‘भोगले जे दु:ख त्याला’ या सदरातल्या कष्टकरी स्त्रिया मन, नजर आणि जाणिवा जागृत असतील तर त्या तुम्हा-आम्हाला सहज दिसतील! मात्र त्यांचं अंतरंग जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांची दु:खं सहसंवेदनेतून जाणून घ्यायला हवीत.

रंगमंचावरील पडदा उजळतो आणि पडद्यावर ‘ती’ दिसते. हातांत झाडू घेऊन सार्वजनिक स्वच्छतागृह साफ करणारी, तिच्या वाकलेल्या देहाला धक्का मारून जाणाऱ्या पुरुषाला टाळून गलिच्छ संडासातील विष्ठा धुवून काढणारी ती.. संपूर्ण प्रेक्षागार श्वास रोखून ती ध्वनिचित्रफीत पाहात असते. ए. व्ही. संपते. रंगमंच उजळतो आणि तिच्या नावाची उद्घोषणा होते. स्वच्छता कामगार वैशाली बाराइए.. झी. टी.व्ही.चा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर उभी असलेली वैशाली पुरस्कार घेताना रडत राहते. थोडय़ा वेळाने सावरून बोलू लागते, ‘‘चार महिन्यांपूर्वी मला फोन आला. ‘चतुरंग’साठी तुझी मुलाखत हवी आहे. वाटलं, मी काय बोलणार? पण बोलले, आयुष्यात पहिल्यांदा मन मोकळं केलं. मग मलाच प्रश्न केला, ‘‘लोकांची विष्ठा साफ करत असं कसं जगलो आपण? इथून पुढे असं जगायचं नाही!’’ मेहतर समाजात जन्माला आली म्हणून घाणीचे ढीग उपसणाऱ्या, दबलेल्या, पिचलेल्या वैशालीतून सफाई कामगारांच्या हक्कासाठी झगडणारी एक लढवय्या युनियन लीडर जन्माला आली. ‘भोगले जे दु:ख त्याला’ या सदराचं संचित हे आहे!
वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या सदरातून कष्टकरी स्त्रीचं आयुष्य मांडायचं होतं. तेही तिच्या आयुष्यातल्या ‘एका’ दिवसातून. ट्रक ड्रायव्हर योगिताने सुरू झालेल्या या सदरातून एकेका स्त्रीची कहाणी जसजशी उलगडत गेली तसतसे ई-मेल, प्रत्यक्ष भेटी व फोनवरून प्रतिक्रियांचा अक्षरश: वर्षांव झाला. तेव्हा काही गोष्टींची प्रकर्षांने जाणीव झाली. ‘लोकसत्ता’च्या साक्षेपी वाचकांना हे सदर आतून अस्वस्थ करतय. प्रियंका तुपे लिहिते, ‘‘या लेखांतील कष्टकरी स्त्रियांचं जगणं, जातवास्तव व त्यातला समाजशास्त्रीय अभ्यास खूप महत्त्वाची माहिती देतो.’’ नांदेडचे विलास ढवळे लिहितात, ‘‘जगण्याचं भीषण वास्तव तुम्ही जगासमोर मांडता. आपल्या जाणिवा तीव्र आहेत म्हणून मांडणी संवेदनशील आहे. आम्ही पांढरपेशे लोक कल्पनाही करू शकत नाही असं हे विश्व आहे.’’ अशा प्रतिक्रिया नोंदवताना हटकून विचारला जाणारा एक प्रश्न. खरंच या सत्यकथा आहेत? कुठे शोधता अशा स्त्रिया तुम्ही? माझं यावर साधं उत्तर आहे, अशा स्त्रियांना शोधायला कशाला हवं? त्या आपल्या अवतीभवती आहेत. मन, नजर आणि जाणिवा जागृत असतील तर त्या तुम्हा-आम्हांला सहज दिसतील! मात्र त्यांचं अंतरंग जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा. या सर्व कष्टकरी स्त्रियांशी माझे सूर जुळले ते सहसंवेदनेच्या भावनेतून!
आचार-विचार, संस्कृती व व्यक्तिमत्त्वातील विषमतेचा भेद करण्यासाठी कधी आग ओकणाऱ्या उन्हात, फुटक्या घमेल्यावर बसून तर कधी कचराकुंडीजवळ, सार्वजनिक संडासाच्या पायरीवर. एखाद्या लमाणाच्या पालातल्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून तर कधी शेतातल्या झाडाच्या सावलीत बसून त्यांच्याशी संवाद साधायला लागला. एखाद्या दिवलीबाईशी क्षणांत सूर जुळले. तर हमाल स्त्रियांशी तासभर प्रयत्न करूनही संवाद साधता येईना. मात्र एकदा विश्वास वाटल्यावर त्या एवढय़ा भरभरून बोलल्या की हातगाडीवर गळ्यात हात टाकून फोटो काढले, पिठलं-भाकरी खाऊ घातलं. रुद्ध कंठाने म्हणू लागल्या, ‘ताई मन मोकळं झालं!’
या सदरातील बहुतेक जणी ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ग्रामीण जनतेची त्यांच्या व्यथांशी नाळ जुळते. ज्ञानेश्वर करंडले लिहितात, ‘‘मातेरवालीचा लेख वाचताना आईची खूप आठवण आली. एकटाच होतो शेतात. खूप रडलो. तिच्या जीवनातील दारिद्रय़ आठवलं आणि माझ्याच जगण्याचा रंग उडाला!’’ रुईया महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ललिता परांजपे लिहितात, ‘‘ग्रामीण स्त्रीचं दु:ख मांडणारी ही लेखमाला डोळ्यांत अंजन घालणारी आहे. ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचं दुर्दैवी वास्तव- उदाहरणार्थ ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी कामगार- ज्या बद्दल शहरी समाज अनभिज्ञ आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलंत याबद्दल अभिनंदन! ही लेखमाला इतर भाषांमध्येही भाषांतरित व्हावी!’’ कोल्हापूरचे रामचंद्र बेकनाळकर लिहितात, ‘प्रवास करताना ऊस तोडणी कामगारांची पालं बऱ्याच वेळा दिसतात, पण आजवर त्यांचं दु:ख कधी दिसलं नव्हतं!’
या सदराला तरुणांनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय आहे. स्नेहा कर्णिक , आयएएसची परीक्षा देणारे सचिन औटी, अंजली बर्गे, दिलीप सानंद, प्रशांत सोनावणे, सनी पोवारसारखे तरुण जेव्हा लिहितात की अशा दुर्बल घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा या सदरातून मिळाली तेव्हा खूप आनंद वाटतो. चैतन्य वाळिंबे जेव्हा विषादाने म्हणतात, ‘या समाजातील एक स्त्री (सफाई कामगार) इतकं विदारक आयुष्य जगत असेल तर आम्हाला एवढं छानछौकीचं आयुष्य जगण्याचा काय अधिकार? जर आपण संघटित प्रयत्न केले. तरच परिस्थिती बदलेल असा विश्वास वाटतो.’ एकीकडे हा आशावाद तर त्याच वेळी तरुणांनी खंतही प्रकट केली आहे. की एका बाजूला कष्टकरी समाजाची उपासमार तर दुसरीकडे आमचं पैसे उडवणं, मॉलसंस्कृती, चंगळवाद! सगळाच विरोधाभास! अश्विन बनसोडेने तर निश्चयच केलाय की आता यापुढे तो मॉलमधून भाजी, फळे न घेता शैलू शेखसारख्या एखाद्या गरीब भाजीवालीकडूनच भाजी घेईल!
या सदराने कष्टकरी व उपेक्षित समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही अंशी तरी बदलला हे तृतीयपंथीयांवरील लेखाने अधोरेखित केलं. राजू शिंदे म्हणतात, ‘आजवर वाटायचं हे इतके धडधाकट असूनही भीक का मागतात? तुमच्या लेखामुळे त्यांच्यावरच्या परिस्थितीची जाणीव झाली.’ ज्योत्स्ना गाडगीळ लिहिते, ‘भविष्यात त्यांच्यासाठी काही करू शकले नाही तरी किमान त्यांच्याबद्दल तुच्छता नक्कीच नाही वाटणार.’ डोंबारी समाजातील स्त्रीचं जीवन जाणल्यावर अनेक जणांनी तिला मदत देऊ केली. मीना अहेर, डॉ. सतीश गुप्ते यांनी अन्नधान्य देऊ केलं. ऑस्ट्रेलियाहून मकरंद टेंबे, अमेरिकेतील संतोष दुखंडे यांच्यासह अनेक परदेशस्थ व सुजाता देहेरे, इम्रान मुजावर, संजय लांबे, अनिल झोरे (मिशन अविष्कार संस्था) सलीम पिंजारी, क्रिश्ना भगत, संजय लडगे अशा अनेकांनी या स्त्रियांना मदत देऊ केली आहे. ज्याची नोंद घेतली आहे.
वाचकांना डोंबारी, फासेपारधी यांच्याविषयी कणव वाटते. तशीच सुलोचना कडूसारख्या स्त्रियांच्या जगण्यातून प्रेरणा मिळते. झगडण्याचं बळ मिळतं. सकारात्मक ऊर्जा मिळते. सूरज भोसले जेव्हा लिहून जातात की, या लेखांमुळे माझ्यातील संवेदनशील माणूस जागा होतो व हीच आपल्या लिखाणाची खरी ताकद आहे! तेव्हा मला स्वत:ला लिहिण्याची नवी उमेद येते, पण तरीही या स्त्रियांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी मोलाची मदत केली त्या माननीय गिरीश प्रभुणे, बाबा आढाव, नितीन पवार, अ‍ॅड. स्मिता संसारे, उषा ढोरे, सायली शिंदे यांची मी ऋ णी आहे.
या सदराला समाजातील सर्व थरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला. आमदार संजय केळकर म्हणतात, वंचित महिलांचं असामान्य कर्तृत्व व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द व धैर्य लोकांसमोर आणण्याचं मोलाचं कार्य ‘लोकसत्ता’ने या सदराद्वारे केलं हे खरोखर कौतुकास्पद आहे.
फिल्ममेकर अंजली पुरत, लेखिका शुभा चिटणीस, कौस्तुभ आमटे, डेप्युटी लेबर कमिशनर शिरीन लोखंडे, अनिल हर्डीकर, हास्य क्लबचे प्रणेते म्हस्केसर, अष्टपुत्रे अशा अनेक जाणकार व साक्षेपी वाचकांनी वेळोवेळी जी कौतुकाची पावती लेखांना दिली, त्यामुळे नवनवीन कष्टकरी स्त्रियांचा शोध घेण्याची ऊर्जा सतत मिळत होती.
सदर सुरू झाल्यानंतर काही काळ मनात एक बोचरी खंत होती. गेली बेचाळीस वर्षे आकाशवाणी, दूरदर्शन व वृत्तपत्रांच्या माध्यमातून ज्या तळागाळातल्या माणसांच्या व्यथा, वेदना व वंचनांचे हिशेब मांडले ते समाजापर्यंत पोहोचवले. पण पुढे काय? आजही त्यांच्या परिस्थितीत फरक पडत नसेल तर अशा वांझोटय़ा सहवेदनेला काय अर्थ? कामगार चळवळीतील झुंजार नेते नितीन पवारांनी मात्र ही खंत दूर केली. ते म्हणाले, ‘‘आम्हांला स्पष्टपणे जाणवतंय की यापुढे कष्टकरी दलित स्त्री हीच क्रांतीची नायिका होईल! तिचं जितकं जास्त शोषण होतंय तितकी ती अधिक जोमाने लढतेय. पूर्वी मोर्चात पुरुष कामगार जास्त असत. आज आपल्या हक्कांसाठी कष्टकरी स्त्रिया रस्त्यावर उतरतायत, हे आशादायी चित्र आहे. सुस्थापित व विस्थापितांमधील दरी मिटवण्याचं मोठं काम या सदराने केलंय!’’ व्यक्तिश: मला एखादं विधायक कार्य हाती घेण्याची उमेद या सदराने मिळवून दिली त्याबद्दल ‘भोगले जे दु:ख त्याला’ या सदराची मी ऋ णी आहे.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

मुडदे बरे! जळताना प्रकाश देतात
पहाटेच चार वाजले. तशी उठले आन स्मशान झाडायला गेले. रातचं प्रेत अजून जळत हुतं. त्याच्या उजेडात पूजा धावीचा अभ्यास करत येकटीच बसली हुती. मी कचरा गोळा क्येला. फोडलेला माठ उचलला. थुंकलेलं साफ केलं. शेडमध्ये तिरडी पडली हुती. त्याचे बांबू सोडवले. प्रेत टाकलेला कडबा जनावरांना खाऊ घातला. तोवर चिता विझली. राख सावडून गोळा केली आन् अर्धवट जळालेली लाकडं स्वयंपाकासाठी चुलीत घालायला व्हतील म्हून गोळा केली. कोपऱ्यात कुनीतरी फळं, बिस्किटं आन् चॉकलेट ठिवलं हुतं. ते सगळं उचललं. पूजाला बिस्किटं दिली. पोर रातभर येकलीच हिथं बसून अभ्यास करत हुती.
दिवसभर खेडय़ात फिरून बायांचे केस गोळा क्येले. आन् त्यांना पिना, सुया, बिबे इकले. व्यापाऱ्याने पैसे दिले ते घिऊन घरी आले. दुपारी येका घरी लक्ष्मी माता बशिवली हुती. तिथं पोरांना घिऊन निघाले. जाताना काल प्रेतावर कपडं घातली व्हती ती धुवून ठिवली व्हती. तेच घालून गेलो. तिथं आम्हाला सर्वाना बाथरूम भाएर जेवायला बशिवलं. पूजाचे डोळे भरून आले. म्हनली, ‘‘आई, आपण मसणजोगी मान्स! आपन गरिबीत जन्मलो असलो तरी गरिबीत मरायचं नाय. माझ्याशी मैतरणी बोलत नाय. म्हणतात, तुज्याजवळ भुतं असतील ती आमाला लागतील! आई अशा जिवंत मान्सापरीस मुडदे बरे! जळताना प्रकाश देतात. मला बी अशा अंधाऱ्या आयुष्यातून उजेडाकडे जायचंय आई!’’
माझ्या लेकीनं दहावीला चितेच्या उजेडात अभ्यास करून ९२ टक्के गुण मिळवले. उच्च शिक्षणाची महत्त्वाकांक्षा बाळगून अपार मेहनत करणाऱ्या माझ्या पूजाला शिक्षणासाठी मदतीचा हात हवा आहे..
(मसणजोगी समाजातील बीडच्या शांताबाई घनसरवाड यांचा एक दिवस.)

(सदर समाप्त)
madhuri.m.tamhane@gmail.com