प. बंगालात बालमृत्यू झाले तेव्हा ममतांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप नेते गोरखपूरमधील बालमृत्यूंबाबत मात्र शांत बसतात. आजपासून सहा वर्षांपूर्वी, २०११ सालच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कोलकाता येथील बी. सी. रॉय बाल रुग्णालयात पंधरवडय़ात जवळपास ५० अर्भके दगावली. यातील डझनभर बालकांचे मृत्यू केवळ डेटॉलच्या ऐवजी काबरेलिक अ‍ॅसिडसारखे रसायन वापरण्याचा बेजबाबदारपणा रुग्णालयाने दाखवला म्हणून झाले. त्या वेळी विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरला आणि या निर्घृण अनास्थेबद्दल प्रशासनावर सडकून टीका केली. त्या वेळी या प्रशासनाच्या प्रमुख होत्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. त्या वेळी केंद्रात आणि अर्थातच प. बंगालात सत्तेबाहेर असलेल्या भाजपने बॅनर्जी यांना लक्ष्य केले. तेव्हा मुद्दा असा की ५० बालकांच्या निधनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागणाऱ्या भाजपने ६० बालकांच्या मृत्यूंसाठी आपल्याच मुख्यमंत्र्याचा राजीनामा का घेऊ  नये? स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासून होते असे म्हणतात. आणि सध्या तर देशात स्वच्छता अभियानच सुरू आहे. तेव्हा ही प्रशासकीय स्वच्छता सुरुवात आपल्याच पक्षापासून करण्याची हिंमत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार का?, असे मत ‘योगिक बालकांड’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या आठवडय़ाकरिता ‘ योगिक बालकांड’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे.

या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे या उद्देशाने ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक संदीप आचार्य आणि मुंबई महापालिका प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांना बोलते केले आहे.