मुलांनो,  तुम्हाला माहिती आहे का, आपण नवरात्रौत्सव का साजरा करतो? केवळ देवीची पुजा हाच  यामागचा उद्देश नाही, तर तर हा जागर आहे निर्मितीशक्तीचा. आश्विन महिना वैभवसंपन्न महिना आहे. शेतात धान्य तयार होऊन ते कापणीयोग्य झालेले असते. मनासारखं पीक आलं की केलेल्या कष्टाचं फळ मिळाल्याचा आनंद सर्व शेतकऱ्यांना होत असतो. शेतकऱ्यांचे हे सुगीचे दिवस असतात. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आपले सर्व सण-उत्सवसुद्धा कृषी संस्कृतीला अनुसरून निसर्गाला पूरक असतात.

आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रारंभ होत असतो. या दिवशी घटस्थापना होते. चौरंगावर मातीचा घट ठेवतात. यामध्ये माती घालून, पाणी घालून ओल्या मातीत गहू किंवा तांदूळ किंवा कोणतेही धान्य पेरतात आणि या बियाणे पेरलेल्या घटाची पूजा करतात.

‘नवरात्र’ या उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे आश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल नवमी या नऊ दिवसांचा हा उत्सव असतो. नवनिर्मिती करणाऱ्या सर्व संख्यांमध्ये नऊ ही संख्या सर्वात मोठी आहे. धान्य पेरल्यानंतर ते उगवायला, रोप अंकुरायलासुद्धा नऊ दिवस लागतात. म्हणून नवरात्र हा सृजनशक्तीचा नवनिर्मितीचा उत्सव आहे. जमीन नवीन धान्य देते. जे जे पेरावे ते ते तिच्यात अंकुरते. म्हणूनच जमिनीला भूमाता, भूमीदेवी असे म्हणतात. नवव्या दिवशी पेरलेले जे अंकुरते ते भूमातेचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो. प्रतिपदेला केलेली घटस्थापना नवमीला घट उत्थापन करून म्हणजेच नवरात्री समाप्ती करून संपन्न करतात. दशमीला विजयोत्सव म्हणून विजयादशमी ‘दसरा’ हा सण साजरा करतात.

घटस्थापनेच्या वेळी चौरंगाच्या बाजूला घटाच्या वर किंवा बाजूला फुलांची माळ बांधतात. फुले म्हणजे पावित्र्य, प्रसन्नता, निरागसता आणि संपन्नता. दररोज ही फुलांची माळही वाढत्या फुलांची बांधतात. आपल्या सर्वाच्या जीवनात उत्तरोत्तर समृद्धी-संपन्नता वाढत राहो, हा त्यामागचा हेतू असतो.

घटाच्या दुसऱ्या बाजूला अखंड नंदादीप तेवत ठेवतात. दीप म्हणजे दिवा. अंधार नाहीसा करून आजूबाजूचा भाग प्रकाशित करत असतो. दिवा हे तेजाचं प्रतीक आहे. हा दिवा अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश सतत प्रज्वलित करो, ही त्यामागची भावना असते.

घटाच्या आजूबाजूला आणि चौरंगाखाली आणि सभोवती रांगोळी काढूनच मग पूजा सुरू करतात. जिथे रांगोळी असते तिथे देवदेवतांचा निवास असतो. रांगोळी दोन ठिपक्यांना जोडणारी असते. ही रांगोळी मनामनांना जोडणारी असावी, ही त्यामागची भावना. सण उत्सवाच्या निमित्ताने सगळे नातेवाईक मित्रपरिवार, हितचिंतक, शेजारीपाजारी सर्वच एकत्र येतात. यामुळे तुटलेले नात्याचे-मैत्रीचे संबंध दृढ होतात. कौटुंबिक, सामाजिक ऐक्यासाठी आणि पर्यायाने देशाच्या ऐक्यासाठी हे सण-उत्सव उपयोगी असतात.

नवरात्र हा दुर्गादेवीचा उत्सव आहे. स्त्रीमध्ये सृजनाची, नवनिर्माणाची क्षमता असते. स्त्रीच्या उदरात नऊ महिने नऊ दिवस बाळ वाढत असतं आणि नंतर ते जन्माला येतं. म्हणून नवरात्र हा उत्सव मातृत्वाचा आदर करणारा, स्त्रीचा आदर करणारा उत्सव आहे. निसर्गात असणारे सूर्य, चंद्र, नद्या, समुद्र, पर्वत, झाडे, वेली, ऊन वारा, पाऊस यांच्यामध्ये एक शक्ती आहे. तिच्यामुळेच सजीवांना जीवन जगणे शक्य असते. त्या आदिशक्तीची पूजा आपल्याकडे हजारो वर्षांपासून होत आहे. हजारो वर्षांच्या परिवर्तनाच्या या काळात त्या आदिशक्तीनेच दुष्ट अन्याय करणाऱ्या राक्षसांना ठार मारले आणि सामान्य लोकांना भयमुक्त केले. त्या आदिशक्तीलाच महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती असं म्हटलं जातं. चंडमुंड राक्षसांना मारणारी म्हणून तिला चंडिकादेवी, चामुंडादेवी म्हणतात. महिषासुर राक्षसाला मारणारी म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हणतात. तिला दुर्गा, काली, अंबा अशा अनेक नावांनी संबोधलं जातं.

आजही स्त्रियांवर अत्याचार होत आहे.  स्त्रियांचा आदर करायला हवा. दुर्गामाता दुष्ट राक्षसांना मारते. तसे आपण भ्रष्टाचार, अनीती, खोटेपणा, अन्याय यांना नाहीसं करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याचबरोबर आपल्या स्वत:मधले आळस, उद्धटपणा, मत्सर, द्वेष, राग हे दुर्गुण नाहीसे केले पाहिजेत.

नवरात्रात आपण रोज देवीची पूजा, आरती, स्तोत्रं, जप, भजन, गोंधळ, भोंडला, गरबा, दांडिया, हळदीकुंकू, सवाष्णभोजन यात गुंतलेले असतो. खीर, पुरण, पुरणपोळी वेगवेगळ्या खिरापती, अशा सर्व खाद्यपदार्थाची रेलचेल चालू असते. आबालवृद्ध देवीच्या उत्सवात रमून जात असतो. हा सर्व आनंद आपल्यासारखाच पुढच्या अनेकानेक पिढय़ांनासुद्धा घेता आला पाहिजे. म्हणून नवरात्र उत्सवाचा जल्लोश साजरा करताना सर्वानीच काही बंधनं आपण आपल्यावरच घालून घेतली पाहिजेत.

देवीच्या आरत्या, स्तोत्रं, भजन, गरबा, भोंडला, दांडियांची गाणी ध्वनिक्षेपकावरून कर्कश आवाजात न म्हणता कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच ध्वनिक्षेपकांचा वापर करावा.

गुलाल उधळून, कानठळ्या बसविणारे फटाके वाजवून, विषारी वायू आणि धूळ-धूर यांपासून श्वसनाचे विकार होतात. विषारी वायू पसरवून वायुप्रदूषण होत असतं, ते टाळावं. मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव किंवा हौदाचा वापर करावा. निर्माल्यकलशातच निर्माल्यं टाकावीत. यामुळे प्रदूषण होणार नाही.

आपले भारतीय सण-उत्सव निसर्गाविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी आहेत. सणांमधून खूप आनंद, ऊर्जा मिळत असते. रोजचा अभ्यास, शाळा, क्लास, गृहपाठ यामुळे येणारा कंटाळा आणि थकवा उत्सवामुळे नाहीसा होतो. शरीर आणि मन ताजं, टवटवीत बनतं. मग असाच आनंद आपल्या पुढच्या पिढय़ांनासुद्धा मिळायला हवा ना?

म्हणूनच पर्यावरणाचा तोल सांभाळून आपण आपल्या सगळ्या सण-उत्सवांमागचे हेतू जाणून घेऊन आनंदाने निर्मितीशक्तीचा जागर करू या.

मेधा सोमण