गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांचा पहिला टप्पा संपला असून, राज्यातील दहा महापालिका निवडणुकांचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या गुरुवारी मतमोजणीनंतर कोण किती ‘पाण्यात’ आहे ते स्पष्ट होईल. तत्पूर्वी इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शिवसेना मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. पण एक्झिट पोलनुसार २२७ जागांच्या मुंबई महापालिकेत शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल, असे दिसत नाही. त्यामुळे एक्झिट पोल खरे ठरले तर मुंबई महापालिकेत आणि राज्यात काय सत्ता समीकरणे जुळतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत

मुंबई
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६

पुणे
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३

ठाणे
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३

नागपूर
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४