दिल्लीतील नेत्यांची कुमक मुंबईत

मराठी मते शिवसेनेकडे वळत असल्याने भाजपने मराठी मतदारांबरोबरच उत्तर भारतीय, गुजराती व अन्य भाषिकांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. प्रखर हिंदूुत्ववादी व उत्तर प्रदेशातील भाजप नेते योगी आदित्यनाथ यांना भाजपने रविवारी मुंबईत आणून चार सभा घेतल्या, तर राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी मालाड-मालवणी परिसरात पदयात्रांच्या माध्यमातून काही भाग िपजून काढला. दिल्लीतून ‘कुमक’ मागवून अन्य भाषिकांच्या मतांची बेगमी करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत, तर झोपु योजनेतील घरांचे आकारमान २६९ वरून वाढवून ३०५ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचा किती फायदा भाजपला मिळेल, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी बरेच डिवचूनही शिवसेना-मनसेने ‘मराठी कार्ड’ न खेळल्याने उत्तर भारतीयांसह अन्य भाषिकांची मते आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश मिळत नव्हते. नोटाबंदी व अन्य मुद्दय़ांवरून गुजराती समाज काही प्रमाणात भाजपवर नाराज आहे. त्यामुळे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, खासदार मनोज तिवारी, योगी आदित्यनाथ, शाहनवाज हुसेन, पुरुषोत्तम रुपाला आदी नेत्यांची ‘कुमक’ भाजपने मागविली. शिवसेनेने युती तोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यालाच दुख दिल्याची टिप्पणी योगी आदित्यनाथ यांनी केली असून तिवारी यांनीही शिवसेनेलाच दोष दिला आहे. या सर्व नेत्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आदी परिसरातील जनतेशी त्यांच्या भाषेत संवाद साधला. आदित्यनाथ यांनी कालिना, गिरगाव, अंधेरी, वाकोला या परिसरांत रविवारी सकाळी सभा घेतल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मनसेची मराठी मते शिवसेनेकडे वळत असताना आणि मराठी कार्ड न खेळले गेल्याने अन्य भाषिक मते वळत नसल्याने भाजपनेते चिंतेत होते. त्यामुळे शिवसेनेने मुंबईत परप्रांतीयांच्या लोंढय़ांना आतापर्यंत कसा आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर हल्ले केले, याबाबत भाजपकडून आक्रमक रीतीने प्रचार सुरू आहे.

‘झोपु’ घरांच्या आकारवाढीचा फायदा किती?

झोपु योजनेतील घराचे आकारमान वाढविण्याबाबत शेवटच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले असले तरी ते मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ मिळणार का व त्याचा राजकीय लाभ उठविता येईल का, अशी चर्चा सुरूआहे. या योजनेसाठी चापर्यंत चटईक्षेत्र वाढविताना हे केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी चालले आहे, झोपडपट्टीवासीयांच्या घरांचे आकारमान वाढले आहे का, अशी टीका झाली होती. त्याचे निराकरण करण्यासाठी व राजकीय लाभ उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही राजकीय खेळी केली आहे.