मुंबई महापालिकेची निवडणुकीच्या तोंडावरच मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलेली पाहावयास मिळत आहे. उमेदवारांच्या निवडीवरून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि गुरुदास कामत असे दोन गट पडले आहेत, असे समजते. मात्र, मुंबई काँग्रेस अंतर्गत कोणतीही दुफळी नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी देत हे वृत्त फेटाळून लावले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचा राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेना – भाजप युतीची चर्चा सुरू असतानाच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र आहे. उमेदवार निवडीवरून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि नेते गुरुदास कामत यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. संजय निरुपम यांच्या कामाच्या पद्धतीवर गुरुदास कामत नाराज आहेत. विविध पातळ्यांवर सातत्याने डावलले जात आहे, असा संदेश त्यांनी काँग्रेसमधील सदस्यांना पाठवल्याचे कळते. निरुपम यांच्या कामाच्या पद्धतीमुळे उमेदवारांच्या निवड प्रक्रियेतून, तसेच प्रचारातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी कळवले आहे, असे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. मुंबई काँग्रेसच्या उमेदवारांच्या निवडीसाठी एका बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीला संजय निरुपम, मिलिंद देवरा, प्रिया दत्त यांच्यासह इतर नेते उपस्थित असताना, गुरुदास कामत यांनी मात्र, या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये निरुपम आणि कामत असे गट पडले आहेत, असे दिसते. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशांनुसार, उमेदवार निवडीसाठी एक विशेष प्रक्रिया तयार करण्यात आली असून, त्यावर कामत यांच्यासह सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे, असे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. कामत यांच्याविषयी आताच काही बोलणार नसून, सध्या शिवसेना आणि भाजपविरोधात आपण लढणार आहोत, असे सांगून त्यांनी कामतांबाबत अधिक बोलणे टाळले आहे.

संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या वादावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई काँग्रेस अंतर्गत कोणतीही दुफळी नाही, अशी प्रतिक्रिया राणे यांनी निरुपम आणि कामत यांच्यातील अंतर्गत वादावर दिली आहे. दरम्यान, निरुपम आणि कामत गटात वाद निर्माण झाल्याचे त्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे.