मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात भाषा विकसित होण्यापूर्वी संगीत साकार झालं असा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिला आहे. आदिम काळात भोवतालच्या पशुपक्ष्यांसह निसर्गातल्या विविध आवाजांचा उच्चार करून तो व्यक्त होऊ पाहत होता. आई आपल्या तान्हुल्याशी बोलते ते त्याच्या कानावर पडणारे पहिले सांगीतिक बोल असतात असं मानलं गेलं आहे. या प्रक्रियेत सुरापेक्षा लय-तालाचं भान जास्त आधी येतं. आजही जगाच्या पाठीवर निरनिराळ्या आदिवासी समाजांमध्ये विशिष्ट ठेका धरत केली जाणारी नृत्यं तिथल्या लोकसंस्कृतीचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे स्वाभाविकपणे असा ठेका धरण्यासाठी उपयुक्त तालवाद्यांचा विकास होत गेला. आपल्याकडची हलगी, ढोलकी, ताशा, डफ, संबळ, खंजिरी, दिमडी यासारख्या परंपरागत तालवाद्यांप्रमाणेच अमेरिकन ड्रमसेट, आफ्रिकन ड्रमसेट इत्यादी तरुणाईला थिरकायला लावणाऱ्या आधुनिक पाश्चात्त्य वाद्यांचाही त्यात समावेश आहे. या वाद्यांची भूमिका साथ देण्याची असते असं समजलं जातं. पण अनेकदा त्यांच्यामुळेच संगीतात जान ओतली जाते. अशी भिन्न भिन्न प्रकारची तालवाद्यं वाजवणाऱ्या कलाकारांना चित्रपट क्षेत्रासह खुल्या मंचावर होणाऱ्या संगीताच्या भव्य कार्यक्रमांसाठीही मोठी मागणी असते. मात्र, त्यासाठी किमान पाच-पंचवीस प्रकारच्या वाद्यांवर तुमची हुकुमत असावी लागते. रत्नागिरीच्या मांडवी या निसर्गरम्य परिसरात जन्मलेल्या आणि बालपणापासूनच वडिलांचं बोट धरून इथल्या भजनी मंडळांच्या संस्कारांत वाढलेल्या विजय शिवलकर यांनी गेल्या सुमारे पाव शतकाच्या आपल्या वाटचालीत हे कसब आत्मसात केलं आहे. विविध प्रकारच्या सुमारे शंभर तालवाद्यांच्या वादनात पारंगत असलेल्या या कोकणच्या कलाकाराने केवळ या एका कलेच्या बळावर जगाची सफर केली आहे.

विजयचे (खरं तर ‘विजू’चे) वडील पांडुरंग जनार्दन शिवलकर पोस्ट खात्यात नोकरीत होते. सुमारे ४०-५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत ते पोस्टमन म्हणून काम करत. लोकांचं टपाल वाटत फिरताना त्यांच्या डोक्यात मात्र संगीत घुमत असे. भजनी मंडळं ही कोकणच्या धार्मिक-सांस्कृतिक जीवनाची पारंपरिक खासीयत. पांडुरंगरावही अशाच एका भजनी मंडळाचे क्रियाशील सदस्य. त्यावेळच्या आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम व्हायचे. शिवाय त्यांना मूर्तिकलेतही गती होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी या कला जोपासण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असे. लहानग्या विजूलाही ते भजनाच्या कार्यक्रमांना आवर्जून न्यायचे. भजन ऐकता ऐकता तो हळूहळू तिथल्या ढोलकी-तबल्यावर ठेकाही धरायला लागला आणि या वाद्यांशी त्याची गट्टी जमू लागली. अर्थात हे वाजवणं शास्त्रीय अंगाने नव्हतं. भजनी मंडळात जितपत ठेका धरला तरी मंडळी स्वर चढवत नेतात, त्यास ते पुरेसं असे. पण त्यातून त्याचं समाधान व्हायचं नाही. आपल्या मुलाला अस्सल शास्त्रीय पद्धतीचं तबलावादन यायला हवं, या इच्छेपोटी पांडुरंगरावांनी सहाव्या इयत्तेत असताना विजूला टिळक आळीतल्या माधवराव जोशी यांच्याकडे तबल्याच्या क्लासला घातलं. काही काळानंतर रत्नागिरीत नावाजलेले संगीत शिक्षक हिरेमठ सरांकडे विजूची शिकवणी सुरू झाली. तबलावादक विकास पुरंदरे आकाशवाणीत कार्यक्रमांसाठी येत असत. त्यांचंही मार्गदर्शन मिळू लागलं. त्यामुळे विजूची चांगली प्रगती होऊ लागली. रत्नागिरीचे ख्यातनाम तालवाद्यवादक कै. मारुतीराव कीर हे पांडुरंगरावांचे जुने मित्र. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत त्यावेळी दबदबा असलेले सचिनदेव बर्मन आणि त्यांचे चिरंजीव आर. डी. बर्मन यांच्याबरोबर संगीत संयोजक म्हणून काम करणाऱ्या मारुतीरावांचंही या वर्तुळात मोठं वजन. विख्यात गायिका आशा भोसले रत्नागिरीत कधी आल्या तर त्यांच्या घरी आवर्जून जात असत.

या शिदोरीच्या बळावर १९८९ मध्ये विजू मुंबईला आला. रत्नागिरीजवळच्या भाटय़े येथील स्नेहल भाटकर यांनी संगीतकार म्हणून मुंबईच्या संगीत क्षेत्रात नाव कमावलं होतं. त्यांच्याशी त्याची भेट झाली. दादरच्या पाटील मारुती मंदिरामध्ये विश्वंभर प्रासादिक मंडळातर्फे त्या काळात सप्ताह होत असे. भाटकरांनी त्याला तिथे साथसंगत करण्यासाठी बोलावलं. इथे त्याच्या वादनाला छान प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कौतुक केलं. एक दिवस विजू शिवाजी मंदिरात ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला गेला. त्या काळात किरण शेंबेकरांचा ‘झपाटा’ ऑर्केस्ट्रा लोकप्रिय होता. ऑर्केस्ट्राच्या व्यवस्थापकांना भेटून विजूने त्यांच्या कार्यक्रमात वाजवण्याची इच्छा व्यक्त केली. त्याची ऑडिशन घेण्यात आली आणि पुढच्या शोपासून या ऑर्केस्ट्रात भावगीत, चित्रपटगीतांसाठी तालवाद्यांची साथ करण्यासाठी त्याला बोलावलं गेलं. इथून रत्नागिरीच्या विजूचा ‘तालवादक विजय शिवलकर’ असा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. आणि मुंबईच्या मायानगरीचा तो अधिकृत सदस्य बनला.

या टप्प्यापर्यंतची त्यांची वाटचाल तशी जवळच्या ओळखीच्या माणसांचं बोट धरत होत गेली. पण यापुढे केवळ तेवढंच पुरेसं ठरणार नव्हतं, हे शिवलकरांच्या लक्षात आलं. त्यानंतर शिवलकरांनी तबला, पखवाज, ढोलक, खंजिरी, टाळ, माजल, डुग्गी यांसारख्या पारंपरिक वाद्यांबरोबरच निरनिराळ्या प्रकारचे ड्रमसेट वाजवण्याचा भरपूर सराव करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. आफ्रिकन ड्रमसेट आणि अमेरिकन ड्रमसेटसारख्या पाश्चात्त्य वाद्यांचाही त्यांत समावेश होता. जागतिक कीर्तीचे बासरीवादक हरीप्रसाद चौरसिया यांचे पट्टशिष्य रमाकांत पाटील यांचे भाऊ रजनीकांत पाटील यांच्याकडे त्यांनी ड्रमसेट वाजविण्याची खास शिकवणी लावली. भारतीय वाद्यांपैकीही नुसता ढोल म्हटलं तरी त्यामध्ये गुजराती, पंजाबी, उत्तर भारतीय, आपल्या महाराष्ट्रात पुणे वा नाशिकचे ढोल असे विविध प्रकार येतात, असं या तालवाद्यांचा अभ्यासपूर्वक सराव करताना शिवलकरांच्या लक्षात आलं. या सर्व तालवाद्यांवर आज त्यांनी हुकुमत मिळवली आहे. गप्पांच्या ओघात या वाद्यांचं वेगळेपण ते केवळ तोंडाने आवाज काढून छान पद्धतीने दाखवतात. यातली गमतीची गोष्ट अशी की अशा प्रकारे विविध प्रांतांचे आणि काही पाश्चात्त्य वादनप्रकार आत्मसात करत असताना शिवलकरांच्या असं लक्षात आलं की, कोकणात तालाचे प्रकार सर्वात जास्त आहेत. इथे भजनी मंडळांचे ठेके तर सोडाच; गणपती, होळी किंवा अगदी मयताच्या वेळी वाजवल्या जाणाऱ्या ताशाचासुद्धा ठेका पूर्वी वेगळा लक्षात येत असे, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. त्याचबरोबर कितीही वेगवेगळ्या प्रकारची तालवाद्यं वाजवली, तरी तबला वा पखवाज ही वाद्यं या सगळ्याचा पाया आहेत असं त्यांचं ठाम मत आहे. चांगल्या गायकाला तालाचं चांगलं ज्ञान, भान आणि शक्य तर शिक्षणही असावं लागतं. ते नसेल तर त्याच्या गाण्यामध्ये दोष येऊ शकतो. हल्ली नव्याने गायला लागणाऱ्या काही हौशी गायकांमध्ये तालाचं भान नसल्याची उणीव शिवलकरांना जाणवते. पण चांगला वादक अशा वेळी त्यांना सावरून घेत असतो. म्हणूनच काही गायक नेहमी विशिष्ट साथीदारांचाच आग्रह धरतात. त्यांचं परस्परांशी टय़ूनिंग जमलेलं असतं. शिवलकरांनी ही जबाबदारी वेळोवेळी कौशल्याने पार पाडली आहे.

भारतीय संगीत क्षेत्रातील लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर यांच्यासह अनेक नामवंत गायक-गायिकांच्या गायनाला शिवलकरांनी साथ केली आहे. गायक-संगीतकार सोनू निगम यांच्या वादकांच्या चमूमध्ये सध्या ते काम करतात. या चमूबरोबर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका, पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत जगातल्या सर्व प्रमुख देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. अशा कार्यक्रमात साथसंगत करताना किंवा एखाद्या खासगी गीत वा चित्रपट गीतासाठी वादन करताना कलाकाराकडे तालवाद्यांचं भरपूर वैविध्य उपलब्ध असावं लागतं, हे शिवलकरांना अनुभवांती लक्षात आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची शंभरपेक्षा जास्त लहान-मोठी तालवाद्यं आज त्यांच्या संग्रही आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

लताबाईंसारख्या जागतिक कीर्तीच्या गायिकेने पुण्यातील एका कार्यक्रमात दिलेली कौतुकाची दाद शिवलकरांना कायम संस्मरणीय वाटते. त्याचबरोबर २००४ मध्ये सोनू निगम यांच्याबरोबर पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना कराची शहरात त्यांच्या वाहनाच्या ताफ्याजवळ झालेला बॉम्बस्फोटही ते विसरू शकत नाहीत. त्यावेळी भारत-पाक संबंध आजच्या इतके ताणले गेलेले नव्हते. सोनू निगम यांचा संगीताचा कार्यक्रम पाकिस्तानात आयोजित करण्यात आला होता. आणि त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघही पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला होता. सर्व भारतीय कलाकार आणि क्रिकेटपटूंसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली होती. सोनू निगम यांच्या चमूसाठी बुलेटप्रूफ गाडी आणि पुढे-मागे सुरक्षा जवानांचा ताफा होता. पण कराचीत एका कार्यक्रमाला जात असताना रस्त्यात एके ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी या घटनेचा बराच बोलबाला झाला होता. काळाच्या ओघात अनेकांच्या ते विस्मृतीत गेलं असेल. पण शिवलकरांसारखे तो अनुभव प्रत्यक्ष घेतलेले कलाकार पाकिस्तानातल्या दहशतवादी कारवायांचं ते हिंस्र स्वरूप कधीच विसरू शकत नाहीत.

या क्षेत्रात काम करताना संघर्ष वा अव्यावसायिक स्पध्रेला तोंड द्यावं लागलं का, असं विचारलं असता शिवलकरांचं साधं-सोपं म्हणणं असं की, आपलं काम चांगलं असेल तर या गोष्टींचा त्रास होत नाही. गेल्या सुमारे दोन दशकांच्या काळात संगीत कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी जगातल्या बहुतेक सर्व प्रमुख देशांमध्ये पाहुणचार घेतला आहे. पण आपल्या मातीशी- रत्नभूमीशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही. त्यांचे बंधू किशोर आजही रत्नागिरीच्या मांडवी परिसरात राहतात. हे शिवलकर कुटुंबीयांचं मूळ घर आहे. वर्षांतील गणपती, शिमग्यासह सर्व प्रमुख सणांना विजय शिवलकर या घरी न चुकता जातात आणि आपल्या कलेद्वारे सेवा अर्पण करतात. इथल्या दैवताचा सप्ताह ते कधीच चुकवत नाहीत. ग्रामदैवत भरवनाथाच्या अभंगांसाठी त्यांनी प्रथमच संगीत दिग्दर्शन केलेली सीडीही प्रकाशित झाली आहे. जगाच्या पाठीवर फिरणारा हा तालवाद्याचा ‘ठेके’दार अशा प्रकारे आजही आपल्या मातीशी इमान राखून आहे.

दिनेश गुणे

dinesh.gune@expressindia.com