मुलींना तंत्रशिक्षणात आपण फारसे पुढे जाऊच देत नाही की मुली आपणहूनच या क्षेत्राकडे वळू इच्छित नाहीत, याचा प्रांजळपणे तपास करण्याची आपली मानसिक तयारीच नाही. आयआयटीसारख्या संस्थेत मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी केवळ आरक्षणाचे गाजर दाखवणे फारसे उपयोगाचे नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘मुलींसाठी मलमपट्टी’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

आयआयटीमध्ये जाऊन आपल्या मुलीने उत्तम शिक्षण घ्यावे आणि स्वत:ला तपासून घेण्याची संधी दवडू नये, असे किती पालकांना वाटते, हा प्रश्नच उपस्थित होत असल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने शिक्षणतज्ज्ञ वसुधा कामत आणि शिक्षणतज्ज्ञ प्रेरणा राणे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होणार आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे.

लक्षात ठेवावे असे..

या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.