मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मी नाशिकला दत्तक घेणार. पण ज्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतले ते नाशिकला काय दत्तक घेणार असा खोचक सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. नोटाबंदी फक्त जनतेसाठी असून पैसा मात्र भाजपकडे आहे. जाहिरातींवर भाजप कोट्यावधी रुपये खर्च करत असून हे पैसे आले कुठून असा सवालच त्यांनी भाजपला विचारला.

दादरमधील कबुतरखाना परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी प्रचारसभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. दादरमधील सभेसाठी मैदान मिळावे यासाठी मनसेचे प्रयत्न सुरु होते. पण ते मैदान शिवसेनेने सभेसाठी घेऊन ठेवल्याने मनसेला मैदान मिळाले नव्हते. या घटनेचा दाखला देत राज ठाकरेंनी सभेतील भाषणाला सुरुवात केली. शिवसेनेने मैदानाच्या बाबतीत अडवणूक केली पण म्हणून आम्ही सभा घेणं थांबवतो का? मनसेची सभा म्हटल्यावर कुठेही गर्दी होणारच असे राज ठाकरे यांनी सांगितले.  गेल्या २५ वर्षात शिवसेना आणि भाजपने काय काम केले हे सांगितले नाही. अजूनही ते काय करणार हे सांगतात. सध्या ते फक्त भांडतात, एकमेकांची अब्रू काढतात, पण हे भांडण फक्त जनतेला दाखवण्यासाठी असल्याचा दावा ठाकरेंनी केला.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची स्थिती वाईट आहे, केईएमसारख्या रुग्णालयात आयसीयू नाही. शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मग गेल्या २५ वर्षांत तुम्ही हे काम केले का असा सवालच त्यांनी उपस्थित केला. महापालिकेत नोकर भरती होते, यामध्येही तुम्ही परप्रांतातील तरुणांना नोकरी देता, सत्ताधारी शिवसेना – भाजपला मुंबई, महाराष्ट्रातील तरुण दिसले नाही का ?, महापालिकेतील कंत्राटदारही परप्रांतातील आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे मोदींवर भाषण करतात, पण त्यांचा महापालिकेशी काय संबंध. शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात मोदींनी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही बघितले नाही. त्याचवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे होते किंवा बोटीतून उडी मारायला हवी होती असा चिमटा त्यांनी काढला. मुंबईतील एवढ्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या,पण बाळासाहेबांच्या स्मारकासाठी यांना एक जागा मिळत नाही?, सेनेचा महापौर बंगल्यावर डोळा आहे असा आरोप त्यांनी केला.

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला गर्दी न झाल्याने मुख्यमंत्री सभा न घेताच पिंपरी चिंचवडला रवाना झाले. यावरुनही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत माणसं होती, पण त्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे त्यांना गर्दी दिसली नाही आणि ते न बोलता परत गेले असा टोला त्यांनी लगावला.

Live Updates
20:56 (IST) 18 Feb 2017
मुंबईसारख्या शहरातील लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाही हे दुर्दैव - राज ठाकरे
20:33 (IST) 18 Feb 2017
नाशिकमध्ये पाच वर्षात जे काम केलं त्या आधारे आम्ही मुंबईकरांकडे मत मागणार - राज ठाकरे
20:32 (IST) 18 Feb 2017
भाजप, शिवसेना कोट्यावधी रुपये जाहिरातींवर खर्च करत आहे, पण हा पैसे येतो कुठून ? - राज ठाकरे
20:28 (IST) 18 Feb 2017
नाशिकमध्ये रस्ते बांधताना टक्केवारी नाही घेतले म्हणून ते उत्कृष्ट दर्जाचे झालेत, तिथे कुठेही खड्डे नाहीत: राज ठाकरे
20:24 (IST) 18 Feb 2017
शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री - राज ठाकरे यांचा भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर निशाणा
20:23 (IST) 18 Feb 2017
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा मुंबईतील महापौर बंगल्यावर डोळा - राज ठाकरे
20:23 (IST) 18 Feb 2017
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दुसरी जागा मिळत नाही का ? - राज ठाकरे