सगळे ऋतू सारखे कसे असतील? ‘पानगळ’ थांबली की बरं वाटतं! शीतनिद्रा घेणाऱ्या बेडकालाही दीर्घ कथेसारखं एखादं स्वप्न दिसत असेल असं फक्त माझ्या मनात येतं. मी ‘मोठा’ लेखक कधी होणार? मनपसंत वसंत ऋ तू घेऊन जंगल माझ्या घरापर्यंत येतं. माझ्या घराला वेढतं. मला त्या गोतावळ्यात ओढतं. लेकरांइतकाच मला रानपाखरांचाही लळा आहे! सृष्टीच्या शाळेत माझा पहिला नंबर होता आणि आहे. ‘अ. भि. गोरेगांवकर’ शाळेत मात्र मी एक  डल मुलगा होतो. सगळे चिडवायचे, हसायचे. इंग्रजी शिकवणाऱ्या (अभिनेता सुनील बर्वेच्या आईला) बर्वे बाईंना मात्र वाटायचं की, हा पोरगा भाषेच्या क्षेत्रात काहीतरी करू शकेल. त्या म्हणायच्या ‘दहावी- एस.एस.सी.ला गणितात पास झालास की सुटलास!’ मी खरोखरच पास झालो. माझा विश्वासच बसेना. वाटायचं, पुन्हा ‘पत्र’ येईल की ‘चुकून तुम्हाला उत्तीर्ण करण्यात आले होते, पुन्हा खाली या’. म्हणजे बारावी पास, पण ‘दहावी’ अजून व्हायचाय असं!

माझ्या एकपात्री नकलांचं भूगोल शिकवणाऱ्या रसिक आणि नाटय़प्रेमी पाटील सरांना किती कौतुक होतं! माझी पुस्तकं वाचायला सर आता हयात नाहीत याचं जाम वाईट वाटतं.

खणखणीतपणे बोलणारा मी चुणचुणीत चिमणा होतो. बाकी काही येत नसल्यामुळे मला वाटलं, प्राध्यापकच व्हावे. हा तर ‘जेमतेम’ होता. असा कसा प्राध्यापक झाला? असं मित्र-मैत्रिणींना वाटलं. तरी मी त्यांना पार्टी दिली!

ईश्वर अस्तिवात नाही याची जाणीव तीव्रपणे मला वारंवार होत गेली. आजही मला तेच तसंच वाटतं. ‘हुश्शार’ मंडळींना ही जाणीव होत नसावी. हे लोक कायम कर्मकांडातच गुंग असतात. कलाकार असेल तर मग बघायलाच नको.

देव नसला, तरी तुम्ही सगळे एकमेकांसाठी आहात ही प्रगल्भ आणि वास्तव जाणीव मला डॉ. अनिल अवचटांसारख्या लेखकांच्या पुस्तकांनी दिली. शहीद भगतसिंग यांचं ‘मी नास्तिक का आहे?’सुद्धा चिमुकलं असलं तरी सॉलिड ग्रेट वाटत होतं.

आजकाल माझ्यासमोर इतका समग्र समुद्र आहे आणि मी इतकुसा तिनका! तरीपण माझा प्रवास कुणालाही ‘पाण्यात’ न पाहता सुरूच आहे! खडकाळ बेटावरची देखणी मरमेड मला कधी भेटलीच नाही असं समजू नका. मात्र, काही रम्य कहाण्या शिंपलीत बंद ठेवाव्यात. त्यांचे आपोआप मोती होतात.

मृगाचे इतके किडे बागेत दिसले की, मोजणे अवघड, पण इतके छान, लालम् लाल सजीव..त्यांना ‘किडे’ कसं म्हणायचं हो? नंतर ते पुन्हा ‘भूमिगत’ होतील ना? काजव्यांची बाळंपण पाताळलोकांतच राहतात. छोटासा ‘वाळा’ सापही तिथूनच येतो. अंध वाळवी वारुळात, भुयारविवरात, कष्ट आणि कष्टच करत राहते. वटवाघळं ‘आम्हाला पक्षी म्हणा’ अशी मागणी ध्वनी- प्रतिध्वनीतून करत झुंडीने जातात; पण प्राणीही त्यांना आपलं मानत नाहीत व पक्षीही त्यांच्यात घेत नाहीत. टिटवी स्वत:चं नाव घेत जाते. पण मी तिला म्हटले, ‘बये फार अहंकार असू नये. मीडियातही अशा बाया होत्या. पद सोडलं की लगेच महत्त्व संपते.’ टिटवी म्हणाली, ते सगळं खरं, पण मला ‘बया’ नका म्हणून. ती ‘सुगरण’ घरीच असते. घरटंसुद्धा नर-नवरा बांधतो. तिचं स्वत:चं काय आहे? पिल्लंसुद्धा त्यांचं आकाश मिळालं की, सोडून जाणार! मी भटकी पण महत्त्वाकांक्षी आहे. मला टिटवीच म्हणा. नटवी म्हटलंत तरी चालेल. हाऊसवाइफच्या पातळीवर नका आणू!’..

रेडिओवर ‘मन शुद्ध तुझं’ मास्टर परशुरामच्या आवाजात लागलं होतं. मग आजीचा हात धरून मी ‘प्रभात’ सप्ताहाचे चित्रपट बघायला विलेपाल्र्याला जायचो, ते आठवलं. लखलखीत गोरी आजी माझ्या हाताचं बोट सोडून अचानक अनंतात नाहीशी झाली. नंतर मालवणी बोलीत माझ्याबरोबर बोलणारं, कवी नेरुरकरांची रेकॉर्डवरची गाणी मला शिकवणारं कुणी उरलंच नाही!

‘डबलसीट’ फिरणारी पोरं आजही ‘मन शुद्ध तुझं’ नव्याने गुणगुणत आहेत याचं मात्र खूप समाधान वाटतंय.

सायकलचा एक ‘सांगाडा’ मी दुरुस्त करून, रंग लावून घेतला आणि खूप वर्षांनंतर सायकल हाणत नेली, तेव्हा मला कुणी विचारलं असतं, तर मी माझं वय ‘सोळा’ सांगितलं असतं. हे वय धोक्याचं आहेच. व्यसन लागू शकतं. कालच एक रिटायर्ड गृहस्थ मला ‘बसायचं का संध्याकाळी?’ विचारत होते. म्हणजे अजूनही मला ‘सवय’ लागू शकते. नकोच ते! माझ्या आजोबांची सावकारी बुडाली ती व्यसनांमुळे. पूर्वजांच्या इतिहासापासून आपण काही शिकायला नको? आम्ही डल मुलं शिकतो बुवा!

इतकी बडबड, गडबड आसपास आता वाढली आहे, यंत्रं इतका आवाज करू लागली आहेत की हिरवी मुनियासारखे पाचूच्या रंगाचे पक्षी तर इकडे फिरकणारही नाहीत. प्रत्येकाला शांतता लागते. तीच कोकण गमावून बसलंय. ही मोठीच समस्या आहे. राजकारणी लोकांना, नेत्यांना  त्याची जाणीव काही वर्षांनी होईल, तेव्हा फार उशीर झालेला असेल!

‘एन. एस. एस.’च्या शिबिरात पाहुणा म्हणून गेलो आणि त्यांचाच होऊन बसलो. मुलांच्या मनात शंका- कुशंकांचे किती कल्लोळ असतात. वक्त्याला नंतर कितीतरी शंका विचारल्या जातात. तरी पुष्कळ उरतात. लैंगिक अज्ञान तर फारच आहे. अंधविश्वासाचं तण तसंच आहे. पण हार पत्करून चालणार नाही. बोलावं लागेल, लिहावं लागेल. ब्लॉगर्सच्या हत्या झाल्या तरीही लढावं लागेल.
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com