काही नावं, आडनावं कानावर आली की उगीचच माणसं खोलात जाऊ लागतात, त्या नावाचं मूळ शोधू लागतात, आणि आपल्या समजुतीनुसार त्या माणसाला काहीतरी मतंही चिकटवून टाकतात. हे कधीतरी पुरते अंगलट येते. सारे अंदाजच चुकतात. आणि आपलं चुकलंच, या भावनेनं चुकचुकायलाही होतं. असाच एक माणूस एकदा भेटून गेला.. पांढरीशुभ्र दाढी, बोलके डोळे, डोक्यावर गांधीटोपी, अंगात नेहरू शर्ट आणि पायजमा. खांद्यावर दस्ती. मंद हसत त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली- शेख राजूबाबा. पूर्ण नाव : शेख रियाजोद्दीन अब्दुल गनी! मग गप्पा सुरू झाल्या. कार्यक्रमासाठी तयार होताना राजूबाबाने कपाळावर बुक्का लावून घेतला. त्यावर मधोमध अष्टगंध. डोक्यावरची गांधीटोपी काढून नीट घडी करून बाजूला ठेवली आणि भगवा पटका गुंडाळला. गळ्यात तुळशीची माळ घातली. हाती वीणा घेतली..
ही काही शतकांपूर्वीची पुराणकथा नाही. वर्तमानकाळातलीच; तरीही कदाचित काहीशी अविश्वसनीय अशी कथा आहे. सध्या जातिधर्माच्या भिंती पुन्हा एकदा भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू असताना, त्यावरून सामाजिक बेचैनी वाढत असताना त्यावर हळुवार फुंकर घालणारी ही कथा आहे.
..मृदंगावर थाप पडली, टाळ वाजू लागले आणि हरिनामाचा गजर झाला.. ‘बोलाऽ पंढरीनाथ महाराज की जय’! राजूबाबाच्या मुखातून भागवतकथेचे सार बाहेर पडू लागले. एकनाथ-तुकारामांच्या अभंगांचा आधार घेत भजन-कीर्तन रंगू लागले. आता त्यांच्या समोर पराती ठेवण्यात आल्या. त्याच्या काठावर ते उभे राहिले. त्यांना पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसत होती. पुन्हा नाचत, गात राजूबाबा तल्लीन झाले. डोक्यावर समई घेऊन पांडुरंगाला आळवू लागले. भाविक ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत होते. रियाजोद्दीन नावाचा माणूस पांडुरंगाचरणी स्वत:ला समíपत होत होता. ७४ वर्षांच्या त्या वृद्धाची ‘माझा न मी राहिलो’ अशी अवस्था झाली होती. लोकही भान विसरून भागवतकथा ऐकत होते.
बीड जिल्ह्य़ात केज येथे मूळ गाव असलेल्या राजूबाबाची उपजीविकाच कीर्तनावरची. त्याचे परातीवरचे नृत्य पाहण्यासाठी गावोगावचे लोक येतात. त्याचे हे काम गेल्या ६६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. रियाजोद्दीन ते राजूबाबा हा प्रवास थक्क करणारा आहे.
निजामाची राजवट उलथवून टाकण्यासाठी भारतीय सन्य हैदराबादमध्ये घुसवण्यात आले तेव्हा रझाकारांनी मराठवाडय़ात हैदोस घातला होता. दंगली होत होत्या. त्यात रियाजोद्दीनचे वडील मारले गेले. आई, चार मुले आणि दोन बहिणींना घेऊन बीड जिल्ह्य़ातील वडवणी गावाहून ही मंडळी केजला आली. तिथे राजूबाबाचे मामा राहत होते. मुले जगविण्यासाठी आईने चार घरची धुणीभांडी धरली आणि मुलांना काही शेतकरी कुटुंबांत कामाला ठेवले. अट एवढीच, की लेकरांच्या पोटाला काहीतरी खाऊ घाला. जमलंच तर कपडालत्ता करा. रियाजोद्दीनच्या वाटय़ाला किसनराव दशरथ ससाणे हे नाव आले. मुसलमानाचं पोर म्हणून जनावरे राखायचे काम आले. किसनरावांच्या मुलाने रियाजोद्दीनला रामायणातील एक गोष्ट वाचून दाखवली. तेथेच रामनामाची गोडी त्याला लागली. एकेक कथा तो वाचून दाखवायचा तसतशी रियाजोद्दीनला रामास भेटण्याची ओढ वाढत गेली. याच काळात गावात रामायण लावले गेले. ते ऐकण्यासाठी रियाजोद्दीन जाऊ लागला. तेव्हा जवळच येरमाळा गावात येडेश्वरीच्या जत्रेत रामावरचा एक बोलपट आला होता. तो रियाजोद्दीनच्या मित्रांनी पाहिला. त्या बोलपटाची गोष्ट त्याने रियोजोद्दीनला सांगितली. तो रामाच्या प्रेमात पडला. त्यालाही रामाला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता वाढली. देव भेटणार या आनंदात असतानाच पोथीतून रामाची गोष्ट ऐकण्याची उत्सुकताही वाढली. पण मुसलमानाचे पोर म्हणून कोणी जवळ करेना. कोणीतरी म्हणाले, ‘हा मटण खातो. मंदिर बाटलं म्हणजे?’ रियाजोद्दीनने गोष्ट ऐकण्यासाठी मटण सोडलं. रियाजोद्दीनची आई मेहताबबी दर शुक्रवारी तिच्या इतर मुलांना जशी मटण द्यायची तसेच ते रियाजलाही द्यायची. पण तो खात नाही म्हटल्यावर तिला वाईट वाटायचं. शेतात भाकरीबरोबर पाठवलेलं मटण रियाजने कुत्र्याला द्यावे आणि स्वत: उपाशी बसावे. शेवटी तिने त्याला मटण देण्याचं बंद केलं. पोथी ऐकण्यासाठी मटण सोडल्याचं मालकाला सांगण्यात आलं. मंदिराच्या पायरीवर बसून पोथी ऐकणाऱ्या रियाजला गावकऱ्यांबरोबर ‘वनवासा’ला जायचे होते. पोथीत लक्ष्मणाला शक्ती लागली की गावोगावचे लोक अंगावर साखरेच्या पोत्याचा अंगरखा घेत. १४ दिवस गाव सोडून जात. केजवरून पैठणला येत आणि गोदावरीवरून पाणी आणत. ते पाणी शक्ती लागलेल्या लक्ष्मणापर्यंत पोहोचविले की एका अध्यायाची समाप्ती होई.
रियाजोद्दीनही गावकऱ्यांबरोबर वनवासाला गेला तेव्हा सगळे गावकरी रियाजला ‘राजू’ म्हणू लागले. दरम्यान, रामाला पडद्यावर भेटण्याची इच्छा राजूच्या मनात दाटून आली होती. मालकाकडे हट्ट केला- एकदा येरमाळ्याच्या यात्रेत घेऊन चला. त्यांनी काणाडोळा केला. तीन वष्रे गेली. राम काही भेटत नव्हता. शेवटी लातूरला जाणाऱ्या मालकाला आईने विनंती केली, ‘लेकरू हट्ट करतेय, तेव्हा घेऊन जा एकदा. त्याचे पसे कापून घ्या.’ तेव्हा रियाजोद्दीनला महिन्याकाठी एक रुपया पगार मिळत असे. अखेर चार वर्षांनी लातूरच्या चित्रपटगृहात रियाजोद्दीनने राम पाहिला. दरम्यान, पोथी ऐकताना अभंग कानावर पडू लागले. गावातील सहा महिने सुरूअसणारी पोथी संपली आणि रियाजोद्दीन अस्वस्थ झाला. कोठे पोथी सुरू असते का, अशी विचारणा सुरू झाली. तेव्हा ब्राह्मणगल्लीत पोथी सुरू असल्याचे समजले. पुन्हा मुसलमानाचे पोर.. मंदिरात कोण घेणार? मात्र, शेषाद्रीबुवांच्या पांडुरंग रामदासी नावाच्या मुलाला दया आली. म्हणाला, एका कोपऱ्यात बसून ऐक. मुसलमान गुराखी पोरगा मंदिरात येऊन पोथी ऐकतो, भजन गुणगुणतो, हे गावच्या शंकरराव पाटलांना कळले. त्यांनी सांगितले, मंदिरात सतरंजीवर बस. तसा राजू घाबरला. म्हणाला, ‘शिवाशिव होईल!’ पण पाटलांनी आग्रह केला आणि तेव्हापासून राजू हे नाव ज्याच्या-त्याच्या तोंडी आले. चारीधामासाठी मंडळी जाऊ लागली होती. राजूलाही जाण्याची इच्छा झाली. पण चारीधामास कोण नेणार? तेवढे पैसेही नव्हते. औरंगाबादहून मोतीलाल मदनलाल पाटणी यांची गाडी जात असे. त्यात हमाल म्हणून राजूला घ्यावे, अशी विनंती पाटलांनी केली. पण पुन्हा राजूचा धर्म आडवा आला. त्याला न्यायचे नाही असे ठरले. मात्र, पाटणी यांच्या मुलांनी दुसऱ्या एका गाडीत त्याला ठेवून घेतले आणि तब्बल १४ वर्षे राजू चारीधाम यात्रेकरूंच्या सेवेसाठी हमाल म्हणून रुजू झाला. तब्बल २५ वेळा चारीधाम यात्रा त्याने केली. तोंडी नेहमी अभंग, काकडा, वासुदेवाची गाणी असल्याने राजू प्रिय ठरला. तत्पूर्वी गुरांमागे जाताना टोपलीवर नाच करून कीर्तन करणाऱ्या गंगाखेडच्या नानू गंगाखेडकर यांची माहिती राजूला मिळाली. पण शेतात भांडीच नव्हती. शेणाच्या टोपल्यावर उभा राहिला. त्यावर नाचून अभंग म्हणू लागला. ही बाब सालगडय़ाने पाटलाला सांगितली, तेव्हा शंकरराव पाटलांनी एक इरसाल शिवी हासडली आणि म्हणाले, ‘अंगात एवढी कला आहे, तर गावात कीर्तन कर की!’ त्या दिवशी पहिल्यांदा गावात दवंडी दिली गेली आणि राममंदिरात शेख राजूबाबा याचे कीर्तन रंगले.
शेणाच्या टोपलीवर उभे राहून कीर्तन करण्याऐवजी परातीवर उभे राहावे असे त्यांना वाटले. पंढरपुराहून पांडुरंगाचे दर्शन घेऊन शेख राजूबाबांनी पराती आणल्या. आजही ते त्याच परातीवर उभे राहून भजन आणि कीर्तन करतात. त्यांच्या या वेगळेपणामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाकडून दरमहा १५ हजार रुपये त्यांना उदरनिर्वाहासाठी दिले जातात.
मुसलमानाचे कीर्तन करणारे पोर.. त्याला मुलगी कोण देणार? नात्यागोत्याच्या ओळखी काढल्या. शेवटी मस्साजोग येथील सय्यद मोईनोद्दीन यांनी मुलगी देण्याचे ठरवले. पण गावातला कोणीही लग्न लावायला पुढेच येईना. शेवटी धारूरवरून मौलवींना बोलावले. लग्न झाले. चार मुली, दोन मुले झाली. आता दोन मुलींची लग्नंही झाली आहेत. पण सून करून घेताना राजूबाबांना अडचणी भासू लागल्या. त्यामुळे त्यांनी दाढी राखली. कुराणपठण केले. अरबी भाषा शिकली. मुस्लीम धार्मिक कार्यातही ते जाऊ लागले. एका बाजूला भजन-कीर्तन आणि दुसऱ्या बाजूला घरातलं वातावरण इस्लामी शिकवणुकीचे. कितीतरी वर्षे अडचणी आल्या म्हणून आईने दग्र्याला, पीराला बोकड कापण्याचे नवस केलेले. पण पशुहत्या होऊ नये, या त्यांच्यावरील संस्कारामुळे राजूबाबांनी आजही एकही नवस फेडलेला नाही. वारकरी म्हणून सगळी पथ्ये ते आजही पाळतात. परातीवर नृत्य करीत अध्यात्माची शिकवणूक देणारे राजूबाबा भारतभर फिरले. अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. मुंबईतल्या सर्व नाटय़गृहांमध्ये राजूबाबांनी कार्यक्रम केले. महाराष्ट्र सरकारने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले.
केवळ भजन-कीर्तनाच्या जोरावर केजमध्ये राजूबाबांनी स्वत:चे घर बांधले. मुलाला व्यवसाय थाटून दिला. भजन-कीर्तनाचा नाद अजूनही काही संपलेला नाही. घरात थोडेफार कमी पडले की राजूबाबा एखाद्या गावात जाऊन कला सादर करतात. त्याची बिदागीही त्यांना मिळते. ती तशी जास्त नसते.
..पण निष्ठा अचल असल्या की यश मिळतेच.
suhas.sardeshmukh@expressindia.com
dinesh.gune@expressindia.com

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट