भाजपतर्फे संभाव्य राजकीय विरोधकांना सध्या एकच संदेश दिला जातो. ‘तुम्ही आमच्या बरोबर या किंवा गप्प बसा. हे दोन्ही पर्याय मान्य नसले तर तुमच्या फायली आमच्या हाती आहेतच’, हा तो संदेश. आतापर्यंत असंख्य उदाहरणांतून भाजपने ही आपली कार्यशैली दाखवून दिली आहे. मग ते बिहारात लालू कुटुंबीयांविरोधातील कारवाई असो किंवा कर्नाटकी मंत्र्यांवरच्या धाडी वा चिदम्बरमपुत्रापाठोपाठ जयंती नटराजन यांच्या घरांवरील छापे. यातून भाजप प्रच्छन्नपणे हाच संदेश देते. सुनील तटकरे यांच्याविरोधातील कारवाईच्या वृत्तातूनही हेच ध्वनित होते. आम्ही देत आहोत ते मंत्रिपद घ्या अथवा तुमच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेतच, हा यामागचा अर्थ. तो खरा असल्याने भाजपला या भ्रष्टाचारांची ना प्रामाणिक चौकशी करावयाची आहे ना ती प्रकरणे बंद करावयाची आहेत. भाजपला रस आहे तो केवळ ही प्रकरणे टांगती ठेवण्यात. त्याचमुळे, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस अशा सर्वच पक्षांना नकोशा झालेल्या छगन भुजबळ यांचे प्रकरण वगळता अन्य कोणतेही प्रकरण भाजप सरकारांकडून धसास लावले जात नाही. जाणारही नाही. नारायण राणे हेदेखील भाजपच्या वाटेवर आहेत ते याचमुळे. ते जाणतात की विरोधी पक्षांत राहून भाजपला विरोध तर करता येणारच नाही. उलट चौकशीचा ससेमिरा, छापे वगैरेंची शुक्लकाष्ठे मागे लागण्याचा धोका. त्यापेक्षा सांप्रती सत्तासूर्य तळपत असलेल्या भाजपच्या अंगणात जाऊन उभे राहिलेले बरे. बाकी काही मिळो न मिळो निदान ‘ड’ जीवनसत्त्व तरी मिळते. सुनील तटकरे, अजित पवार यांच्या चौकशीचे, सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देऊ केल्याचे वृत्त राजकारणात नव्याने विकसित झालेल्या ‘भ’ जीवनसत्त्वाचा परिचय करून देणारे आहे. भ्रष्टाचार चौकशी वैगरे केवळ शब्दांचे बुडबुडे, असे मत ‘‘भ’ जीवनसत्त्व’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत पुणे येथील पीइएस मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वप्नाली सासवडे ही ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत बीड येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख रुबीन शेख मौला याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या स्वप्नाली आणि शेख रुबीन शेख मौला यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. स्वप्नालीला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर शेख रुबीन शेख मौलाला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.