गजेंद्र भानुदास मोकाशी, तेवीस नंबर फ्लॅटमधल्या भानुदास मोकाशींचे तृतीय चिरंजीव, वय वर्षे १३, इयत्ता सातवी. सहामाही चाचणी परीक्षेत त्याने मिळविलेल्या गुणांपेक्षा त्याने उधळलेले गुणच त्याच्या गुरुजनांसह आपल्या सर्वासमोर अमोल ज्ञानभंडार खुले करतात. त्याची ही एक छोटीशी झलक!

भाषा या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न होता. ‘रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या खालील म्हणी/ वाक्प्रचारांचे सोप्या शब्दांत विश्लेषण करा,’ पेपरसेटरला नंतर ‘मला हा प्रश्न परीक्षेत विचारायची अवदसा का आठवली?’ असे नक्कीच वाटले असेल. का? – हे पुढे कळेलच. वाचा गजूचे प्रताप!

१) घरोघर मातीच्या चुली : पूर्वी घराघरांतून मातीच्या चुलीवर स्वयंपाक करीत. लोकांना याची अजिबात लाज वाटत नसे. (नाका-डोळय़ांतून धुरामुळे पाणी आले तरीही!)

२) खेळखंडोबा (होणे) : माजी क्रिकेटपटू कै. खंडू रांगणेकर यांना त्यांच्या वडिलांनी प्रत्येक मॅचच्या आधी दिलेला आशीर्वाद!

३) चोराच्या मनात चांदणे : चोर रात्री चोरी करायला बाहेर पडल्यावर मोबाइलवर ‘चांदण्यात फिरताना’

किंवा ‘चांदणे शिंपीत जाशी’ ही गाणी ऐकतात.

४) तीन चोक तेरा : हे नक्कीच आमच्या क्लासमधल्या प्रभ्याबद्दल असणार. तो नेहमीच आम्हा सर्वाच्या एक स्टेप पुढे असतो.

५) नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे : सोनार आळीत नळय़ांमधून खूप हवा सोडतात. त्याने वायुविजन होऊन तेथील हवा कायम शुद्ध राहते.

६) पुत्र व्हावा ऐसा गुंडा : ज्या आई-बापांना असे वाटत असेल त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘रावण’ (किंवा मुलीचे नाव अर्थात ‘शूर्पणखा’) ठेवावे.

७) नाचता येईना अंगण वाकडे : दामल्यांच्या निर्मलेची बरीच वर्षे नाचाच्या क्लासला जाऊनही फारशी प्रगती झाली नाही. शेवटी दामल्यांनी आपल्या अंगणात फरश्या बसवून घेतल्या.

८) उंटावरून शेळय़ा हाकणे : राजस्थानातल्या वाळवंटातले धनगर असे काम करतात.

९) लंकेत सोन्याच्या विटा : असे असेल तर श्रीलंकेतला वीटभट्टी कामगारसुद्धा स्वत:च्या मर्सिडीजमधून कामावर जात असेल.

१०) लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा : आपण लहान असतानाच फक्त साखरेला, रव्याला मुंग्या लागतात. मोठे झाल्यावर नाही. कदाचित तेव्हा डायबिटिसमुळे या जिनसा घरात आणत नसावेत.

११) नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा : आमच्याकडे घरकामाला सोनुबाई येताना नेहमी एक पिशवी आणतात. बहुधा त्यात कथिलाचे भेंडोळे असावे. कारण त्यांचा नवरा कल्हईवाला आहे.

१२) भिकेचे डोहाळे लागणे : शेजारच्या गल्लीतल्या भिकूशेटच्या (चोर लेकाचा) बायकोला लागलेले डोहाळे.

१३) वाळवंटातील जहाज : हे वाळवंटात एकदम कसे येईल? आधी तेथे समुद्र बांधावा लागेल.

१४) खाल्ल्या घरचे वासे मोजणे : ज्यांच्या घरी आपण खात असतो तिथेच अनेकदा नंतर खरकटे, उष्टे टाकले की त्यांचे सतत वासे (‘वास’चे अनेकवचन) येतात आणि मग ते आपल्यालाच मोजावे लागतात.

१५) नाकाने कांदे सोलणे : फीट असलेल्या माणसाने हे केले की त्याची फीट जाते असे म्हणतात. कदाचित सर्दी, पडसेही पळून जात असावे.

१६) हलवायच्या घरावर तुळशीपत्र : आमच्या समोरचा मामा हलवाई रोज रात्री घरावरच्या गच्चीवर झोपतो. कारण तिथे खूप  तुळस लावली आहे त्यामुळे डास, माश्या येत नाहीत. बहुगुणी तुळस कीटकनाशक असते.

१७) पंत गेले, राव चढले : गेल्या आठवडय़ात तिसऱ्या मजल्यावरचे काशिनाथपंत वारले. त्यांचे वयस्क मित्र रामराव यांना त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तीन तीन जिने चढून जावे लागले.

सहामाही परीक्षेच्या निकालाच्या दिवशी गजूबाळाचे शिक्षक त्याला म्हणाले, ‘‘गजेंद्रनाथा, हे महान बालका, तुला त्रिवार वंदन! आता हे तुझे अगाध, अमूल्य संशोधन तुझ्या जन्मदात्यांच्या पायावर नेऊन घाल. अगदी भरून पावतील ते.’’ बिचारे पेपरसेटर ते हेच! त्यांनी बालक गजेंद्राची उत्तरपत्रिका त्याला अर्पण केली.

चिरंजीवांनी मग घरी जाऊन मोठय़ा कौतुकाने ती आपल्या आई-वडिलांना दाखवली. हे सर्व वाचल्यावर अगदी गहिवरून आले त्यांना! गदगदल्या स्वरात ते गज्याबाबाला म्हणाले, ‘‘बाळ गज्या,  असाच जा आणि शेजारच्या जोशीकाकूंना तडक बोलावलंय म्हणून सांग. त्यांच्याकडून द्रिष्ट काढून घ्यावी म्हणतो. शुंभा तुझी नाही. आम्हा दोघांची.’’

धन्य ते माता-पिता. प्रसविला पुत्र ऐसाची गुंडा! धन्य धन्य तो सुपुत्र!!
संजय साताळकर – response.lokprabha@expressindia.com