जिल्हा परिषद निवडणूक

भाजप-सेनेचे राज्य पातळीवरील नेते अजून युतीचा राग आळवत असले तरी पुढील महिन्यात होत असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे या दोन्ही पक्षांच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात अन्यत्र काहीही झाले तरी येथे दोन्ही पक्षांतर्फे ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्यात येणार आहे.

गेली सुमारे २५ वष्रे राज्य पातळीवर युती असलेल्या भाजप आणि शिवसेनेने मागील विधान परिषद आणि नुकतीच झालेली नगर परिषद निवडणूकही स्वतंत्रपणे लढवली होती. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणूका पूर्वीप्रमाणे युतीच्या झेंडय़ाखाली लढवणार असल्याचे दोन्ही बाजूंच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी जाहीर केले. तसेच त्यानुसार चर्चेसाठी वेळापत्रकाचीही व सेनेच्या प्रतिनिधींचीही घोषणा झाली. मात्र भाजपाचे बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पावस येथे मंगळवारी झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, जिल्हा प्रभारी राजन तेली, जिल्हाध्यक्ष बाळ माने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय बुधवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केला. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत, सदानंद चव्हाण इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात शिवसेना बलवान असून मावळत्या सभागृहातील ५७ सदस्यांपैकी सेना ३१, राष्ट्रवादी काँग्रेस १६, भाजपा ८, आणि काँग्रेस व बविआ प्रत्येकी १ असे बलाबल होते. त्या निवडणुकीत भाजपाच्या मर्यादित यशामध्येसुद्धा सेनेचा वाटा होता. या वेळी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्यामुळे  काही ठिकाणी सेनेच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी त्रास होऊ शकतो. पण भाजपाचे मात्र संख्याबळ घटण्याचीच शक्यता आहे. जिल्ह्य़ात सेनेचे तीन आमदार असले तरी भाजपची पाटी कोरीच आहे. त्याचाही परिणाम या पक्षाच्या कामगिरीवर होणे स्वाभाविक आहे. तसेच जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात उदय सामंत आणि राजन साळवी या दोन आमदारांमुळे सेनेचे वर्चस्व असले तरी उत्तर भागातील पाच तालुक्यांमध्ये भास्कर जाधव व संजय कदम हे दोन आमदार आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामुळे  राष्ट्रवादीचा जास्त प्रभाव आहे. सेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी इत्यादी नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. त्याचाही फटाक सेनेला बसू शकतो.