मुंबईत शाहिस्तेखानाची बोटं छाटली, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपवर निशाणा साधला आहे. आज सकाळपासून मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यापासूनच शिवसेनेने दमदार आघाडी घेतली होती. सध्याच्या परिस्थितीवरून शिवसेना मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरणार हे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. मुंबईतील निकाल हे भाजपसाठी धक्कादायक आहेत. हा सेनेचा दिग्विजय आहे. विरोधी पारदर्शक असावा लागतो. मुंबईत शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, दादरमधील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांच्या जल्लोषाला सुरूवात झाली आहे. या कार्यकर्त्यांकडून ‘कमळाबाई हरली’, ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची’, अशा घोषणाही दिल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या शिवसेना दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. शिवसेना मुंबईतील सर्वात मोठा पक्ष बनेल, हे निश्चित झाले आहे. याशिवाय, अशाचप्रकारे घौडदौड सुरू राहिल्यास शिवसेना बहुमत गाठण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेच्या अनेक तगड्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे आणि विद्यमान नगरसेविका भारती बावदाणे, मिनल जुवाटकर यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकर शिवसेनेला साथ देत भाजपला औकात दाखवणार का भाजपच्या पारदर्शकतेच्या हाकेला प्रतिसाद देत परिवर्तन घडवून आणणार, याची उत्सुकता तमाम राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे. मुंबईतील या निकालाच्या निमित्ताने आगामी काळातील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक राजकीय समीकरणांची दिशा निश्चित होणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांसाठी आजचे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.