महापौरपदाच्या निवडीसाठी काँग्रेसने शिवसेनेला मदत करू नये असे पत्र गुरुदास कामत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ८४ जागा आल्या. काही अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता त्यांचे संख्याबळ ८९ झाले आहे. महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेला आणखी २५ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे ३१ नगरसेवक आहेत. या परिस्थितीमध्ये काँग्रेस शिवसेनेची मदत करणार का याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. जर शिवसेनेनी राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर त्यांना पाठिंबा देण्याचा आम्ही विचार करू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. त्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरला.

महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची मदत घेणार का असे शिवसेना नेते अनिल परब यांना विचारले असता त्यांनी, कोणताही पक्ष शिवसेनेला अस्पृश्य नाही असे विधान केले. भाजपला काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती कशा चालू शकतात असा सवालही त्यांनी यावेळी केला.  आपण गेली कित्येक वर्षे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाविरोधात लढलो आहोत तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणे अयोग्य असल्याचे मत गुरुदास कामत यांनी मांडले. हा शिवसेना आणि भाजपमधील मुद्दा आहे आपण त्यामध्ये पडता कामा नये, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेनी आपला पाठिंबा मागितला होता असे विधान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे. काही अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदत घेऊन आपण देखील महापौर पदावर आपला दावा सांगणार आहोत असे निरुपम यांनी म्हटले आहे. त्यांनी असे केल्यास अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा शिवसेनेलाच होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला फायदा होईल असे वागू नये असे गुरुदास कामत यांनी म्हटले आहे. गेली कित्येक वर्षे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या जातीयवादी पक्षांच्या विरोधात आपण लढलो त्यांना आपण सहकार्य करू नये असे कामत यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.