महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि भाजप कोणाला उतरविणार याबाबत शनिवारी पालिकेमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पालिका मुख्यालयातील शिवसेनेच्या कार्यालयात दुपारनंतर या उत्सुकतेचे रुपांतर धाकधुकीत बदलले आणि महापौरपदासह सर्वच समित्यांच्या निवडणुका भाजप लढविणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसैनिकांनी नि:श्वास टाकला.

शिवसेनेकडून महापौर पदासाठी चार-पाच नगरसेवकांची नावे घेतली जात होती. ‘मातोश्री’ यापैकी कोणाला उमेदवारी देणार याबद्दल पालिका मुख्यालयात शनिवारी सकाळपासूनच  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर पदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजताच भाजप कोणती भूमिका घेणार याबाबत चाचपणी सुरू झाली.महापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप कोणाला उतरविणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. भाजप कोणाचा पाठींबा मिळविणार, कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळविणार याबाबतही तर्कवितर्क लढविले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजताच हळूहळू पालिकेतील वातावरणात तणाव जाणवू लागली. भाजप शिवसेनेसोबत युती करणार असल्याची चर्चाही रंगली होती.

पालिका चिटणीस कार्यालयात महापौर पदाचा अर्ज भरुन झाल्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे अन्य नेते कार्यालयातच ठाण मांडून होते. दुपारचे ४.३० वाजून गेले तरी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू न झाल्याने शिवसेना कार्यालयातील अस्वस्थता वाढत होती. अखेर महापौर पदासह पालिकेतील कोणत्याच समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार उभा करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आणि शिवसेना कार्यालयातील उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पारदर्शकतेचे पाहारेकरी बनून भाजप नगरसेवक काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यामुळे शिवसेना नगरसेवकांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. भविष्यात पालिका सभागृह आणि वैधानिक समित्यांमध्ये होणाऱ्या शीतयुद्धाची चाहुल लागल्यामुळे शिवसेना नगरसेवकांच्या चेहऱ्यावर काळजीची काजळी दिसू लागली.