सकाळच्या सत्रात पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने असणारा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचा नूर पूर्णपणे पालटला आहे. या निकालांनंतर मुंबईत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी भाजपने मिळवलेले यश हे अचंबित करणारे आहे. मुंबईतील शिवसेनेची आजपर्यंतची मक्तेदारी पाहता हे निकाल शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मुंबई म्हणजे शिवसेनाच या गेल्या कित्येक वर्षांच्या गृहीतकाला तडा गेला आहे.

पुण्यात ‘कमळ’ फुलले; राष्ट्रवादीच्या घड्याळाची ‘टिकटिक’ बंद

आज सकाळी निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली तेव्हा शिवसेनेने भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतरही सेनेची घौडदौड वेगाने सुरू होती. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचाच महापौर बसेल अशा चर्चांनाही सुरूवात झाली होती. मात्र, दुपारच्या सत्रात हे चित्र धक्कादायकरित्या पालटले. ९० जागांवर आघाडी घेतल्यानंतर शिवसेनेचा विजयरथ रुतून बसला. याच काळात निकालाचे पारडे भाजपच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार २२६ वॉर्डचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये शिवसेनेला ८४, भाजप ८१, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला आहे. या निकालांमुळे ‘शिवसेनेने बोलून दाखवलं आणि भाजपने करुन दाखवलं’, अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ ही मॅजिक फिगर आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये अवघ्या तीन जागांचा फरक असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न होतील.

..तर युतीसाठी सेनेने पुढे यावे!

मागील निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेसोबत युती करून लढली होती. त्यावेळी भाजपला ३१ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आजच्या निकालांनंतर भाजपच्या संख्याबळात लक्षणीय वाढ झाली असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या ८१ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे शिवसेनेचा स्वबळावर लढण्याच निर्णय भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडे समसमान जागांची मागणी केली होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी नाकारत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी उद्धव यांनी भाजपशी काडीमोडही घेतला होता. त्यानंतरच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीला जाऊन आरोप केले होते. या सगळ्या लढाईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने उतरले होते. त्यामुळे या निकालांच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे भवितव्य पणाला लागले होते.