औकात दाखवू’, ‘कोथळा काढल्याशिवाय राहणार नाहीया व अशा दर्पोक्त्यांनी गाजलेल्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी स्पष्ट झाले. एरवी शहरी भागापुरत्याच मर्यादित असलेल्या भाजपने दहापैकी सात महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळवतानाच जिल्हा परिषदांमध्येही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. त्यामुळे राकट आणि कणखरतेबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या देशा म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला आता कमळाच्या देशा ही नवी ओळख मिळू लागल्याचे स्पष्ट होत आहे..

शेठजी-भटजी आणि शहरी भागातील पक्ष म्हणून भाजपला आतापर्यंत हिणविले जात होते, पण लोकसभा-विधानसभेपाठोपाठ महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाने हा पक्ष राज्यात आता खऱ्या अर्थाने रुजल्याचे दिसत आहे.

राज्यातील दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. दहापैकी सात महानगरपालिकांमध्ये भाजपचे कमळ फुलले. मुंबईत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. एकेमकांना पाणी पाजण्याची भाषा करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये फक्त दोन जागांचे अंतर आहे. ठाण्याचा अपवाद वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये भाजपची कामगिरी चांगली झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये भाजपला बहुमत किंवा सर्वाधिक जागा मिळाल्या. ठाण्यात मात्र भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. जिल्हा परिषदांमध्ये जळगावमध्ये भाजपला बहुमत मिळाले. लातूर या काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ल्यात भाजपला बहुमत मिळाले. सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचे कमळ फुलले. विदर्भातील अमरावती आणि यवतमाळचा अपवाद वगळता भाजपला चांगले यश मिळाले.  नोटाबंदीचा फटका भाजपला बसेल असेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्या दृष्टीने प्रचारात भर दिला होता. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर लगेचच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा भाजपला तापदायक ठरला नव्हता. ग्रामीण भागात हा मुद्दा भाजपच्या विरोधात जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण ग्रामीण भागातही मिळालेले यश लक्षात घेता नोटाबंदीचा फटका भाजपला बसला नसल्याचे स्पष्ट झाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडाला. एकाही महानगरपालिकेत या दोन्ही पक्षांना सत्ता मिळालेली नाही किंवा चांगल्या जागाही मिळालेल्या नाहीत.

पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा या दोन मुद्दय़ांवर भाजपला विजय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला जनतेचा विश्वासच या मतदानातून प्रतिबिंबित होत आहे. आम्ही राजे नाही, जनतेचे सेवक आहोत.   देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सत्ता आणि संपत्ती यांचा वापर करून भाजपला हा विजय मिळाला आहे. मतदारयाद्यांतून अनेकांची नावे गायब असणे यामागे मोठे षड्यंत्र आहे. मराठी मतदारांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार.   उद्धव ठाकरेशिवसेना पक्षप्रमुख