‘मुंबईत आलोय.. भेटायचं होतं. कधी येऊ?’ बरोबर सहा महिन्यांपूर्वी एका सकाळी फोन आला आणि पलीकडून तो बोलू लागला. आवाज इतका नम्र, की निव्वळ नाटकीपणा वाटावा! अनेकांना सवय असते. समोरच्या माणसाचं आपल्या दृष्टीने असलेलं कमी-जास्त महत्त्व ओळखून ते आवाजाची लय आणि पातळी बदलतात. कधी कमालीचे विनम्र होतात, तर एखाद्यासमोर बोलताना आवाजात टोकाचा तोरा उमटतो. त्या फोनमधला आवाज याआधी मी कधीच ऐकला नव्हता. म्हणून तो नम्रपणा मला थोडासा खटकलाच. याचं काहीतरी महत्त्वाचं काम आपल्याकडे असणार, असा तर्क मनात करू लागलो..
‘नाहीतर मीच येतो तिकडे. पण आपल्याला भेटल्याशिवाय जाणार नाही..’ तो आणखीनच आर्जवी स्वरात म्हणाला आणि थोडय़ाशा नाईलाजानेच भेटायचं ठरलं. कुठे भेटायचं ते ठरल्यावर आणखी एका मित्रालाही निरोप दिला आणि दुपारी एकत्र जेवणाचाच कार्यक्रम ठरवला. त्या मित्राच्या ऑफिसमध्ये भेटायचं, गप्पा मारायच्या, दुपारी जेवायचं आणि आपापल्या उद्योगाला लागायचं, असा त्या दिवसाचा नवा कार्यक्रम आखून मी मित्राच्या ऑफिसमध्ये पोहोचलो.
हा तिथे अगोदरच पोहोचलेला होता.
आमची ओळख फेसबुकवरची. म्हणजे, प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी फोटोबिटो पाहून बऱ्यापैकी तोंडओळख होतीच. फोटोवरून तो खूप नम्र वगैरे वाटत होताच. शिवाय कविताही करत असल्याने हळवा होताच. त्याच्या कवितांमधला अस्वस्थपणा पार मेंदूत घुसणारा. शब्दाशब्दांतून उमटणारी ती घुसमट वाचताना, हा मुलगा आयटी इंजिनीअर असेल आणि त्याच्या पेशात रमत असेल असं वाटतच नव्हतं.
मी आत गेलो आणि समोरच बसलेला तो आदबीनं उभा राहिला. खूप जुनी ओळख असल्यासारखं एक सौम्य हास्य चेहऱ्यावर उमटलं आणि फोनवरच्या त्याच्या आवाजातील सुरावरून मनात जमा झालेला त्याच्याविषयीचा ग्रह क्षणात धुतला गेला. पुढच्याच क्षणाला आमच्या गप्पा रंगल्या. त्याच्या डोळ्यांत तरळणारं एक अस्वस्थ स्वप्न बोलकं होऊ लागलं होतं. ती अस्वस्थता मला ओळखीची होती. कवितेतून त्यानं कितीतरी वेळा ती व्यक्त केलीच होती. मग तो बोलतच राहिला. त्याला बोलू द्यावं, त्यानं भरभरून बोलावं, मन मोकळं करावं, असं मी माझ्या मित्राला खुणेनंच सुचवलं आणि आम्ही फक्त श्रोत्याच्या भूमिकेत जाऊन बसलो. मग तो बोलू लागला. त्याचा बराचसा भाग त्याच्या फेसबुकवरच्या नोंदींतून अगोदरच माहीतही होता. पण त्याच्या आवाजातली तळमळ, व्यथा, पहिल्यांदाच व्यक्त होत होती.
त्याचं नाव अशोक देशमाने. वय जेमतेम २६. दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यतील मंगरूळ हे त्याचं गाव. शेतकरी कुटुंब. आई-वडील आणि सगळं कुटुंबच विठ्ठलभक्त. विठुमाईचं नाव ओठावर ठेवूनच वावरणारं! गावात पाण्याचं दुर्भिक्ष कायमचंच. यंदा तर दुष्काळात गाव अक्षरश: होरपळून गेलेलं. मग दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात जे चित्र दिसत होतं, तेच चित्र गावातही उमटू लागलं. भल्याभल्या घरची माणसं जगण्यासाठी गाव सोडून शहरात जाऊ लागली. डोक्यावरच्या कर्जाच्या भाराची चिंता चेहऱ्यावर घेऊन जगण्याचा संघर्ष करू लागली. पोराबाळांची आबाळ सुरू झाली. पोटभर खायला मिळण्याची भ्रांत असलेल्या घरांमधल्या मुलांची पाटी-पेन्सिल आणि दप्तरं गुंडाळून ठेवली गेली. एका दुष्काळात उद्याची पिढी बरबाद होणार, त्यांच्या जगण्याचे मार्गच कोरडेठाक होणार या विचारानं अशोक देशमाने हैराण झाला. संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुण्यात चांगली नोकरी करतानाही, गावाकडच्या व्यथांच्या बातम्या कानावर पडल्या की तो आणखीनच अस्वस्थ व्हायचा. ती बेचैनी अनावर झाली की एखादी कविता कागदावर उमटायची. काहीतरी निर्धार व्यक्त व्हायचा. सरकारी उपाययोजनांमधील कोरडेपणानं ती जखम अधिकच भळभळू लागायची. आपलं गाव, घर, सख्खे शेजारी, सारे दुष्काळानं होरपळत असताना, आपण नोकरी एके नोकरी करत सुखाच्या स्वप्नांचे इमले बांधत बसलो, या जाणिवेनं त्याला शरम वाटू लागली आणि काहीतरी केलं पाहिजे असं त्यानं ठरवलं. मनात कामाचा आराखडा तयार झाला होता..
तो आराखडा घेऊनच अशोक समोर बसला होता. दुष्काळामुळे विस्कटलेली घरं सावरण्याचा, पुढच्या पिढीला जगण्याचा व खडतरपणावर मात करण्याचा नवा मंत्र देऊ पाहणारा आराखडा अशोकच्या डोक्यात तयार होता. नोकरी सोडायची आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी पूर्णवेळ काम करायचं, असं त्यानं ठरवलं होतं. तेच सांगायला तो आला होता. त्या भेटीत त्यानं अस्वस्थपणे मनातली तळमळ व्यक्त केली आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधार होण्याचा निर्धार बोलून दाखवला.
एवढय़ा लहान वयात स्वत:चं उभं आयुष्य घडविण्याची सोनेरी संधी समोर उभी असताना, ती लाथाडून काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा विचार अचाट वाटल्याने काही क्षण मी काहीच बोललो नव्हतो. अशोकची नजर लांबवर कुठेतरी स्थिरावली होती. डोळ्यांत जणू उद्याचा एक पट उमटू लागला होता. त्यानं प्रतिक्रियेच्या अपेक्षेनं माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यांत माझ्या नकळतच त्याच्याविषयीचा आदर गोळा झाला असावा. तो हलकेच हसला. मग विचारविनिमय सुरू झाला.
‘असं काही काम करायचं असेल, तर पहिल्यांदा आर्थिक स्थैर्याची हमी मिळवली पाहिजे. स्वत:बरोबर आणखी काहीजणांना सावरायला निघायचं, तर आपल्या हातात आधाराची भक्कम दोरी हवी.’मी व्यवहारीपणाने सल्ला देत होतो आणि अशोक नम्रपणे मान हलवत ऐकत होता. ‘तू असा काही निर्णय घाईघाईने घेऊ नयेस असं मला वाटतं’, असा शहाजोग सल्ला मी त्याला दिला. ‘पाहिजे तर पगारातून काही रक्कम एखाद्या संकटग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी दे, पण नोकरी सोडून त्यांच्यासाठी झोकून देण्याआधी पन्नासदा विचार कर.’- मी माझ्या प्रामाणिक भावना बोलत गेलो.. मग खूप चर्चा झाली. आणखीही नव्या मार्गावर विचार झाला. आम्ही जेवायला गेलो. पिठलं-भाकरीचं जेवण घेतलं. अशोकच्या प्रकल्पाशिवाय इतर कोणत्याच विषयाला हातही न लावता गप्पा मारल्या. दुपारनंतर आम्ही आपापल्या कामाला निघालो.
अशोक रात्री पुण्याला पोहोचला होता. रात्रपाळीवर रुजू झाला होता. रात्री उशिरा त्याचा फोन आला. पुन्हा काही वेळ बोलणं झालं. दुसऱ्या दिवशीपासून आमचा फेसबुक संपर्क वाढला होता. अशोकचं ते स्वप्न दिवसागणिक गहिरं होत चाललेलं दिसत होतं. त्याच्या कविता आणि फेसबुक नोंदींतून ते स्पष्ट उमटू लागलं होतं.
एके दिवशी अशोकचा फोन आला. दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी पूर्णवेळ काम करण्याचा त्याचा निर्णय पक्का झाला होता. फक्त सध्या नोकरी सुरू ठेवायची, थोडे पैसे हाताशी येइपर्यंत काम करायचं, असं ठरलं होतं. मग नोकरीवर कायमची रात्रपाळी घेऊन दिवसा अशोकची भटकंती सुरू झाली. भेटीगाठी करून माणसं जोडण्याचा एक आगळा प्रयोग अशोकच्या नोंदींवरून दिसत होता. गावोगावी हितचिंतकांचं जाळ उभं करण्याचा एक आखणीबद्ध प्रयत्न अशोक करत होता. चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी शेकडो हात आणि माणुसकीनं भारलेली असंख्य मनं उभी राहतात. अशोकच्याही पाठीशी मोठा स्नेहपरिवार उभा राहिला आणि ‘स्नेहवन’ नावाच्या संस्थेचा जन्म झाल्याचे त्याने जाहीर केले. पुण्याजवळ भोसरीत अनिलभाऊ कोठे नावाच्या एका हितचिंतकाने आपला रिकामा बंगला अशोकच्या ‘स्नेहवन’साठी देऊ केला. डॉ. विकास आमटेंनी भरभरून आशीर्वाद दिले. आपला मुलगा काहीतरी भलं काम करतोय याचं समाधान आई-वडिलांच्या डोळ्यांत वाचायला मिळाल्यावर, २७ वर्षांचा हा तरुण गरजू कुटुंबांतील मुलं शोधण्यासाठी वणवण फिरला. दुष्काळग्रस्त भागातील अनेक कुटुंबांनी त्याच्याकडे विश्वासाने मन मोकळं केलं आणि त्याला माणसांची गरज लक्षात आली. खऱ्या गरजू कुटुंबांतील मुलांना भोसरीला आणून त्यांच्या भविष्याला आकार द्यायचा, असं त्यानं ठरवलं आणि १८ मुलांना स्नेहवनची सावली लाभली. गेल्या दीड-दोन महिन्यांत स्नेहवनाच्या त्या सावलीत आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील १८ गरजू मुलं आणि एक दुष्काळग्रस्त कुटुंब असा एक परिवार नांदायलाही लागला. रात्रपाळीची नोकरी करून दिवसा माणसं जोडणाऱ्या अशोकच्या स्वप्नाला आकार आला..
स्नेहवनात मुलं दाखल झाली आणि पुन्हा एकदा अशोकशी बोलणं झालं. त्याच्या आर्जवी स्वरात आनंद आणि आत्मविश्वासाचं अनोखं मिश्रण जाणवत होतं. त्याला शुभेच्छा देताच नेहमीच्या सवयीनं त्यानं कवितेच्या दोन ओळी ऐकवल्या – ‘फूल नाही तर पाकळी तरी होईन, दु:खितांच्या जीवनी सुगंध देईन!’
अधूनमधून अशोक फोनवर भेटत असतो. परवा अचानक त्याचा फोन आला, स्नेहवनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजित केल्याचं सांगायला. ‘नऊ ऑगस्टला स्नेहवनाचं औपचारिक उद्घाटन करणार आणि त्याच दिवशी नोकरीला रामराम ठोकणार. आता कधीही या मी स्नेहवनातच भेटेन’, हे सांगताना त्याच्या सुरातलं समाधान लपत नव्हतं.
बाजूला मुलांचा गलका सुरू होता. आनंद आणि समाधानाच्या एका गाण्याला स्नेहवनात सूर सापडतोय, हे त्या गलक्यातही जाणवत होतं..
दिनेश गुणे Dinesh.gune@expressindia.com

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
UK First Lady Akshata Murty visits Bengaluru book market with Narayana Murthy Video Viral
“याला म्हणतात साधेपणा!” ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नी असूनही रस्त्यावर पुस्तक खरेदी करताना दिसल्या अक्षता मूर्ती, Video Viral
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ