पानी आयो सर सर
घरेन चालो रं, भर भर भर!
पानी वाजच धडाडधूम
धासो, धासो ठोकन धूम!
ही कविता आहे प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांची. तुम्ही म्हणाल की, शांता शेळके यांनी कधी गोरमाटी भाषेत लिहिलं? ही त्यांचीच कविता; पण गोरमाटी भाषेत अनुवादित केलेली. असे म्हणतात, महाराष्ट्रात कोसा-कोसांवर बोलीभाषा बदलते. मराठी तीच, पण बाज वेगळा. तालही वेगळा. मग ही पुस्तकी भाषा वाडीवस्तीवरील मुलांसाठी अध्ययनातला अडथळा असू शकेल का? या प्रश्नाने एका अवलियाला बेचैन केले. आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी तो झपाटून कामाला लागला. पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा यांच्यातील पूल बांधण्याचे काम हा अवलिया शिक्षक गेली ११ वर्षे करतो आहे.
एका घटनेमुळे त्याला या कामाची गरज वाटू लागली. तो प्रसंग गावातल्या तांडय़ावरील शाळेतील आरोग्य तपासणीचा होता. शहरातील डॉक्टर तांडय़ावरील छोटय़ा मुलांना तपासत होते. इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या एकास डॉक्टरांनी विचारले, ‘काय झाले आहे?’ तुळजापूर तालुक्यातील नीलेगाव तांडय़ावर राहणाऱ्या त्या मुलाने सांगितले, ‘सळकम आवंच.’ तपासणारे डॉक्टर चांगलेच बुचकळ्यात पडले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. ‘सळकम’ म्हणजे काय, याचा अर्थ त्यांना लागेना. त्या शाळेतील शिक्षकाला त्यांनी जवळ बोलावले आणि मुलाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. मुलाने तेच उत्तर पुन्हा दिले. आता डॉक्टरसोबत मास्तरही बुचकळ्यात पडले होते. या मुलाला नेमकं काय सांगायचंय, ते दोघांनाही कळत नव्हतं. तांडय़ावरची भाषा- गोरमाटी. मूल काय म्हणते, हे शिक्षकाला कळेना आणि शिक्षक काय सांगतात, ते मुलांना कळेना. आरोग्य तपासणीच्या कार्यक्रमात भाषेची ही अडचण पुढे अनेक विद्यार्थ्यांना तपासताना जाणवत राहिली. मग मास्तरांनीच शक्कल लढवली. तांडय़ावरच्या थोडय़ा मोठय़ा मुलांना त्याचा अर्थ विचारला आणि समजलं.. पहिलीतला तो मुलगा सर्दीने बेजार झाला होता. ‘मला सर्दी झाली आहे..’ असं तो डॉक्टरांना सांगत होता. केवळ  भाषेचे अंतर असल्यामुळे मुलांच्या अडचणी आपण समजू शकत नाही, या जाणिवेची पहिली बोच त्या क्षणी त्या शिक्षकाच्या मनाला टोचू लागली आणि विजय सदाफुले नावाचा हा शिक्षक आपल्या कामाला लागला..
एकदा ते मुलांना वर्गात कविता शिकवत होते-‘पाऊस वाजे, धडाडधूम, धावा, धावा ठोका धूम!’
गुरुजींनी सारे काही छान तालासुरात म्हटले. भाषेची नजाकतही समजावून सांगितली. पण मुलांचे चेहरे कोरेच होते. ज्या छान शब्दांशी मुलांनी समरसून जायला हवे, तेच शब्द मुलांच्या मनापर्यंत पोहोचतच नाहीएत, हे लक्षात आल्याने गुरुजीच हिरमुसले. पुन्हा तीच समस्या : बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांतील अंतर! काहीही करून हे अंतर कापलेच पाहिजे, या विचाराने सदाफुले गुरुजी अस्वस्थ झाले. मग त्यांनी काही मराठी आणि काही गोरमाटी शब्द एकत्र करून भाषेचे मिश्रण करण्याचा प्रयोग हाती घेतला. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांना जोडणारा पूल तयार करण्याचा हा प्रयत्न होता. गुरुजींनी मराठी शब्द सांगायचा आणि त्याचा गोरमाटीतील प्रतिशब्द मुलांना विचारायचा- असा खेळच वर्गात सुरू झाला. मुलांनाही त्यात मजा वाटू लागली. बघता बघता मराठी-गोरमाटी शब्दकोश तयार होऊ लागला. आपल्या सहभागातून एक चांगलं काम सुरू झालंय आणि आपल्या भाषेला मराठीसोबत मानाचं स्थान मिळतंय, या जाणिवेनं मुलंही सुखावू लागली. ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. सदाफुले गुरुजीही सुखावले. त्यांना हुरूप आला. शिक्षक आपली भाषा शिकताहेत, या जाणिवेने मुलांनाही आनंद होत होता. मग मुलेच त्यांना त्यांच्या भाषेतील नवनवे शब्द सांगून मराठीतील प्रतिशब्दही सुचवू लागली. या प्रयोगातून पुढे शांता शेळके यांची वरील कविताही गोरमाटी भाषेत अनुवादित झाली. एक ओळ प्रमाणभाषेची आणि दुसरी ओळ तांडय़ावरच्या बोलीभाषेची. मुलांना त्या कवितेतला भाव समजला आणि आपोआपच त्या कवितेचा गोरमाटीतील सूरही सापडत गेला.
उस्मानाबाद जिल्ह्य़ात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. मोलमजुरी, शेती आणि शेतीशी निगडित कामे करून जगणारा हा समाज शिक्षणापासून तसा दूरच होता. वाडय़ा, वस्त्या आणि तांडय़ांवर जिल्हा परिषदेच्या शाळा पोहोचल्या आणि बंजारा समाजानेदेखील शिक्षणाकडे झेप घेतली. या तांडय़ांवरील शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलाला हाताळणे हे तसे जिकिरीचे काम होते. संवादाचीच अडचण असल्याने मुलापेक्षा शिक्षकच गांगरून जात असत. तुळजापूर तालुक्यातील निलेगाव लमाण तांडय़ावरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नोव्हेंबर १९९५ मध्ये विजय सदाफुले हे शिक्षक म्हणून दाखल झाले तेव्हा त्यांना या अडचणीची अंधुकशीच कल्पना होती. पण त्यातून काहीतरी मार्ग काढू असा विश्वास सोबत घेऊनच त्यांनी शाळेत पाऊल टाकले आणि पुढच्या अनुभवांतून तो मार्ग दिसू लागला. मुलांच्या उपस्थितीचे प्रमाण, वर्गात उपस्थित असलेल्या मुलांमध्ये असलेली भीतीची भावना, हे गुरुजी छान छान गोष्टी सांगणार की मारणार, असे प्रश्न घेऊन पहिल्यांदा शाळेत आलेले कावरेबावरे चेहरे आणि मुलांची भाषा माहीत नसणारे सदाफुले गुरुजी! त्यांनी केलेले भाषेचे हे प्रयोग तांडय़ांवर मराठी शिकविण्यासाठी आज दिशादर्शक ठरू लागले आहेत. पण शिकणे आणि शिकवणे ही मोठी गमतीची प्रक्रिया होती. शिक्षक पुस्तकी बोलायचे आणि मुले गांगरून जायची. संवाद वाढवायचा असेल तर त्यांची भाषा शिकणे गरजेचे. सदाफुले गुरुजींनी वरच्या वर्गातील मुलांच्या मदतीने बडबडगीतांचे, गोष्टींचे गोरमाटी बोलीमध्ये भाषांतर केले. काही शब्द बोलीभाषेतील आणि काही शब्द प्रमाणभाषेतील असा अभिनव साकव तयार केला. गेल्या ११ वर्षांपासून सुरू असणारा हा भाषेचा प्रयोग आता एका पुस्काच्या रूपाने ग्रथित होत आहे. विजय सदाफुले यांनी तांडय़ावरल्या शाळेतील इयत्ता पहिलीसाठी बालभारतीचा तयार केलेला बंजारा बोलीभाषेतील पूर्ण अभ्यासक्रम पुस्तकरूपात उपलब्ध आहे. तांडय़ांवरील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्या ठायी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व ती शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील व्हावीत याकरता संपूर्ण अभ्यासक्रम गोरमाटीत रूपांतरित करणारे विजय सदाफुले हे राज्यातील पहिले शिक्षक आहेत.
शरीराचे अवयव, अंकांची ओळख, आठवडय़ाचे वार, वेळ, फळे, भाजीपाला, स्वयंपाकघरातील वस्तू यांचा परिचय, आजारातील शब्द याबरोबरच काही प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील वाक्ये.. असा एक परिपूर्ण खजिना या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी साकारला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शाळेत गेलेला शिक्षक या पुस्तिकेचा आधार घेऊन अगदी सराईतपणे गोरमाटी भाषेचा उपयोग करून तांडय़ावरील या रानफुलांना शिक्षणाचा आनंद देऊ शकणार आहे. सदाफुले यांच्या या कामाची दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेदेखील घेतली आहे. त्यांचा हा प्रकल्प राज्यभर राबविण्यासाठी सध्या प्रयत्न सुरूआहेत. ‘मुले शिकली, प्रगती झाली’ हे वाक्य केवळ शाळांच्या भिंतींवर लिहून चालणार नाही, तर त्यांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करणाऱ्या शिक्षकांचीही तितकीच गरज आहे. सदाफुले गुरुजींनी ही गरज ओळखली आणि स्वत:ला या कामात झोकून दिले. आता त्यांच्या शाळेतील शिक्षणाचे रोपटे बहरून आले आहे.
दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com