सखे, तुझ्या वेणीतला गजरा किती सुसंस्कृत आहे. मला पाहिल्यावर ओळखीदाखल हसतो. तेव्हा मी मनातल्या मनात शंभर वर्षे जगतो. त्या गजऱ्याच्या सुवासाने तुझ्या समीप दरवळतो. संमोहनाच्या नि:शब्द रानात तुझ्या आठवणींना गोंजारतो. ओढ लागल्या जीवनाला आसवांनी शृंगारतो. कुजबुजणाऱ्या मौनाचे शब्द कवितेच्या सुगंधी गजऱ्यात गुंफून घेतो. फुलाफुलास चुंबताना मीच बहरून येतो. तुझ्या डोळ्यांच्या कमानीवर हृदयाचा मोहोर तोलतो. प्रीत व्याकूळ नजरेनं सारे शहर सोलतो. काजव्यांच्या प्रकाशात झुरणाऱ्या सांजेचा शोध घेतो. पाणावल्या नजरेनं नदीचा वेध घेतो.

तुला सांगतो, स्वत:ला इतकी सावरू नकोस. लोक सगळं आवरून तुझं सावरणं पाहत असतात. अन् मग ते स्वत:ला नको तितके सावरू लागतात. हे सत्य आहे, की तुझं दिलखुलास हसणं फुलांनी हसावं. तुझी नजर झुकावी तसे फुलांचा भार झालेल्या फांदीनं झुकावं. पाखरांनी चोचीनं तुझं लावण्य वेचावं. ऋ तूंनी तुझा वसंत डोळे भरून पाहावं. रात्रींनी तुझ्याकडून रुसणं शिकावं. दिवसांनी तुझ्या हसण्यात मावळावं. वाऱ्यानंही तुझा पदर धरून चालावं. कोकीळेनंही तुझ्याशी अदबीनंच बोलावं. तू डोळे उघडले, की झुंझूमुंजू व्हावं. तू ओठ दुमडले, की सांजेनं उजळावं. तुझ्या डोळ्यांच्या ज्योतीत मी केशरी स्वप्न जपावं. पापणीच्या पदराआड अवघं आयुष्य निजावं. मी तुझ्यासाठी जगावं. तुझ्या मोरपंखी मिठीत तू मला जगवावं.

सांग सखे, केव्हापासून नजरेत ही नजरेची साठवण? केव्हापासून रोमरंध्रात हळव्या स्पर्शाची भुलावण? किती बरं शिंपायचे घन व्याकूळ मनाचे अंगण? किती झंकारती काळजात संवेदनाचे पैंजण?

किती जपायचे दोघांनीही ओठांचे एकटेपण? मन भरूनही मनाचे का हे रितेपण? किती करायची वेदना हुंदक्यांनी समृद्ध? कसे करायचे एकांतात स्वत:शीच युद्ध? किती मोजावे तुला थेंबणाऱ्या पापणीतून? किती वेचावे आकाशी सांडलेल्या चांदण्यातून? किती लावावे काळजावर तुझ्या आठवांचे सांजदीप? कधी धुंवाधार हा पाऊस, कधी ही रिपरिप. नजरेच्या काठावर उभी ओलेती सकाळ. कितीही भरली तरी रितीच ओंजळ. आभाळ थांबलं तरी बरसणं चालूच असतं. वारा स्थिरावला तरी मनाचं वाहाणं सुरूच असतं. सांग, सांज फुलून आली तरी अंग का कोमेजतं? मन मूक असतानाही तन कसं बोलतं? तुला जीव लावताना माझा जीव जातो. स्वत:वरही जीव लावायचा असतो हे का बरं मी विसरतो?

आज अख्खे आकाश मी तुला बहाल केले. माझ्या खिडकीतून डोकावणारा एक इवलासा तुकडा फक्त मी माझ्यासाठी राखून ठेवलाय. हा इवलासा तुकडा माझा असेल. फक्त माझा. का? असा प्रश्न विचारू नकोस. या तुकडय़ात मी चांदण्यांच्या फुलांची बाग फुलविणार आहे. तुझ्या वेणीतल्या गजऱ्यासाठी! निदान फुलांनी तरी माझी ओळख विसरू नये म्हणून…
रंजनकुमार शृंगारपवार – response.lokprabha@expressindia.com