुटूक झाली. झाडे मोठी झाल्यावर त्याला आधाराला काठय़ा लावल्या. एकेका झाडावर दहा-बारा टोमॅटो लागलेले बघून मी अगदी खूश झाले. तेव्हापासून मी घराशेजारच्या बागेत नेहमी टोमॅटोची रोपं लावते. बागेतल्या टोमॅटोपासून सूप, सलाड, भाजी, भरले टोमॅटो असे निरनिराळे पदार्थ बनवते व माझ्या मत्रिणींना खाऊ घालते.
आपल्या आईकडून टोमॅटोची ही गोष्ट ऐकल्यावर जॉनी खूप हसला.
मृणाल तुळपुळे – mrunal mrinaltul@hotmail.com