18 August 2017

News Flash

दीपस्तंभ!

अर्थात, सांगण्यासारखं काहीच नाही, असं आजकाल कुठल्याच गावात फारसं आढळतच नाही.

दिनेश गुणे | Updated: December 18, 2016 1:21 AM

आपल्या गावात येणाऱ्या पाहुण्याने, गावात आवर्जून भेट द्यावी असं कोणतं ठिकाण आहे?.. असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहिला पाहिजे. कारण गावाला प्रतिष्ठा देणाऱ्या, गावाची कीर्ती वाढविणाऱ्या बाबींची बीजे या प्रश्नात दडलेली असतात. गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही गावात गेलो किंवा कधीही न गेलेल्या एखाद्या गावातील कुणी मला भेटला की मी हा प्रश्न त्यांना विचारतो. काहीजण चुटकीसरशी उत्तर देतात. काही जणांना विचार करावा लागतो. काहींना आठवूनही उत्तर सापडतच नाही. अशा वेळी त्या माणसाचा चेहरा न्याहाळावा.. उत्तर शोधण्याच्या त्याच्या प्रयत्नांसोबत त्याच्या चेहऱ्यावर निराशेची- आणि लाजेचीही- एक अंधुक रेषा उमटत जाताना दिसते.. खूप वेळानंतर ती रेषा एवढी गडद होते की आपल्या गावात सांगण्यासारखे काहीच कसे नाही, या विचाराने पुरता बेचैन होऊन तो स्वत:लाच जणू अपराधी समजू लागतो आणि कडवट चेहऱ्यानं कबुली देतो..

अर्थात, सांगण्यासारखं काहीच नाही, असं आजकाल कुठल्याच गावात फारसं आढळतच नाही. नवी पिढी विकासासाठी आसुसलेली आहे. माणुसकीचे अनेक झरेही मनामनांत पाझरत असतात. अशी अनेक मने कुठल्यातरी एका ध्यासाने एकत्र येतात आणि विधायक कामांची बांधणी सुरू होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत, जवळपास प्रत्येक लहानमोठय़ा गावात आता अभिमानाने सांगावे असे काहीतरी उभे रहात आहे. अनेक गावांत अशा कामांनी आकार घेतलाही आहे आणि अनेक गावे त्या विधायक कामाच्या प्रकाशाने उजळू लागली आहेत. अनेकांच्या मनात पुढे जाण्याची जिद्द असते, पण समोरच्या वाटेवर तर पुरता अंधार असतो. ही वाट किती खडतर आहे हेही लक्षात येत नसते, तरीही त्याच वाटेने गेल्यावर पुढे कुठेतरी प्रकाशाचे किरण सापडणार आहेत याची जाणीवही असते. अशा वेळी त्या अंधारवाटेवरचे पहिले पाऊल खूप महत्त्वाचे असते. थोडेसे पुढे चालले की अंधारालाही नजर सरावते आणि पावले पुढे पडत जातात.. असं आणखी पुढे गेलं की लांबवर प्रकाशाची चाहूल लागते आणि नेमकी दिशा समजते. मग उत्साह वाढतो. पावलांचा वेगही वाढतो आणि त्या प्रकाशरेषेशी पोहोचताच एक उत्साही जाणीव होते.

समोर एक अखंड दीपस्तंभच उभा असतो.. त्यातून प्रकाशाचे असंख्य झोत पसरत असतात. त्या किरणांच्या रेषांमधून आपल्यासाठी असलेल्या किरणाची एखादी रेषा निवडावी आणि त्यावर स्वार व्हावे, अशी इच्छा अनावर होऊ  लागते. कारण त्याच ईष्र्येपोटी, अगोदरच्या अंधारवाटेवर पहिले पाऊल पडलेले असते. या दीपस्तंभाच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्यावर साहजिकच अवघे जीवन उजळून निघते आणि आपल्यापाशी जे नाही त्याची खंत आजवर बाळगली, त्याचाही विसर पडल्याची जाणीव मनात मूळ धरू लागते. मनाला पछाडणाऱ्या न्यूनगंडाची जागा स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने घेतलेली असते. बघता बघता जगणे बदलून जाते.

अशाच एका जगणे उजळून टाकणाऱ्या दीपस्तंभाची ही गोष्ट ..

ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या कुटुंबांतील मुलांना बुद्धिमत्ता असूनही संधीअभावी त्यांच्या आयुष्याचे सोने होतच नाही. खान्देशातील जळगावात उभ्या राहिलेल्या या दीपस्तंभाने अशा मुलांना त्यांचे आयुष्य उजळून टाकणारा प्रकाश दाखविला आणि बघता बघता ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेवर झळाळी चढत गेली. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या विख्यात संस्थेतून स्पर्धा परीक्षा, ग्रामीण विकास, मनोबल विकास अशा ज्ञानाची शिदोरी घेऊन बाहेर पडलेले यजुर्वेद्र  महाजन यांनी २००५ मध्ये दीपस्तंभ फाऊंडेशनची स्थापना केली. दीपस्तंभाची उभारणी हेच एक तप होते. ते आता पार पडले आहे..

आज जळगावातील कुणी तुम्हाला भेटलाच किंवा जळगावात तुम्ही गेलात आणि तुमच्या गावात आवर्जून भेट द्यावी असे काय आहे, असा प्रश्न कुणालाही विचारलात, तर क्षणाचाही विलंब न लावता, जरादेखील विचार न करता, कुणीही उत्तर देईल- दीपस्तंभ!.. जळगावसारख्या, समुद्रापासून कोसो मैल दूर असलेल्या गावात दीपस्तंभ कसा, या विचाराने तुम्ही क्षणभर बेचैन व्हाल, पण या दीपस्तंभाला भेट दिलीत की स्तंभित व्हाल!

‘दीपस्तंभ’चे संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांच्याशी बोलताना एका अचाट कामाच्या इतिहासाचे एक एक पान अक्षरश: जिवंत होऊन डोळ्यांसमोरून सरकू लागते. दीपस्तंभच्या आवारात केवळ फेरफटका मारताना, या कामाचे उदात्त स्वरूप प्रत्यक्ष दिसू लागते आणि सध्याच्या शिक्षणाच्या बाजारीकरणातही उदात्त शिक्षण परंपरेचे एक रोपटे इथे फोफावते आहे, या जाणिवेने आपोआप मन सुखावून जाते. यजुर्वेद्र यांच्याशी बोलताना त्यांच्या शब्दाशब्दांतील तळमळ जाणवत असते आणि जेव्हा ही तळमळ पहिल्यांदा व्यक्त झाली, तेव्हापासून प्रत्येक शब्दाने एका कृतीला जन्म दिला आहे, हे प्रत्यक्ष दिसू लागते.

माहितीचा आणि प्रेरणांचा अभाव आणि आर्थिक विपन्नावस्था यामुळे बुद्धिमत्ता असूनही गरिबाघरची मुले उच्च व दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात, ही जाणीव खेडय़ातून पुण्यात आल्यावर अधिकच अस्वस्थ करू लागली आणि सधन कुटुंबातील मुलांना मिळणारे दर्जेदार शिक्षण या मुलांनाही मिळालं पाहिजे यासाठी काहीतरी करायचं ठरवून यजुर्वेंद्र महाजन पुन्हा जळगावी परतले.. दीपस्तंभच्या जन्माची ही एवढीशी पाश्र्वभूमी, पण तिने एका महाकार्याची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षणाचा अभाव आणि गरिबीमुळे हरवून गेलेला आत्मविश्वास जागा केल्याखेरीज या मुलांचे मनोबल वाढणार नाही, हे  गावागावांत, खेडय़ापाडय़ांत अक्षरश: वणवण हिंडून मुलांशी साधलेल्या संवादातून लक्षात आले आणि अस्वस्थ यजुर्वेद्रानी एक वेगळाच उपक्रम हाती घेतला. खान्देशातील शाळाशाळांमध्ये अक्षरश: हजार व्याख्याने दिली. गावागावांतील मुलांशी संवाद साधणे सुरू केले आणि एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली- शिक्षणाची गरज, महत्त्व किंवा आत्मविश्वास, सरकारी योजना, यांपैकी कसलेच वारे अनेकांपर्यंत पोहोचलेलेच नव्हते.. अशा संपूर्ण अलिप्त पिढय़ा आपल्या पुढच्या पिढीला यापैकी काही देऊ  शकतील ही शक्यतादेखील नव्हती. असेच झाले, तर पुढची पिढीही तशीच, गावातल्या जगापुरती जगत राहील या जाणिवेने यजुर्वेद्र अस्वस्थ झाले आणि जळगावात दीपस्तंभची स्थापना झाली.

आदिवासी समाजात शिक्षणाचा अभावच असल्याने पाचवीपासूनचे शिक्षण देऊन मुलांची तयारी करून घेण्यावर भर देत दीपस्तंभचे वर्ग सुरू झाले. परिस्थितीचे चटके सोसून जगण्याच्या संघर्षांशी कायमचे नाते जडलेल्या या मुलांचे पाय कायम जमिनीवर राहणार असल्याने, त्यांच्यातूनच प्रशासकीय क्षेत्रातील अधिकाऱ्याची फळी उभी राहिली, तर त्यांना बांधीलकी वेगळी शिकवावी लागणार नाही, हे ओळखून या मुलांच्या मनांची मशागत सुरू झाली आणि बघता बघता जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यच्या ग्रामीण भागात परिवर्तनाची चाहूल सुरू झाली. तोवर दीपस्तंभने कार्यकर्त्यांची एक फळीदेखील तयार केली होती. शहर सोडून गावात परतलेल्या आणि समर्पणभावाने काम करणारे कार्यकर्ते पाहून स्थानिकांच्या मनात आत्मविश्वास रुजत गेला आणि धंदेवाईक शिक्षणाच्या जमान्यात एक गुरुकुल नावारूपाला येऊ  लागले. गेल्या अकरा वर्षांत या संस्थेत शिकलेल्या शेकडो मुलांनी राजपत्रित अधिकारी दर्जाच्या सरकारी सेवेत पदार्पण केले आहे आणि यजुर्वेद्रच्या अपेक्षेप्रमाणेच, पाय जमिनीवर ठेवूनच ही मुले समाजासाठी आपल्या पदाचा वापर करत आहेत. यामध्ये, धुळे जिल्ह्यच्या साक्री तालुक्यातील सामोडे या गावाच्या गावकुसाबाहेरील भिल्ल वस्तीत जन्माला आलेला आणि समाजातील पहिला सनदी अधिकारी असलेला डॉ. राजेंद्र भारूड आहे, जळगाव जिल्ह्यच्या ताडे नावाच्या एका खेडय़ात परिस्थितीशी झगडत दीपस्तंभच्या प्रकाशातून पुढे जात कलेक्टर झालेला राजेश पाटील आहे, अमळनेर तालुक्यातील डांगरी नावाच्या खेडय़ात जन्मलेला आणि पोलीस अधिकारी झालेला संदीप मखमल पाटील आहे.. सातपुडय़ाच्या पर्वतरांगेतील उमर्टी या आदिवासी पाडय़ात राहणाऱ्या निर्मला प्रेमसिंग पावराचे वडील अंध आहेत, आई शेतमजुरी करते. दीपस्तंभमुळे तिच्या शिकण्याच्या ऊर्मीला आधार मिळाला आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती विक्रीकर अधिकारी झाली.

परभणी जिल्ह्यच्या जिंतुर तालुक्यातील वझर नावाच्या खेडय़ातील द्रौपदी तुळशीराम वजई या तरुणीची कहाणी अंगावर काटा आणते. जेमतेम एकरभर जमिनीच्या वादातून गावातील काही लोकांनी तिच्या आईला जिवंत जाळले आणि त्या भीषण धक्क्यातून वडील कधी सावरलेच नाहीत.. अशा बिकट परिस्थितीत तिला दीपस्तंभ दिसला आणि पुढच्या आयुष्याच्या वाटेवर आपोआपच प्रकाश पसरत गेला.  माझी जात, धर्म, मायबाप सारे काही दीपस्तंभच आहे आणि मला दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करून समाजाचे रक्षण करण्याचे बळ प्राप्त करायचे आहे, असे ती सांगते तेव्हा तिच्या डोळ्यांतील आत्मविश्वास शब्दांत उतरलेला असतो..

अशा अनेक वंचितांच्या उपेक्षितांच्या जगण्याचा दीपस्तंभ बनलेल्या यजुर्वेद्र  महाजन यांच्या शब्दांतून आता एका यशाचे समाधान ओसंडत असते. चांगला माणूस आणि चांगले नेतृत्व घडविण्याची एक चळवळ उभी करण्याचे एक स्वप्न आता साकारत आहे. या चळवळीतूनच गरीब, वंचित समाजातील हजारो तरुण-तरुणींना आत्मविश्वासाचे बळ मिळाले आहे, हे सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो.

.. पण हे झाले, शारीरिकदृष्टय़ा धडधाकट मुलांसाठीचे काम. ते सुरू असतानाही काहीतरी अपूर्ण असल्याची खंत यजुर्वेद्रना सतावत होती. त्यांच्या शब्दांतून अधूनमधून ती व्यक्तही व्हायची. कशाचा तरी शोध सुरू होता, हेही जाणवायचं..

आणि दोन वर्षांपूर्वी हा शोध संपला.

डोळे, हातपाय नसले तरी कोणतेही काम उत्तमपणे करण्याची क्षमता असलेल्या मुलांसाठी काय करता येईल, याचा तो शोध होता. त्याचे उत्तर मिळाले, अपंगत्वाविषयीचा न्यूनगंड, गरिबीचे आव्हान, प्रेरणा-प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाचा अभाव, समाजाचा संकुचित दृष्टिकोन ही आव्हानांवर मात करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर ते आपणच का करू नये, असं वाटलं आणि देशातील पहिल्या, अंध-अपंगांसाठीच्या निवासी स्पर्धा परीक्षा केंद्राचा जन्म झाला.. हात, पाय, डोळे नसले तरी प्रचंड मनोबलाच्या बळावर आकाश कवेत घेता येते, ही जिद्द जागविण्याचा प्रकल्प म्हणून याचे नाव ‘मनोबल’! महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यंमध्ये स्पर्धा परीक्षा घेऊन प्रज्ञाचक्षू असलेल्या व विशेष मुला-मुलींची या केंद्रातील प्रवेशासाठी निवड करण्यात आली.

आत्मविश्वास जागविणारा हा प्रयोग आता यशस्वी झालाय हे सांगताना यजुर्वेंद्र महाजन यांच्या शब्दांत कमालीचे समाधान ठासून भरलेले फोनवरील त्यांच्या संभाषणातूनच जाणवते. कर्नाटकातील कोनगोली येथून मनोबल केंद्रात आलेला अपंग नरसगोंडा रावसाहेब चौगुले, कोल्हापूर जिल्ह्यतील कोथळी नावाच्या लहानशा गावातून आलेल्या, जन्मत:च अंध असलेल्या आणि शिक्षणासाठी आसुसलेल्या सुनीता दिनकर सनदी आणि रुचिरा दिनकर सनदी या बहिणींच्या बोलण्यातून हा आत्मविश्वास जाणवतो आणि यजुर्वेद्रच्या समाधानाची साक्ष पटते.

यजुर्वेद्र महाजन नावाच्या एका जिद्दी तरुणाने कष्टाने उभ्या केलेल्या या दीपस्तंभाने आज अनेक आयुष्यांच्या भविष्याची वाट उजळली आहे..

दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com

First Published on December 18, 2016 1:01 am

Web Title: inspiring story of a blind yajurvendra mahajan
  1. S
    sima kalasakr
    Jan 16, 2017 at 4:26 pm
    nice सरधन्यवाद
    Reply