येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून निवडणुकीच्या कामासाठी तब्बल ४१ हजार ३२९ कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमधील ७,३०४ मतदान केंद्रांवर ९१ लाख ८० हजार ४९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी पालिकेला सुमारे ९५ कोटी रुपये खर्च आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

मुंबईमध्ये तब्बल ९१ लाख ८० हजार ४९१ मतदार असून त्यामध्ये ५० लाख ३० हजार ३६१ पुरुष आणि ४१ लाख ४९ हजार ७४९ महिलांचा, तसेच ३८१ इतरांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी ४१ हजार ३२९ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यापैकी ३५ हजार ५२० कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत राहणार असून ४ हजार ८०९ कर्मचारी राखीव वा इतर संबंधित कामांसाठी कार्यरत राहणार आहेत.

निवडणूक साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी तब्बल ३ हजार ६०० वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच निवडणुकीसाठी ७ हजार ९९४ कंट्रोल युनिट, ९ हजार २७९ बॅलेट युनिटचा समावेश आहे. निवडणुकीसाठी सुमारे ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्याव्यतिरिक्त मतदार याद्यांच्या छपाईसाठी सुमारे ४० लाख रुपये, तर मतपत्रिकांच्या छपाईसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आचारसंहितेचे  पालन व्हावे यासाठी विविध पथके सज्ज करण्यात आली आहेत. त्यात १३ स्टॅटिक पथके, ९८ भरारी पथके तर ३९ व्हिडीओ सव्‍‌र्हेलियन्स पथकांचा समावेश आहे.