मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवून शिवसेनेची जिरवण्याचे भाजपचे स्वप्न धुळीला मिळाले असले तरी काही भागांमध्ये पक्षाने लक्षणीय यश मिळवले आहे. अमराठी लोकसंख्या असलेल्या मुलुंड आणि गोरगावमध्ये भाजपने हे यश मिळवले आहे. यापैकी गुजराती बहूल परिसर असलेल्या मुलुंडमधील सहाही जागांवर भाजपला विजय मिळवला आहे. याठिकाणी शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. त्यामुळे किरीट सोमय्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या सर्व जागांवर विजय संपादन करत किरीट सोमय्या यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. यापूर्वी मुलुंडमध्ये भाजपचे केवळ तीन नगरसेवकरच होते. तर इतर तीन जागांपैकी दोन ठिकाणी राष्ट्रवादी आणि एक ठिकाणी मनसेचा नगरसेवक होता. मात्र, यंदा भाजपने या सगळ्यांना धूळ चारत सर्व जागांवर विजय मिळवला. शिवसेनेतून भाजपमध्ये जाण्याची रिस्क घेतलेल्या प्रभाकर शिंदे यांना विजय मिळाला आहे. मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक १०३ मधून मनोज कोटक, १०४ मधून प्रकाश गंगाधारे, १०५ मधून कल्पना केणी, १०६ मधून प्रभाकर शिंदे, १०७ मधून समिता कांबळे आणि १०८ मधून नील सोमय्या विजयी झाले.
गोरेगावमध्येही भाजपने सातपैकी तीन जागांवर विजय मिळवून शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांना मोठा धक्का दिला आहे. याठिकाणी पुन्हा एकदा भाजपच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर आणि सुभाष देसाई यांच्यात सामना होता. मात्र, भाजपने विधानसभेप्रमाणे या भागात पुन्हा एकदा बाजी मारली आहे.