राज्य सरकार पडल्यास मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी  भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याच्या शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. राज्य सरकार पडले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे. त्याची एक प्रत मी राज्यपालांनाही देईन. मग उद्धव ठाकरे यांनीदेखील आमचा राज्य सरकारला पाठिंबा नाही, असे लेखी स्वरूपात राज्यपालांना द्यावे. उद्धव यांनी याबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे, असे पवारांनी म्हटले.

यावेळी त्यांनी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही पुन्हा एकदा टीका केली. नोटाबंदीमुळे लघुद्योग आणि रोजगार क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आहेत, असे त्यांनी म्हटले. तसेच पारदर्शकतेची भाषा करणारा भाजप महानगरपालिका निवडणुकांमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च करत असल्याची टीकाही यावेळी पवार यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सूचक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर आपण पाठिंबा देणार काय असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी पवारांना विचारला होता. यावर आपण जर तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही असे म्हणत , त्यांना चर्चा करू द्या, त्यानंतर कुणी चर्चेला आल्यास विचार करू , असे उत्तर पवार यांनी दिले होते. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याची जाहीर कबुली दिली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देईल, अशी चर्चा रंगली होती.