ज्या लोकांना काँग्रेससोबत जायचे आहे त्यांनी जावे भारतीय जनता पक्ष मात्र काँग्रेसची मदत कधीही घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुंबईतील नरीमन पॉइंट येथे झालेल्या विजयोत्सवात त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई महानगर पालिकेमध्ये आपला महापौर निवडून यावा यासाठी शिवसेना काँग्रेसची मदत घेणार आहे अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचा सर्व भारतभर विस्तार होत आहे. ओडिशा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या दोन्ही राज्यातील विजयाचा उत्सव आपण साजरा करत आहोत असे ते म्हणाले. आज रायगडावर जाऊन आपण छ. शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांना आपला विजय अर्पण केल्याचे त्यांनी म्हटले. छ. शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच भाजप अनेक ठिकाणी निवडून आला असल्याचे त्यांनी म्हटले.

आव्हानांचा सामना करण्याकरता ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही महाराजांना प्रार्थना केली. असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष केवळ लाटेवर निवडून आला असे म्हटले होते. परंतु ही लाट विश्वासाची लाट आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही लाटेवर निवडून आलो नाहीत असे त्यांनी म्हटले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला असे त्यांनी म्हटले. राज्यासमोर अनेक आव्हाने आणि आपण त्या आव्हानांचा सामना योग्य रितीने करत आहोत असे त्यांनी म्हटले. नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु जनता मोदींच्या पाठीमागे राहिले असे ते म्हणाले.

मुंबईमध्ये मिळालेला विजय अभूतपूर्व असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षावर सर्वांनीच विश्वास दाखवला आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली होती. काँग्रेस हा अतिशय भ्रष्ट पक्ष आहे. त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असे ते म्हणाले. ज्यांना काँग्रेससोबत जाण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर जावे असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. आपण काँग्रेससोबत जाणार नाही, नाही, नाही म्हणजे नाही असे ते यावेळी म्हणाले. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांच्या मेहनतीमुळेच भाजप विजयी झाल्याचे त्यांनी म्हटले.