मन घट्ट असलं की कोणताही धोका पत्करायची तयारी होते. मराठी माणसामध्ये एवढी एकच कमतरता आहे असं गेल्या दशकापर्यंत म्हटलं जायचं. भरपूर सुट्टय़ा, बऱ्यापैकी पगार आणि गावाजवळ घरदार सांभाळून करता येईल अशी एखादी नोकरी मिळाली की शिक्षणाचं चीज झालं असं समजून मराठी माणूस मग संसारात रमतो अशीही एक समजूत होती. मराठी माणसाला कष्ट करायला नकोत, हात-पाय पसरायचा त्याला कंटाळाच असतो, त्याला तशी पारंपरिक शिकवणच असते असेही अनेक समज रूढ होते. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ या अभंगावर मराठी माणसाची श्रद्धा असल्यामुळे धाडस करण्याची, धोका पत्करायची त्याची तयारी नसते असंही म्हटलं जायचं. पण आता काळ बदललाय. आपल्या या वर्णनाची मराठी माणसाला लाज वाटू लागली तोवर त्याला व्यवसायाच्या, नोकऱ्यांच्या अनेक नव्या संधीदेखील खुणावू लागल्या होत्या. पंख पसरण्याची उमेद जागी होत असतानाच भविष्य घडवणारी क्षितीजेही विस्तारू लागली होती. त्या संधीचे सोने करणारी माणसे आसपास दिसू लागली, आणि आपल्यालाही भरारी घेता येते याचा जणू साक्षात्कार मराठी माणसाला झाला. ‘आपल्यापुरते जग’ ही संकल्पना पुसून विस्तारलेल्या जगात झेप घेण्यासाठी मराठी माणूस सज्ज झाला. आणि कर्तृत्वाला कोणत्याच सीमा नसतात, या जाणिवेने सुखावत गेला. त्यातूनच अनेक तरुणांनी नवनवी क्षेत्रे धुंडाळली, त्यात पाय रोवून ते घट्ट उभे राहिले. ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ ही म्हण आता मराठी तरुणाईने विस्मृतीच्या अडगळीत टाकली आहे.
व्यवसाय म्हटला की नफ्याची जशी अभिलाषा असते तसेच प्रसंगी नुकसान सोसण्याची तयारीही असावी लागते. त्यातही तो कुक्कुटपालनासारखा व्यवसाय असला तर मन अधिकच कणखर बनवावं लागतं. कारण या व्यवसायात बेभरवशाचंच मोठं आव्हान असतं. जगातील सर्वात अस्थिर व्यवसाय म्हणून याची गणना होते. त्यामुळे या व्यवसायात स्थिरस्थावर होणेही तितकेच अवघड असते. मराठी व अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी आणि खिशात ५० रुपये या शिदोरीवर घराबाहेर पडलेल्या गंगा दौलत पगार यांनी हे आव्हान स्वीकारून या व्यवसायात पहिले पाऊल टाकले. आणि आज ते या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभे आहेत. कधीकाळी परीक्षा पाहणाऱ्या परिस्थितीने त्यांच्यासमोर आता शरणागती पत्करली आहे. हाताशी रोजगाराचे काहीच साधन नसल्याने गाव सोडून जगण्याच्या शोधात वणवण करणाऱ्या गंगा पगार यांना कुक्कुटपालन व्यवसायाने साद घातली आणि गावाकडे परतून त्यांनी जिद्द व परिश्रमांच्या जोरावर या व्यवसायात उडी घेतली. जेमतेम पुंजीवर सुरू केलेल्या ‘राहुल हॅचरीज् अ‍ॅण्ड ब्रिडर फार्म’ने आज कोटय़वधीच्या घरातली उलाढाल गाठली आहे. अर्थात हे काही सहजगत्या साध्य झालेले नाही. एका दुकानात हरकाम्या म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांनी त्यांच्या मनात स्वत:च्या उद्योगाची जिद्द रुजवली. एक साधा नोकर ते हॅचरीजचा मालक हा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने शून्यातून समृद्धीकडे जाणारा आहे.
कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) परिसरात पहिली हॅचरी सुरू करण्याचा मान मिळवणाऱ्या गंगा पगार यांचा या व्यवसायात आज चांगलाच नावलौकिक आहे. तथापि फाटक्या कपडय़ांतले जुने दिवस ते अजूनही विसरलेले नाहीत. नाशिक जिल्ह्य़ातील कळवण हे त्यांचे मूळ गाव. पाचटाच्या झोपडीत राहणारे गंगा यांचे वडील हमाली करत, तर आई रोजगार हमी योजनेवर काम करायची. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचा अंत्यविधीही नातेवाईकांच्या मदतीने त्यांना करावा लागला होता. घरातील कर्ता पुरुष गेला आणि जगण्याची परीक्षा सुरू झाली. पाच मुली व दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या त्यांच्या आईची बेचैनी वाढली. तिची तगमग पाहून गंगा यांच्यावर बालवयात नातलगांकडे धान्यासाठी हात पसरण्याची वेळ आली. नंतर कशीबशी एका दुकानात हरकाम्याची नोकरी मिळाली. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात घर चालवत असताना परिस्थितीचे चटके जगणं खडतर करीत होते. कदाचित त्यामुळेच परिस्थितीशी झुंजण्याची त्यांची जिद्द वाढत गेली. शिक्षण पूर्ण केल्यावर हे बळ आणखीन वाढेल असा विश्वास होता. त्यातून त्यांनी जिद्दीने शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पदवी मिळाल्यावर १९९५ साली त्यांनी पोटासाठी मुंबई गाठली खरी; परंतु काम न मिळाल्याने माघारी परत यावे लागले. पुढील दोन वर्षे गाई-म्हशी चारणे हेच त्यांचे भागधेय झाले. शिक्षणावरचा विश्वास आणि कामाची निकड यातून १९९७ साली पुन्हा गाव सोडण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला. यावेळी मात्र मुंबईऐवजी त्यांनी नाशिक गाठले. आईने दुसऱ्याकडून मागून आणलेले कपडे आणि खिशातले अवघे ५० रुपये या शिदोरीवर निघालेल्या गंगा पगार यांच्या आयुष्याला या निर्णयाने कलाटणी मिळाली. पंचवटीतील भाविनभाई शहा यांच्या दुकानात मिळालेले काम त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरले.
‘कळवण-नाशिक एसटीने आईने पाठवलेला चटणी-भाकरीचा डबा यायचा. त्या भाकरीनंच माझी जिद्द जागवली. रोज दुपारी जेवणाचा पहिला घास घेताना घराकडे घाम गाळणारी आई आणि भुकेली भावंडं डोळ्यासमोर यायची. त्यामुळे घास घशाखाली उतरायचा नाही. पण पाण्याच्या घोटासोबत घास पोटात गेला की नवी उमेद यायची, आणि या दिवसांवर मात करून उभं राहायचंच असा मनोमन निर्धार व्हायचा. दरदिवशी दुपारी असा निर्धार करूनच जेवणावरून उठायचो. त्याचंच बळ मिळत गेलं..’खुराडय़ातल्या फडफडणाऱ्या कोंबडय़ांवर नजर स्थिर करत गंगा पवार काहीसं स्वत:शीच बोलत असतात. त्यांच्या या दोन-चार वाक्यांतूनच त्यांच्या संघर्षांचा पट आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो.
‘महिन्याच्या पगारातून जास्तीत जास्त रक्कम बाजूला कशी काढता येईल याचं नियोजन करत गेलो. त्यातून गावात झोपडीच्या ठिकाणी छोटे घर बांधले. गावात एक दुकानही सुरू केले. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच २००३ साली बेभरवशाच्या मानल्या जाणाऱ्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायात उडी घ्यायचं ठरवलं. गावात वडिलोपार्जित दीड एकर जमिनीचा तुकडा होता. पण कोणतीही बँक कर्ज देण्यास राजी नव्हती. मग पैसे उभारण्यासाठी बहिणी व नातलगांनी आपल्याकडचे दागिने पुढे केले. भाविनभाईंनीही मदत केली. २००८ साली ब्रॉयलरसाठीच्या सहा शेड्स पूर्ण झाल्या. प्रारंभी काही कंपन्यांसमवेत करार करून हे काम सुरू केले. नंतर मात्र हा व्याप स्वत:च सांभाळायचं ठरवलं. त्यावेळी कोंबडीची पिल्लं वेळेवर मिळत नसत. मात्र, ही समस्याच उपकारक ठरली. दर महिन्याला एक लाख कोंबडीच्या पिल्लांचं उत्पादन मी सुरू केलं. ब्रॉयलरची अडचण दूर झाली. परंतु पिल्लं तयार करण्यासाठी अंडय़ांची आवश्यकता भासू लागली. काही दिवस थेट हैदराबादहून ती आणून गरज भागवली. पण वाहतुकीत अंडी फुटून खूप नुकसान व्हायचं. मग अंडय़ांचे उत्पादनही कळवणमध्ये करता येईल का, असा विचार सुरू केला. हे सोपे नव्हते. कारण त्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक लागणार होती. यादरम्यान २०११ मध्ये वेन्कीज् हॅचरिजच्या पुणे कार्यालयाला भेट दिली. कोंबडीच्या ‘कॉब ४००’ या जातीविषयी माहिती घेतली. हा व्यवसाय श्रीमंतांचाच आहे हे तिथे लक्षात आले. कारण उत्तम उत्पादनासाठी आरसीसी बांधकामाच्या किमान चार शेड्सची गरज असते. तो खर्च आणि वर्षांला दोन ‘बॅचेस’ यासाठी किमान दोन ते अडीच कोटी रुपयांचे भांडवल लागणार होते. कंपनीच्या अधिकाऱ्याने माहिती घेऊन माझी आर्थिक स्थिती जाणून घेतली. नाशिकहून पुण्याला बसने आणि एसटी स्टँडवरून रिक्षाने आलो, असं सांगताच त्याचं तोंड उतरलं. ‘काही र्वष थांबा. कारण या व्यवसायासाठी आमच्याकडे मोठी प्रतीक्षायादी आहे,’ असं सांगून त्याने अप्रत्यक्षरीत्या मला बाहेरचा रस्ताच दाखवला!’ ..गंगा पगार जणू भूतकाळ वाचत होते.
पण ते निराश झाले नाहीत. उलट, कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे त्यांचा पाठपुरावा सुरूच राहिला. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अखेर त्यांच्या पोल्ट्री फार्मला भेट दिली व त्यांचं मत बदललं. प्रतीक्षायादीचा विचार न करता ‘कॉब ४००’ या जातीच्या ब्रॉयलर्स देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी पगार यांनी लगोलग आरसीसीच्या दोन शेड्सची उभारणी केली. कुक्कुटपालनातील संपूर्ण युनिटचे एक वर्तुळ त्याने पूर्ण झाले. या काळात बर्ड फ्लूपासून इतरही अनेक संकटे कोसळली. संकटसमयी जवळच्यांनी मदतीचा हात दिल्यानच त्यांचा हा प्रवास आज वर्षांला पाच कोटीहून अधिक उलाढालीवर गेला आहे.
ब्रिडर व्यवसाय अन् हॅचरीज उद्योगातील अंतरंग जाणल्यास त्यात अविरत कष्ट आणि धोके कसे आहेत हे लक्षात येते. अंडी देणाऱ्या कोबडय़ांना रोज १७ ते १८ तास प्रकाश द्यावा लागतो. भल्या पहाटेपासून हे काम सुरू होते. अंडी गोळा करणे, त्यांची सफाई करून वर्गवारी करणे, त्यांचे र्निजतुकीकरण करणे आणि ती शीतगृहात ठेवणे.. या कामांत खूप काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांत थंडीपासून त्यांच्या बचावासाठी कडेकोट व्यवस्था करावी लागते. उन्हाळ्यातही तापमान वाढल्यास मोठय़ा नुकसानीची टांगती तलवार असतेच. त्यासाठी शेडमध्ये खास व्यवस्था करावी लागते. हॅचरीज्मधील काम २४ तास चालते. २०१० मध्ये राहुल हॅचरीज सुरू झाल्यापासून आजपर्यंत सगळी यंत्रणा अखंडपणे सुरू आहेत. चांगल्या दर्जाची अंडी आणि पिलांसाठी अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागते. दुर्लक्ष झाल्यास नुकसान ठरलेलेच. त्यामुळे सर्व कामे नियोजनानुसार होत आहेत की नाहीत, यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
‘राहुल हॅचरीज्’ला कुक्कुटपालन व्यवसायात आज एक ओळख निर्माण झाली आहे. गंगा पगार आता वेन्कीज्सारख्या कंपनीत जातात तेव्हा त्यांचं हसतमुखानं स्वागत होतं. जिद्द, चिकाटी व मेहनत केल्यास कोणत्याही व्यवसायात यशस्वी होता येतं हे त्यांनी सिद्ध केले आहे.
n aniket.sathe@expressindia.com
n dinesh.gune@expressindia.com

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार