उबर, ओला या नव्या टॅक्सी सेवांविरोधात पारंपारिक टॅक्सीवाले अशा वादावर परखड मत मांडणाऱ्या ‘सर्जक संहार’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

महाराष्ट्रातील कित्येक शहरांत टॅक्सीवाले मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास थेट नकार देतात. सरकारचा नियम असूनही त्याची सर्रास पायमल्ली होते. हे नियम पाळावेत यासाठी टॅक्सीचालकांच्या संघटनाही आग्रही दिसत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या फंदात पडू नये. आंदोलन करणाऱ्या टॅक्सी-रिक्षावाल्यांचे ऐकावयाचे तर त्याच न्यायाने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी नव्या सेवांवरही नियंत्रणे आणावी लागतात. फणवीस हे करू इच्छितात काय? हा सर्जक संहाराचा काळ आहे आणि अ‍ॅमेझॉन व उबर त्याची प्रतिके आहेत. जो हे समजून घेणार नाही, तो कालबाह्य होईल, असे स्पष्ट मत  ‘सर्जक संहार’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर पुढच्या गुरूवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने मुंबई ऑटो-रिक्षा टॅक्सी मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष शशांक राव आणि  ‘लोकसत्ता’चे ‘खास प्रतिनिधी’ रोहन टिल्लू यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरूवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भिड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही  साथ लाभली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.