शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या रक्तामध्ये हिंदूत्व आहे. या रक्ताच्या नात्यापोटी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे असे मत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडले आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र यावे यासाठी प्रयत्न करणार असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. सेनेला ८४ तर भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला आहे. २२३ जागा असलेल्या मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ११४ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. त्यामुळे या दोघांना पुन्हा युती करावी लागेल असे दिसते. या सर्व घडामोडींवर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील ट्विटरवर भाष्य केले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये रक्ताचे नाते आहे. दोघांच्या रक्तात हिंदूत्वच असल्याने या दोघांनी एकत्र यायला पाहिजे असे ते म्हणालेत. दोघांनी एकत्र यावे यासाठी मी प्रयत्न करणार असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीवरही त्यांनी ट्विटरवर भाष्य केले.भाजपने उत्तरप्रदेशमध्ये हिंदूत्वाच्या आधारे प्रचार केल्यास त्यांना बहुमत मिळेल. मुंबईसारख्या पाश्चिमात्य शहरात हिंदूत्वाच्या आधारे ९० जागा मिळतात. यावरुनच हे स्पष्ट होते असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना व भाजप हे दोनही पक्ष राजकीय गणिते जुळवून सत्तास्थापनेसाठी दावा करणार हे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, भाजपचे आशीष शेलार यांनी महापौरपदावर दावा केला. शिवसेना हा सर्वाधिक जागा मिळविलेला पक्ष असल्याने आमचाच महापौर होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण त्याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असे सांगून त्यांनी काही पत्ते हातातच राखून ठेवले. शिवसेनेच्या सध्याच्या संख्याबळाच्या तुलनेत जेमतेम आठ जागांची नव्याने भर पडली आहे, तर भाजपने दुपटीपेक्षा अधिक जागांवर हक्क प्रस्थापित केला आहे. भाजपची ताकद मुंबईत कित्येक पटींनी वाढली, तर शिवसेनेची केवळ फूटपट्टीने वाढली असे सांगून शेलार यांनी सेनेला त्यांची जागा दाखवून दिल्याने, आता सत्तास्थापनेच्या हालचालीतही भाजप आक्रमक राहणार हे स्पष्ट झाले आहे. शिवाय, राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने व मुंबई महापालिकेत जवळपास सारखेच संख्याबळ असल्याने, भाजपला वगळून शिवसेनेने पालिकेतील सत्तेचे गणित जुळविले तरी सभागृहाची स्थिती अधांतरी राहण्याचीच शक्यता असून, स्थिर सत्तेच्या दृष्टीने ते परवडणारे नसल्याने एकत्र येण्याखेरीज पर्याय नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी व्यक्त केलेल्या मताला महत्त्वप्राप्त झाले आहे.