ही गोष्ट आहे फार फार वर्षांपूर्वीची. एका गावात  एक हुशार न्यायाधीश राहत होता. तो त्याच्या आगळ्यावेगळ्या निर्णयांसाठी प्रसिद्ध होता. हा न्यायाधीश गुंतागुंतीच्या खटल्यासंबंधीचे निर्णय घेताना त्याच्याकडे असलेल्या हत्तीची मदत घेई. आश्चर्याची गोष्ट अशी, की हत्ती कधीच कोणतीही चूक करीत bal08नाही याची सर्वाना खात्री होती.
हत्ती हा केवळ शक्तिशाली आणि मेहनती प्राणी नसून त्याला माणसाच्या मनातलंदेखील समजतं, अशी त्या गावातील लोकांची धारणा होती. कोणाचं ऐकावं किंवा कोणावर विश्वास ठेवावा, अशी द्विधा मन:स्थिती निर्माण झाल्यावर न्यायाधीश हत्तीची मदत घेत असे.
एकदा एका कुटुंबानं न्यायालयात खटला दाखल केला. त्या घरात काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. मौल्यवान वस्तू, दागिने, रोख रक्कम चोरांनी लुटून नेली होती. पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवूनही ते चोरांना पकडू शकले नव्हते. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं.
पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं. साध्या वेशातील काही माणसं गावात पाठवून त्यांच्यावर चोरांना पकडण्याची जबाबदारी सोपवली. काही दिवसांतच संशयावरून पाचजणांना अटक करण्यात आली.
संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. चोर कोण आहे हे ठरवण्याची जबाबदारी या न्यायाधीशावर आली.  न्यायनिवाडा ऐकण्यासाठी संपूर्ण गाव जमा झालं होतं. ज्यांच्या घरात चोरी झाली होती त्यांना प्रथम साक्षीसाठी बोलावण्यात आलं.
‘‘या आरोपींपकी तुम्ही कोणाला चोरी करताना पाहिलं आहे का?’’ न्यायाधीशांनी त्या घरातील जोडप्याला विचारलं.
साक्ष देण्यास आलेल्या स्त्रीने उंच, सावळ्या रंगाच्या आणि पांढऱ्या केसांच्या माणसाकडे खात्रीपूर्वक बोट दाखवलं.
‘‘आणि हादेखील!’’ असे म्हणून तिच्या नवऱ्यानं एका बुटक्या, जाडय़ा आणि छोटी दाढी असलेल्या माणसाकडे निर्देश केला.
‘‘पण मी चोरी केलेली नाही!’’ उंच माणूस हात जोडून काकुळतीनं म्हणाला.
‘‘मीही निर्दोष आहे. मीपण काहीही केलेलं नाही,’’ बुटक्या, जाडय़ा माणसानं गयावया करत म्हटलं.
न्यायाधीशानं त्या स्त्रीला विचारलं, ‘‘तुला खात्री आहे तुझ्या घरात हाच शिरला होता?’’
‘‘नक्कीच! चोरी झाल्यावर मी उजेडाच्या दिशेनं वळून पाहिलं तेव्हा मला हाच माणूस पळून जाताना दिसला.’’ स्त्रीनं ठामपणे सांगितलं.
न्यायाधीशानं स्त्रीच्या नवऱ्यालाही तोच प्रश्न पुन्हा विचारला.
‘‘मी तर याला कुठेही ओळखू शकतो. मी याला अगदी जवळून पाहिलं होतं. चोराची दाढी अगदी अशीच होती.’’
आरोपी मात्र आपण चोरी केली नसल्याचे पुन:पुन्हा न्यायाधीशांना सांगत होते. साक्ष चालू असताना न्यायाधीश दोन्ही आरोपींकडे लक्षपूर्वक पाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखत होता.
‘‘चोरी झाली त्या रात्री तुम्ही कुठे होता?’’ अशी त्यानी दोघांकडे विचारणा केली.
‘‘मला नक्की आठवत नाही, कारण त्याला काही महिने होऊन गेलेत.’’ एकानं सांगितलं.
‘‘मी कामानिमित्त गावाबाहेर होतो.’’ दुसऱ्या आरोपीनं सांगितलं.
‘‘तुम्हाला कुठे पकडण्यात आलं?’’ न्यायाधीशानं दोघांना विचारलं.
‘‘ज्या घरात चोरी झाली त्या घरांच्या आसपास फिरत असताना मला पकडलं.’’ पांढऱ्या केसांचा माणूस म्हणाला.
अशा प्रकारे न्यायाधीशानं एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती त्या दोघांवर केली. दोन्ही आरोपींची उत्तर देतानाची देहबोली आणि साक्षीदारांची साक्ष यांचा मेळ बसत नसल्यानं न्यायाधीशानं निर्णय घेण्यासाठी आपण प्रसिद्ध हत्तीला न्यायालयात पाचारण करत असल्याची घोषणा केली.
न्यायालयात शांतता पसरली. निकालाची सर्वानाच उत्सुकता होती. हत्ती योग्य निर्णय देणार याबद्दल सर्वानाच खात्री होती. पाचही आरोपी येणाऱ्या हत्तीकडे बघत होते.
न्यायाधीश हत्तीचा प्रवेश झाल्यानंतरची पाचही आरोपींची प्रतिक्रिया पाहत होता. त्याच्या लक्षात आलं की, पांढऱ्या केसांचा आणि दाढीवाला असे दोन्ही आरोपी अगदी निवांत होते. तिसऱ्या आणि चौथ्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हसू होते. पाचवा मात्र भांबावलेला, घाबरलेला दिसत होता. त्याला घाम फुटल्याचं जाणवत होतं. तो भीतीनं थरथरत असल्याचं कळत होतं.
न्यायाधीशाने सर्व आरोपींच्या कपाळाला सोंडेनं  स्पर्श करण्यास हत्तीला सांगितलं. हत्ती आपल्या धन्याच्या आज्ञेचं पालन करत होता.
हत्ती पाचव्या आरोपीजवळ पोहोचताच तो एकदम उठून उभा राहिला. न्यायालयात सर्वाचे श्वास रोखले गेले.
‘‘मी गुन्हेगार आहे. सर्व चोऱ्या मी केल्या आहेत.’’ घाबरून त्यानं गुन्हय़ाची कबुली देऊन टाकली. उर्वरित चौघांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
न्यायाधीशानं त्या जोडप्याला चुकीची साक्ष दिल्याबद्दल समज दिली.
‘‘मला योग्य निर्णय घेण्यासाठी तू मला मदत करतोस. मला तुझा अभिमान वाटतो,’’ असे म्हणून त्यानं हत्तीच्या अंगावर मायेनं हात फिरवला. न्यायाधीशाचं हत्तीवरील प्रेम पाहून सर्वानाच गहिवरून आलं.
निकालाच्या दुसऱ्या दिवशी एक तरुण मुलगा न्यायाधीशाला भेटायला आला. हत्ती गुन्हेगार कसे ओळखतो, हे समजून घ्यायची त्याला उत्सुकता होती.
‘‘जोपर्यंत लोकांचा हत्तीच्या हुशारीवर विश्वास आहे तोपर्यंत निर्दोष व्यक्तीला कधीही शासन होणार नाही आणि दोषी व्यक्ती न्यायदेवतेच्या नजरेतून कधीही सुटणार नाही.’’ न्यायाधीश हसून त्याला म्हणाला.
न्यायाधीशाचं बोलणं ऐकून मुलाला पडलेल्या कोडय़ाचं खरं उत्तर मिळालं. तो हसून न्यायाधीशाला म्हणाला, ‘‘खरा बुद्धिमान आणि चतुर कोण आहे, हे मला आज उलगडलं.’’

(चिनी लोककथेवर आधारित)
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com