विधानसभा निवडणुकीत भाजपची मुंबईतील ताकद वाढली आहे, याचे भान आणि ज्ञान शिवसेनेला आहे का?, असा सवाल भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईतील निम्म्यापेक्षा अधिक प्रभागांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

‘विधानसभा निवडणुकीत मुंबईतील निम्म्यापेक्षा जास्त प्रभागांमध्ये भाजप आघाडीवर आहे. याचे भान शिवसेनेला असायला हवे. विधानसभा निवडणुकीत घाटकोपर ते मुलुंड दरम्यान शिवसेनेचे काही आमदार निवडून आले. मात्र या ठिकाणच्या २४ पैकी २१ प्रभागांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे, याचे भान शिवसेनेला असायला हवे,’ असे खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला भाजपच्या वाढलेल्या ताकदीची जाणीव करुन देण्यासोबतचे खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन शिवसेनेवर शरसंधान साधले. ‘आमचा लढा मुंबईला माफियांपासून मुक्त करण्यासाठी आहे. मुंबईला खड्डेमुक्त आणि माफियामुक्त करायचे आहे. मुंबईला माफियामुक्त करण्यासाठी सोबत यावे लागेल,’ असेही खासदार किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील युतीसाठी भाजप आणि शिवसेनेत अद्याप एकही बैठक झालेली नाही. उद्या (सोमवारी) भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये युती संबंधी पहिली बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच भाजपचे नेते शिवसेनेवर शरसंधान साधताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर टीका केली नव्हती. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये युती करण्याबद्दलची चर्चा होण्याच्या एक दिवस आधीच सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सोमय्या यांच्याआधी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली होती.