मुंबई महानगरपालिकेत भाजपला लक्षणीय यश मिळाल्यामुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि किरीट सोमय्या यांचा भाव आता चांगलाच वधारण्याची शक्यता आहे. आशिष शेलार आणि किरीट सोमय्या या दोन्ही नेत्यांनी पालिकेच्या कारभारावर टीका करत शिवसेनेला अंगावर घेण्याची हिंमत दाखविली होती.  या दोघांनीही पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत सातत्याने शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. आशिष शेलार यांनी प्रत्येकवेळी शिवसेनेच्या ‘अरे’ ला ‘कारे’ ने उत्तर देण्यात तत्परता दाखविली होती. तर किरीट सोमय्या यांनी पालिकेत माफियाराज सुरू असून  वांद्र्यातील बॉस आणि त्यांच्या पीएच्या आदेशावरूनच हे सुरू असल्याचे सांगत थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात चांगली कामगिरी न करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्र्यांची निवडणुकीनंतर खैर नसल्याचे संकेत दिले होते. तसेच निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यास मंत्रिपद गमवावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळणे शेलार आणि किरीट सोमय्या यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
मुंबई महानगपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला ८१ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. भाजपच्या पालिकेतील सध्याच्या ३१ नगरसेवकांच्या तुलनेत हे यश अचंबित करणार आहे. त्यामुळे आता आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांना या कामगिरीचे योग्य बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात ११ मंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यात मुंबईचा चेहरा असणाऱ्या एकाही नेत्याचा समावेश नव्हता. याबाबत छेडले असता मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईतील नेत्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आशिष शेलार यांना स्थान  मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खासदार किरीट सोमय्या यांचे पक्ष संघटनेतील वाढण्याची शक्यता आहे.