पुण्यात शंकरशेठ रस्त्यावरील गुरू नानकनगर येथे एक पाळणाघर चालवले जाते. पाळणाघरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची उत्तम प्रकारे सेवा केली जाते. प्रत्येकावर औषधोपचार केले जातात. पुढे योग्य वेळी पाळणाघरातील या पाहुण्याला योग्य घरी दत्तकही दिले जाते. मात्र, हे पाळणाघर जरा वेगळे आहे. ते आहे भटक्या, अनाथ कुत्र्यांचे पाळणाघर! भटक्या प्राण्यांसाठी अनाथालये असतात; पण पाळणाघर तसे दुर्मीळच. पुण्यातील प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र कसबेकर हे पाळणघर चालवतात. या पाळणाघरातील सुमारे तीनशे श्वानांची देखभाल करण्याचे काम डॉक्टर अत्यंत निष्ठेने गेली अनेक वर्षे करत आहेत. कोणीही थक्क व्हावे असेच डॉक्टरांचे हे काम आहे.
दररोज खणाणणारा दूरध्वनी वा भ्रमणध्वनीच डॉ. कसबेकर यांना सकाळी झोपेतून जागे करतो. हा दूरध्वनी एकतर रुग्णाच्या नातेवाईकांचा किंवा एखादे कुत्र्याचे पिल्लू सापडले आहे अशी वर्दी देणारा असतो. अशी वर्दी मिळाली की डॉक्टर खडबडून जागे होतात. संबंधितांना आवश्यक त्या सूचना देऊन झटपट ते रुग्णसेवेसाठी सज्ज होतात. जोशी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल ही त्यांची सकाळी शस्त्रक्रियेसाठी जाण्याची रुग्णालये. याखेरीज शहरात ज्या कोणत्या रुग्णालयात त्यांची आवश्यकता भासेल तेथे जाण्यासाठी ते सदैव उपलब्ध असतात. सायंकाळी सहा ते आठ या वेळात ते संभाजी उद्यानासमोरील श्री क्लिनिकमध्ये रुग्णांची तपासणी करतात. सकाळपासून सुरू झालेली ही रुग्णसेवा संपली की डॉक्टरांचा ‘दिवस’ खऱ्या अर्थाने सुरू होतो. गाडीने ते थेट गुरू नानकनगर गाठतात. तिथे जवळपास तीनशे श्वान त्यांची वाट पाहत असतात. त्यांच्याशी खेळण्यात आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा श्वानांवर उपचार करण्यात डॉक्टरांचे दोन तास कसे जातात, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.
मग दुसऱ्या कामास प्रारंभ होतो. या कामातील त्यांच्या सहकारी पद्मिनी स्टंप यांनी तयार केलेले सुमारे २०० श्वानांचे भोजन ते गाडीमध्ये सोबत घेतात. चिकन आणि लापशी म्हणजे दलिया असे घरात बनवलेले श्वानांचे हे भोजन असलेल्या तीन-चार बादल्या गाडीत घेऊन डॉ. कसबेकरांची नगर प्रदक्षिणा सुरू होते. सोलापूर रस्त्यावरील सोपानबाग, शंकरशेठ रस्त्यावरील उड्डाणपूल, स्वारगेट, सदाशिव पेठेमध्ये रेणुकास्वरूप प्रशालेकडे जाणारा रस्ता, डेक्कन जिमखाना बसथांबा, बालगंधर्व रंगमंदिराजवळील राणी लक्ष्मीबाई रस्ता, औंधमधील ब्रेमेन चौकाजवळील बॉडीगेट पोलीस चौकी असे थांबे घेत घेत पहाटे अडीचच्या सुमारास डॉक्टर घरी पोहोचतात. डॉक्टरांच्या येण्याची ठरलेली वेळ झाली की त्या- त्या भागातील कुत्री त्यांच्या गाडीच्या दिशेने तोंड करून थांबलेली असतात. गाडीचा आवाज येताच त्यांचे कान ताठ होतात. शेपूट हलवून ती आपला आनंद व्यक्त करतात. त्यांना भोजन वाढून कसबेकर तेथेच थांबतात. सर्व कुत्री व्यवस्थित जेवली याची खात्री पटल्यानंतरच ते तिथून पुढच्या ठिकाणच्या कुत्र्यांना भोजन देण्यासाठी निघतात. ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरी गेल्या दहा वर्षांत त्यांच्या या सेवेमध्ये खंड पडलेला नाही. काही कामानिमित्त ते पुण्याबाहेर गेले असले तर ही कामगिरी एक ठरलेला रिक्षावाला आणि त्यांचा नोकर पार पाडतात. मात्र, गेल्या दहा वर्षांत त्यांच्यावर हे काम करण्याची पाळी जेमतेम १०-१५ वेळाच आली असेल. अनेकदा प्रजननदृष्टय़ा निरुपयोगी झालेली आणि आजारी कुत्री पाळीव घरांतून बाहेर सोडून दिली जातात. त्यांना बरे करण्याचे काम महत्त्वाचे मानून डॉक्टर अशा कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यातही यशस्वी ठरले आहेत. माणूस बोलू शकतो, भीक मागू शकतो आणि प्रसंगी चोरीही करू शकतो. परंतु सारे काही मूकपणे सहन करणाऱ्या कुत्र्यांसाठी काही करणारे कुणीच नसते. मग ते आपण का करू नये, या भूमिकेतून कसबेकर हे काम करत आहेत.
केवळ कुत्र्यांचा सांभाळ आणि त्यांच्यावर उपचार करूनच डॉ. कसबेकर थांबत नाहीत, तर या कुत्र्यांना हक्काचे घर मिळावे यासाठीही ते सदैव प्रयत्नशील असतात. दहा वर्षांत त्यांनी दीड हजार अनाथ कुत्र्यांना स्वत:चे घर मिळवून दिले आहे. डॉक्टरांकडून ज्यांना पाळण्यासाठी कुत्रा हवा आहे त्यांना तो सहजासहजी मात्र मिळत नाही. तर त्याकरता पद्मिनी स्टंप आणि डॉ. कसबेकर हे दोघे कुत्रा पाळू इच्छिणाऱ्या कुटुंबाची मुलाखत घेतात. मुळात त्या कुटुंबातील लोकांना कुत्रा पाळण्याची सवय आहे का, त्याचे पालनपोषण करण्याएवढी त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे का, तसेच त्या घरातील महिलेला कुत्र्याविषयी ममत्वभाव आहे का, या गोष्टी जाणून घेतल्यानंतरच एखादे कुत्रे संबंधिताच्या घरात दत्तक दिले जाते. एकदा जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या कुत्र्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिज्ञापत्रही त्या कुटुंबाकडून घेतले जाते. या गोष्टीचा पाठपुरावाही ठेवला जातो. एखाद्या कुटुंबात कुत्र्याची हेळसांड होते आहे हे ध्यानात आल्यानंतर अशा कुत्र्याला परत आणण्याचे कामही त्यांनी एक-दोनदा केलेले आहे.
या कामासाठी डॉ. कसबेकर यांनी शनिवार व रविवार खास राखून ठेवलेला असतो. एखादे कुत्रे दत्तक द्यायचे ठरल्यानंतर त्याला डॉक्टर त्यांच्या गाडीतून संबंधिताच्या घरी पोहोचवितात. अलीकडेच एक कुत्रा कर्नाटकातील भटकळ येथे पोहोचवून ते आले होते. परंतु त्या घरातली स्त्री आपल्या नोकरास कुत्र्याची देखभाल करायला सांगत असल्याचे दिसून आल्यावर या घरातले वातावरण कुत्र्यासाठी चांगले नसल्याचे लक्षात येऊन डॉ. कसबेकर त्याला चक्क माघारी घेऊन आले.
तसे डॉ. कसबेकर हे बालपणापासूनच श्वानप्रेमी. लहानपणी वडील त्यांना खाऊसाठी दहा पैसे देत असत. अर्थात साठीच्या दशकात दहा पैशांना किंमत होती. हे पैसे ते कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी वापरत. त्यांच्या लहानपणी घरात डॉबरमन कुत्रा होता. नंतर डॉ. कसबेकरांकडे १८ वर्षे अल्सेशियन कुत्रा होता.
त्यांचा जन्म कारवारचा. मुंबईच्या बालमोहन शाळेत आणि नंतर पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. फर्गसन महाविद्यालयातून रसायनशास्त्रात बी. एस्सी. पदवी संपादन केल्यानंतर त्यांना हवाई दलामध्ये पायलट व्हायचे होते. त्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) त्यांनी अर्जही केला होता. मात्र, परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र त्यांना परीक्षा झाल्यानंतर मिळाले आणि मग तो विचार सोडून देऊन त्यांनी बेळगावमधील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तिथे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेत रुजू झाले. कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणे एवढेच त्यांना ठाऊक होते. दोन वर्षांनी त्यांना एक हजार रुपयांची विद्यावृत्ती सुरू झाली. हृदयरोगतज्ज्ञ होण्याचे त्यांनी खरे तर ठरवले होते; परंतु डॉ. प्रफुल्ल देसाई हे टाटा हॉस्पिटलमध्ये असल्याने तू तेथे जावेस, असे डॉ. सी. टी. पटेल यांनी त्यांना सुचविले. त्यानुसार डॉ. कसबेकर टाटा हॉस्पिटलमध्ये रुजू झाले. तिथे त्यांना पैसे मिळते नसत. परंतु त्याकाळी वडिलांकडे पैसे मागण्याची सोय नव्हती. हॉस्पिटल सुरू करण्यासाठी सासरे सहकार्य करण्यास तयार होते. परंतु कुणाचे मिंधे व्हायचे नाही म्हणून डॉ. कसबेकर यांनी त्यांना नकार दिला. टाटा हॉस्पिटलमधील दहा वर्षांच्या सेवेनंतर डॉ. कसबेकर पुण्यात आले. डॉ. देसाई हे रुबी हॉल क्लिनिकमध्ये येत असल्यामुळे त्यांनीही या क्लिनिकमधूनच कामाला सुरुवात केली.
गुरू नानकनगर भागात राहणाऱ्या पद्मिनी स्टंप आणि त्यांचे कुटुंबीय डॉ. कसबेकर यांच्याकडे उपचारासाठी येत असत. दहा वर्षांपूर्वी दुबईमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात स्टंप यांचा तरुण मुलगा दगावला. त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्या श्वानसेवा करू लागल्या. दारी आलेल्या एका कुत्र्यापासून त्यांनी हे काम सुरू केले. श्वानप्रेम हाच पद्मिनी स्टंप आणि डॉ. कसबेकर यांच्यातील दुवा ठरला. आणि उभयतांची ही भूतदया एका आगळ्या समाजसेवेची मुहूर्तमेढ ठरली.
डॉ. कसबेकरांकडे जखमी व आजारी कुत्र्यांवर उपचार आणि त्यांची सेवाशुश्रूषा होते हे समजल्यावर अनेकांनी भटकी, बेवारस, जखमी आणि आजारी कुत्री त्यांच्याकडे आणायला सुरुवात केली. हळूहळू हे काम वाढत गेले. या कामात मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘मिशन पॉसिबल’ हा न्यास डॉक्टरांनी स्थापन केला. त्यास देणगी देणाऱ्यांना आयकरातून सवलतही मिळते. दानशूर नागरिकांनी देणगी देऊन किंवा एखादे कुत्रे दत्तक घेऊन, तसेच एखाद्या कुत्र्याच्या पालनाच्या खर्चाची रक्कम देऊन याकामी साहाय्य करावे अशी डॉक्टरांची अपेक्षा असते. आणि डॉक्टरांनी ही इच्छा व्यक्त करताच साहाय्यासाठी अनेकजण पुढेही येतात.
इतक्या मोठय़ा प्रमाणावर कुत्र्यांचा प्रेमाने सांभाळ करण्याचे पाळणाघराचे हे काम सुरू असताना या कामाकरता जागा अपुरी पडू लागली. कुत्र्यांच्या आवाजाचा त्रास होतो, अशी महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या सततच्या तक्रारींमुळे हे पाळणाघर डॉक्टरांनी अन्यत्र स्थलांतरित करायचे ठरवले. अमरसिंह जाधवराव यांनी दिवेघाट ओलांडल्यानंतर लागणाऱ्या जाधववाडी (ता. पुरंदर) परिसरात दिलेल्या पाच एकराच्या प्रशस्त जागेवर लवकरच हे पाळणाघर स्थलांतरित होणार आहे. पैकी एक एकर जागेवर हिरवळ करण्यात येणार असून ही जागा कुत्र्यांना खेळण्या-बागडण्यासाठी राखून ठेवली जाणार आहे. आजारी आणि सुदृढ कुत्र्यांच्या निवासाची तिथे स्वतंत्र व्यवस्था असेल. त्याचप्रमाणे कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी ऑपरेशन थिएटरही असेल. सध्या नियोजित जागेला तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू असून हे प्रशस्त पाळणाघर साकारण्यासाठी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. काम मोठे आहे आणि प्रत्येकी दहा हजार रुपये देणाऱ्या पाचशे मित्रांच्या मदतीतून हा प्रकल्प उभा राहील असा विश्वास डॉ. कसबेकर यांना आहे.
रस्त्यावरच्या भटक्या आणि बेवारस कुत्र्यांच्या अन्नासाठी दरमहा किमान दोन लाख खर्चून त्यांना प्रेमाने खाऊ घालणारे, त्यांचा सांभाळ आणि दुखापत झालेल्या कुत्र्यांवर औषधोपचार करून त्यांना तंदुरुस्त करणारे, उत्तम घर आणि प्रेमळ माणसे आहेत अशी खात्री पटल्यावरच अशा कुटुंबामध्ये कुत्र्यांना दत्तक देणारे, आतापर्यंत दीड हजाराहून अधिक कुत्र्यांना हक्काचं घर मिळवून देणारे, सध्याची जागा अपुरी पडत असल्याने पाच एकर जागेत कुत्र्यांच्या पाळणाघराचे स्थलांतर करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अखंड झटत असलेले, एकीकडे कर्करोगतज्ज्ञ या नात्याने रुग्णांवर उपचार करणारे आणि भूतदयेची प्रचीती देत रात्र-रात्र जागणारे, ‘मिशन पॉसिबल’ ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम पाहत असलेल्या डॉ. कसबेकर यांचे हे अनोखे कार्य पाहिल की त्यांच्या तळमळीची आणि सच्चेपणाची साक्ष पटते.
विद्याधर कुलकर्णी/ दिनेश गुणे
vidyadhar.kulkarni@expressindia.com
dinesh.gune@expressindia.com

Will Nifty reach the difficult stage of 22800 to 23400 in bullish trend
तेजीच्या वाटचालीतील २२,८०० ते २३,४०० हा अवघड टप्पा निफ्टी गाठेल?
Conductor issues 444 Rupees ticket for parrots travelling from bus leaving internet in a mix of shock and laughter
प्रवासात पोपटांना घेऊन जाणं पडलं महागात, बस कंडक्टरने दिलं ४४४ रुपयांचे तिकीट, मजेशीर पोस्ट व्हायरल
Anurag Kashyap says he is not doing charity
१५ मिनिटांचे एक लाख अन् तासासाठी…; अनुराग कश्यपला भेटण्यासाठी मोजावे लागणार पैसे, दिग्दर्शकाने दरपत्रक केलं जाहीर
Today's Horoscope 19 March 2024 in Marathi
शनी झाले जागृत! १९ मार्चचा मंगळवार मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींना ठरेल मोदकासारखा गोड, पाहा तुमचं भविष्य