18 August 2017

News Flash

शांतता म्हणजेच मूकसंमती

तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवणारा आपला समाज त्याशिवाय बदलणार नाही.

शंकर वामन इगवे | Updated: March 18, 2017 12:54 AM

‘ताठ कण्याचे वर्तमान’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले विचार.

शंकर वामन इगवे

नेपोलियन बोनापार्टने म्हटल्याप्रमाणे ‘वाईट लोकांच्या वाईट वर्तणुकीपेक्षा, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्याने जास्त नुकसान होत असते.’ आपल्या कलेतून, साहित्यातून समाजाचा आरसा बनणारे साहित्यिक, कलाकार मोठय़ा प्रमाणात समाजजागृती घडवून आणू शकतात. समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, घडामोडींबद्दल कलाकारांनी निर्भीडपणे आपले विचार मांडणे अत्यंत गरजेचे असते. काही कलाकार समाजाच्या कल्याणाचा विचार करतात, सुधारणांचे पुजारी बनतात; तर काही केवळ गल्लाभरू अभिव्यक्तीला प्राधान्य देतात. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर कलाकारांची सामाजिक, राजकीय जाणीव, निर्भीडता, त्यांच्या अभिव्यक्तीचा सन्मान यांबाबतीत अमेरिका आणि भारताची तुलना करणे अधिक सयुक्तिक ठरेल.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सुरू झालेल्या ‘असत्याचा प्रयोगांनी’ अमेरिकेचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढय़ांची संख्या आणि ती आवरण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने उचललेल्या पावलांविरोधात जगभरात निषेधाचा सूर उमटला. ‘गोल्डन ग्लोब’मधील अभिनेत्री मेरिल स्ट्रीप, महिला मोर्चातील अ‍ॅशले ज्यूड, मदिना यांची भाषणे, ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यातील कलावंतांची भूमिका ट्रम्प यांच्याविरोधात वाढत असलेल्या असंतोषाची ठळक जाणीव करून देतात. दुसऱ्या बाजूला भारतातील वातावरण बघता काही प्रश्न पडतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केल्याने ट्रम्प समर्थकांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली का? कलाकारांचे पुतळे जाळून देश सोडून जाण्याचे फुकटचे सल्ले दिले का? ट्रम्प यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने मेरिल स्ट्रीप यांच्या चारित्र्यहननाची एककलमी मोहीम राबवली का? समाजमाध्यमांवर शिवीगाळ करून पाणउतारा केला का? या सर्व प्रश्नांची नकारात्मकतेकडे झुकलेली उत्तरे बघता जगातील सर्वात जुनी लोकशाही आणि जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीतील फरक लक्षात येतो.

एखाद्याला स्वतंत्र राजकीय मते असू शकतात, ही भावना आपल्या देशात उपरी वाटते; तर बऱ्याच साहित्यिक, कलाकारांकडे निर्भीडतेचा अभाव स्पष्टपणे आढळून येतो. किंबहुना आपली मते मांडण्यासाठी जे निरोगी सामाजिक वातावरण लागते ते तयार करण्यास आपण एक लोकशाही देश म्हणून अपयशी ठरलो आहोत. आमिरने देशातील असहिष्णू वातावरणावर भाष्य करताच देशात माजलेला गदारोळ विसरणे शक्य नाही. काहींनी देश सोडण्याचे सल्ले दिले तर काहींनी बहिष्काराचे अस्त्र काढले. राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना नाराजीला तोंड द्यावे लागले तर अलीकडेच गुरुमेहेर कौर या विद्याíथनीला अश्लाघ्य प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. थोडक्यात आपली भूमिका निर्भीडपणे मांडणाऱ्यांना अतिशय किळसवाण्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे; तरीही भन्साळीला झालेल्या मारहाणीचा विरोध करणारे, गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांविरुद्ध जाहीर भूमिका घेणारे ‘ताठ कण्याचे’ लोक आजही आहेत, हीच आनंदाची बाब. दोन्ही देशांची परिस्थिती बघता भारताची समस्या येथील सामाजिक रचनेतच आहे, हे लक्षात येते. राजकीय निष्ठा आणि कला-अभिव्यक्ती यांच्यात संघर्ष उद्भवल्यास भारतीय माणूस राजकीय निष्ठेलाच महत्त्व देतो. तर्कशास्त्र राजकीय निष्ठेला बांधल्याने सारासारविवेकबुद्धी लोप पावते आणि गल्लाभरू प्रवृत्ती वाढीस लागते. त्यामुळे अलीकडच्या काळात साहित्यिक वाचकवर्ग लक्षात घेऊन, वाचकाला पचनी पडेल, अशी वाचकाभिमुख भूमिका घेत सत्याचा मार्ग सोडताना आढळतात तर कलाकार मंडळी सुधारणेपेक्षा मनोरंजनाला जास्त महत्त्व देताना दिसतात. ही भारताच्या कल्याणासाठी नक्कीच भूषणावह गोष्ट नाही. याउलट अमेरिकन कलाकारांनी कैदी न बनता ट्रम्प यांच्या ‘असत्याचा प्रयोगा’विरुद्ध उठवलेला आवाज आनंदाची गोष्ट आहे.

प्रामाणिक सामाजिक आस्था, समाजसापेक्ष अभिव्यक्ती तसेच सामाजिक अन्याय, वैगुण्ये, विषमता यांच्यावर कठोर प्रहार ही कलेची प्रेरणा असायला हवी. टिळकांनी अग्रलेखाद्वारे सरकारवर ओढलेला आसूड अथवा रामनाथ गोएंका यांच्यासारख्या पत्रकारांनी अग्रलेखाची जागा कोरी ठेवून आणीबाणीचा केलेला निषेध ही निर्भीडपणाची काही उदाहरणे कलाकारांनी आदर्श म्हणून लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवणारा आपला समाज त्याशिवाय बदलणार नाही.

वैचारिक भीरुतेचा त्याग करून जागृत नागरिकांनी व्यवस्थेला, अपप्रवृत्तींना सतत अवघड प्रश्न विचारणे आवश्यक आहे. त्यात अनेक कलाकार राजकीय पक्षांचे बटीक झाल्याने निर्भीडपणात प्राण तर उरला नाहीच; उलट सुधारणांचाही विचका झाला. म्हणूनच फ्रेंच युद्धसम्राट नेपोलियन बोनापार्ट त्याच्या युद्धखोरी आणि आक्रमणासाठी ओळखला जात असला तरी चांगल्या लोकांच्या शांत बसण्याचे जे दुष्परिणाम होतात त्यावर त्याने केलेले भाष्य आजच्या काळात चपखल लागू पडते. जन्मत: कोणीच वाईट नसतो. आजूबाजूचे वातावरणच वृत्ती घडवीत असते. अशा वेळी दुष्प्रवृत्तीवर तत्क्षणी कोरडे ओढणे गरजेचे असते. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या ऑस्कर चित्रपट सोहळ्यात कलाकारांनी आपल्या निर्भीडतेचे दर्शन घडवून एक आशेचा किरण जागृत केला आहे. भारतीयांनीसुद्धा आपली मते ठामपणे मांडणे आणि ‘इतरांच्या विशेषत: विरोधी मतांचा आदर करणे’ शिकायला हवे. ‘आपल्याला काय करायचंय? मी एकटय़ाने बोलून, पुढाकार घेऊन काय होणार?’ अशी वृत्ती बदलून क्रांती हीच साहित्य, कला, अभिव्यक्तीची प्रेरणा बनवायला हवी. लक्षात ठेवा ‘शांतता म्हणजेच मूकसंमती.’

डी.जी. रुपारेल कॉलेज, मुंबई

First Published on March 18, 2017 12:54 am

Web Title: loksatta blog benchers winner article on editorial
 1. R
  rajendra
  Mar 24, 2017 at 1:45 am
  बाळ शंकर, कालच न मध्ये एका धर्मवेड्याने हल्ला केला व हे असे हल्ले जळीस्थळी होतच राहतील कारण सारे शांतताप्रिय मुस्लिम आपल्या समजांतर्गतच ह्या धार्मिक जिहादी मूल्यांचा एकजूटपणे जगजाहीर प्रखरआवाज उमटवतच नाहीत. मूळ कारण हेच कि बहुसंख्य मुस्लिम मवाळ हे खूपच भित्रट आहेत, ते हिंदू वा ख्रिश्चन लोक जसा आपल्याच धर्मवेड्यांविरुद्ध वेळोवेळी उठाव करतात तसा ते करू धजत वा इच्छितच नाहीत, तोवर महापौर खान बोले तेच चाले 'बडे बडे शहरोमे ऐसे छोटे छोटे हादसे होते है' असे म्हणत त्यांनी साळसूदपणे मूकसंमती दिली !!
  Reply
 2. R
  rohit
  Mar 20, 2017 at 12:56 pm
  शाब्बास रे 'शंकर' !!! सुरेख .. पहिल्या क्रमांकाचेच लिखाण आणि विचार आहेत हे ..तुझ्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !
  Reply
 3. S
  Shashank
  Mar 18, 2017 at 5:44 pm
  मित्रा दोष नकारात्मक टीका करणार्यांचा नाही तर स्वतः च्या सोयीप्रमाणे आणि समोरची व्यक्ती पाहून टीका करणार्यांचा आहे. एका ठिकाणी देशात असाहिष्णूता माजलीय असे म्हणणारे मालदातील हिंसाचारावर ब्र काढत नाहीत तेव्हा त्यांनी सोयीस्कर टीका करण्याची भूमिका घेतलेली असते! तीच कहाणी तलाकची, अजून एकाहि पुरस्कार वापसी करणाऱ्या पुरोगाम्यांना त्यावर मत द्यावेसे वाटत नाही.त्यामुळे मूळ टीकाकार जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत प्रतिसाद सुधारण्याची अपेक्षा ठेवू नये...
  Reply