lr06रांगेत बसलेले अनेक चेहरे चिंताक्रांत. कोणत्या डॉक्टरला दाखवायचे, पैसे कोठे भरायचे, औषधे कोठून घ्यायची, असे कितीतरी प्रश्न. रुग्णांचे हाल आणि त्यांच्याविषयी वाटणाऱ्या काळजीपोटी रुग्णालयात येणारा प्रत्येकजण गांगरलेला असतो. मग तो सुशिक्षित असो वा अशिक्षित. अशा भेदरलेल्या अवस्थेत रुग्णांच्या नातेवाईकांना नीटपणे माहिती देणारा, आस्थेने विचारपूस करणारा कुणीतरी भेटतोच असेही नाही. ‘चांगली माणसे कुठे राहिलीत हो हल्ली?’ अशी शेरेबाजी नेहमीच ऐकू येते..
बाळासाहेब क्षीरसागर औरंगाबादच्या सेंट फ्रान्सिस शाळेत इंग्रजीचे शिक्षक. मुलांना निष्ठेने इंग्रजी शिकवणारे. त्यांच्या आई आजारी होत्या. औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात उपचारासाठी ते आईला घेऊन आले होते. तेव्हा सेवानिवृत्त झालेल्या एका गृहस्थाला प्रल्हाद पानसे ‘सेवाव्रती’ या उपक्रमाची माहिती सांगत होते. काहीसा मोठय़ाने हसण्याचा आवाज झाला आणि क्षीरसागरांचे त्याकडे लक्ष गेले. पानसेंच्या अंगावर ‘सेवाव्रती’ असे लिहिलेले एक अ‍ॅप्रन होते. उत्सुकता चाळवली म्हणून ते पानसेंशी बोलायला गेले तेव्हा त्यांना कळले की, इथे सेवानिवृत्त झालेली बरीच मंडळी आपला वेळ कसलाही मोबदला न घेता रुग्णसेवेसाठी देत आहेत. बाळासाहेब क्षीरसागर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यापुढे काय करावे, हा प्रश्न होताच. त्यांनी रीतसर अर्ज केला- ‘मलाही हे काम करता येईल का?’ सुंदर हस्ताक्षरातला तो इंग्रजी अर्ज संबंधितांनी वाचला आणि बाळासाहेबांना हेडगेवार रुग्णालयात सेवाव्रती म्हणून लगेचच सामावून घेण्यात आले. रुग्णांच्या रांगेत बसलेल्या चिंताक्रांत व्यक्तींच्या चेहऱ्यावरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे सौजन्याने देण्याच्या कामात बाळासाहेब रुजू झाले त्याला आता दीड- दोन वर्षे झाली आहेत. असे काम करणारे बाळासाहेब काही एकटेच नाहीत. तब्बल ६० जणांचा चमू रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांचे आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी दिवसातले किमान चार तास तरी खर्च करीत असतो. समाजसेवेची वृत्ती असलेली आणि हे व्रत म्हणून स्वीकारलेली २९० माणसे या सेवाव्रती उपक्रमात आजवर येऊन गेली. प्रेम, आस्था या गोष्टी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनात रुजवू पाहणारी ही सगळी मंडळी साठीच्या पुढची. आपल्याकडे ‘साठी बुद्धी नाठी’ म्हणायची पद्धत आहे. त्याला छेद देणारी ही मंडळी औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात आवर्जून भेटतात. ‘चांगली माणसे कुठे राहिलीत हो हल्ली?’ अशी शेरेबाजी यापुढे कुठे ऐकली तर त्यांना आवर्जून हा पत्ता द्यायला हवा.
सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिले काही दिवस बरे जातात. मग दिवस खायला उठतो. कर्ता पुरुष म्हणून घरात याआधी मिळणारा मानसन्मानही हळूहळू कमी होत गेल्याची भावना वाढीला लागते. अशा काळात घरात चिडचीड होणे स्वाभाविक असते. बाहेरही कोणी सेवानिवृत्तीनंतर तुमच्या अनुभवाचा फायदा घ्यायला तयार नसते. अशी कितीतरी माणसे आढळतात. अशांना एकत्रित करून त्यांच्या जगण्याला उद्दिष्ट प्राप्त करून देण्याचा प्रयोग हेडगेवार रुग्णालयात जून २००१ मध्ये सुरू झाला. बाळासाहेब क्षीरसागरांसारखी अनेक माणसे या उपक्रमात स्वत:हून आली. इथे येणारा प्रत्येक माणूस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेला असेल असे कुणालाही वाटेल. मात्र तसे काही नाही. अनेकजण आपल्या जगण्याला उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी म्हणून या उपक्रमात सहभागी झाले. रुग्णसेवेचा हा वसा त्यांनी घेतला. समाजसेवेची वृत्ती व्रत म्हणून अनेकांनी स्वीकारली. वेगवेगळ्या पाश्र्वभूमीची ही माणसे. त्यांची कार्यसंस्कृतीही वेगवेगळी. कोणी सरकारी खात्यात कारकून, तर कोणी मोठा अधिकारी. कोणी शिक्षक, तर कोणी अभियंता. कोणी गृहिणी, तर कोणी एखाद्या प्रकल्पाचा व्यवस्थापकीय संचालक. परंतु वृत्ती मात्र सेवाभावी काम करण्याची. आपले वय झाले असले तरी दुसऱ्यांसाठी आपण झटतो आहोत, समाजसेवा करतो आहोत याचे सजग भान असणारी ही साठीतली मंडळी नवी प्रगल्भ जाणीव देणारी आहेत. या प्रत्येकाच्या कार्यसंस्कृतीचा रुग्णालयाला लाभ होतो.
रुग्णालयातले तरुण कर्मचारी हुशार असले तरी मराठवाडय़ातल्या माणसांचं इंग्रजी तसं कच्चंच. अगदी साधे स्पेलिंग लिहायचे तरीसुद्धा lr05चुका होतात. कापसे आडनाव लिहायचे असेल तर स्पेलिंग कधीतरी कपासे होते. रुग्णांच्या आधार कार्डावर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची कागदपत्रे तपासताना अशी चुकलेली आडनावे गोंधळ उडवून द्यायची. क्षीरसागर आले आणि त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्पेलिंग कसे बनवावे याचे प्रशिक्षण दिले. पहिल्या वेलांटीसाठी ‘आय’ या वर्णाक्षराचा उपयोग आणि दुसऱ्या वेलांटीसाठी ‘डबल ई’ असा उपयोग ते समजून सांगायला लागले. आता कर्मचारी संस्कृतही इंग्रजी लिपीत बांधू शकतात. क्षीरसागर हे केवळ एक उदाहरण. प्रत्येक कार्यसंस्कृतीतला माणूस त्याचे अनुभव घेऊन रुग्णसेवेत आपापली अशी नवी भर टाकणारा. सौजन्याने वागणे आणि वागायला शिकवणे हे खरे अवघड काम. रुग्णाच्या एखाद्या नातेवाईकाला कधी राग येईल हे सांगता येत नाही. त्याला समजून सांगताना कमालीचा संयम दाखवावा लागतो. साठीतली ही सगळी मंडळी हा संयम तळहातावर घेऊन वावरत असतात. कोणाला कोठे जायचे आहे, कोणते डॉक्टर कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ, ते कधी उपलब्ध असतात, अशी सगळी माहिती रुग्णांपर्यंत आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक सेवाव्रतीला एक काम नेमून दिलेले. नव्याने आलेल्या रुग्णांची माहिती घेणे, ती एका फॉर्ममध्ये भरणे, रुग्णांच्या नातेवाईकांनी पैसे कोठे भरावे, झालेल्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल कोठून घ्यावेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही मंडळी देतात.
२००१ साली भालचंद्र कुलकर्णी, प्राजक्ता पाठक आणि प्रल्हाद पानसे या तिघांमुळे ‘सेवाव्रती’ ही संकल्पना जन्माला आली. प्रल्हाद पानसे हे या चमूचे खऱ्या अर्थाने कॅप्टन. वस्त्रोद्योग महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करणारे पानसे सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांच्या सुनेला वाटले होते, ‘आयुष्यभर हा माणूस घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालला.. पण आता सेवानिवृत्तीनंतर काय?’ मात्र, आता पानसेकाका जोवर रुग्णालयातून घरी परत येत नाहीत तोवर त्यांची सून जेवायची वाट पाहत थांबते. कारण जेवताना रुग्णालयात घडलेल्या अनेक घटना-घडामोडी ते तिला सविस्तर सांगत असतात.
सेवाव्रती उपक्रमामुळे अनेकांची आयुष्ये बदलून गेली. अनिल चौधरी जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात नोकरीला होते. व्यवसायाने अभियंता. २००९ साली ते सेवानिवृत्त झाले. आता ते रुग्णांबरोबर येणाऱ्या किमान ७०० ते ८०० जणांबरोबर संवाद साधत असतात. प्रत्येकाची अडचण निरनिराळी असते. ती सोडवण्यासाठी ते मदत करतात. अविनाश देशपांडे सांगत होते- वॉर्डात जाऊन रुग्णांनी औषधे वेळेवर घेतली की नाही, हे मी पाहतो. फक्त वेळेची आठवण करून देणे एवढेच माझे काम. पण ही आठवण करून दिल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हे काम करण्यासाठी प्रेरणा देतो. जयश्री सुलाखे यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यानंतर घरातली कामे करून झाल्यानंतरही त्यांच्यापाशी खूप मोकळा वेळ शिल्लक असायचा. समाजासाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटे. आईच्या मनातली ही गोष्ट मुलीला कळली आणि तिने इंटरनेटवरून या योजनेची माहिती मिळवली. जयश्री सुलाखेंनी अर्ज केला आणि त्या सेवाव्रती म्हणून रुजू झाल्या.
सेवाव्रती म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पाश्र्वभूमी निरनिराळी आहे. स्वभाव वेगवेगळे. त्यामुळे हे काम करताना कशा पद्धतीची काळजी घ्यावी, याची रचना लावणारे डॉ. अनंत पंढरे म्हणाले, ‘आम्ही एक तत्त्व पाळले. यातल्या कोणत्याही माणसाने चार तासांपेक्षा अधिक काम करू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे. कारण दिवसभरात विनामोबदला काम करण्याचा उत्साह यापेक्षा अधिक काळ टिकून राहत नाही. कामाचा आनंद घ्या, एवढी एकच गोष्ट सेवाव्रतींमध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपण कोण होतो, काय काम करायचो, हे विसरून जा आणि मग कामाला लागा, हेही त्यांना सांगतो. कारण तसे केले नसते तर माणसाच्या अहंकाराने कधीही डोके वर काढले असते.’ या सगळ्याचा परिणाम असा झाला, की कोणतेही काम निम्न दर्जाचे नाही हे त्यांना समजून चुकले. त्यामुले रुग्णसेवेसाठी आलेला एकही माणूस वेळकाढूपणा करत नाही. सकाळी घरून निघालाय, सोबत वर्तमानपत्रही आणले आहे, अधूनमधून ते वाचतो आहे आणि जमले तर माहिती सांगू, असली वृत्ती वाढू न देता ही योजना साठीपार व्यक्तींनी अत्यंत निष्ठेने जोपासली आहे. असे प्रयोग अन्य ठिकाणीही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे येथील ‘निरामय’ आणि शिर्डी संस्थानच्या रुग्णालयातही ‘सेवाव्रती’ योजना सुरू करण्याचे प्रयत्न चालले आहेत. त्यात काही अंशी यश आले असले तरी गावोगावी ही योजना कोठेही सुरू करता येऊ शकते. अगदी एखाद्या शहरातल्या रेल्वेस्थानकावर किंवा बसस्थानकावर माहिती देणारी अशी ज्येष्ठ मंडळी उभी राहिली तर काय हरकत आहे? फक्त त्यासाठी काहीजणांना मन लावून काम करावे लागेल.
एखाद्या रुग्णालयात ओळख निर्माण झाली की ओळखीच्या माणसाची शिफारस करावीशी वाटणे स्वाभाविक असते. किमान एखाद्या ओळखीच्या रुग्णाचा नंबर शिफारशीने पुढे करावा असले उद्योगही करायचे नाहीत, असा दंडक सगळ्यांनी स्वत:हून घालून घेतलेला. जयश्री गिरी, स्वाती देशपांडे, अर्चना वैद्य, सुरेश कुलकर्णी, नरहर नेमीवंत, मधुसूदन कुलकर्णी, व्यंकटेश जोशी, प्रकाश कुलकर्णी अशी या सेवाव्रतींची भलीमोठी यादी आहे. प्रत्येकाचे काम वेगळे. विभाग निराळे. रुग्णालयात मिळणाऱ्या सेवेविषयी प्रतिक्रिया लिहून घेण्याचे काम प्रकाश कुलकर्णी करतात. कोणी औषधांना बारकोडिंग करून देतो. कोणी रुग्णांना भोजन वाढतो. कोणी अतिदक्षता विभागात किती जणांनी राहावे, किती जणांनी जावे, हे ठरवून तेथील वातावरण डॉक्टर आणि रुग्णांसाठी अधिक पोषक राहील याची दक्षता घेतो. ही सगळी कामे करताना एकही जण वैद्यकीय सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही. जाता जाता एखाद्या माणसाला पथ्यपाणी सांगण्याची या वयात भारी हौस असते. पण ती टाळून काय करायचे नाही, हे या मंडळींचे ठरलेले आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या दु:ख-वेदनांवर हळुवार फुंकर घालणारी ही व्रतस्थ मंडळी खऱ्या अर्थाने अस्सल.. बावनकशी!
दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com

Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा