खरेदी-विक्री व्यवहारात एकदा वस्तू विकली गेली की नंतर तिचे काय करायचे हे सांगण्याचा अधिकार ती विकणाऱ्यास नसतो. केंद्र सरकारला -विशेषत: पर्यावरण मंत्रालयास- हे साधे तत्त्व माहीत नसावे असा ठाम निष्कर्ष काढता येईल. याचे कारण या मंत्रालयाने घेतलेला ताजा निर्णय. १९६० सालच्या ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल अ‍ॅक्ट’ या कायद्यात या मंत्रालयाने एकतर्फी दुरुस्ती केली असून देशभरात ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर गदा आणली आहे, असे मत सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘रक्तलांच्छित शाकाहार’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडणारा नांदेड येथील ‘ब्लू बेल्स महाविद्यालया’चा विद्यार्थी रोहित कोकुलवार हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत मालाडच्या ‘अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालया’चा विद्यार्थी कुणाल सोनावणे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

अग्रलेखावर मत मांडणारे रोहित आणि कुणाल यांनी दर्जेदार लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. रोहितला सात हजार आणि प्रमाणपत्र तर कुणालला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षणतज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.