मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या ८ मार्चला निवडणूक होणार आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर महापौरपदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणूक तारखेत बदल करण्यात आला आहे. ८ मार्चला दुपारी १२ वाजता महापौरांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, याआधी मुंबईच्या महापौरपदासाठी ९ मार्चला निवडणूक होणार होती.

मुंबईच्या महापौर कोणत्या पक्षाला असेल, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. राज्यासह देशातील राजकीय वर्तुळाचेही त्याकडे लक्ष लागले आहे. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक ९ मार्चला होणार होती. मात्र, निवडणुकीच्या तारखेत आता बदल करण्यात आला आहे. महापौरपदाची निवडणूक ८ मार्चला होणार आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आलेला आहे. महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज ४ मार्च रोजी भरता येणार आहे. तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च रोजी निवडीपूर्वी काही तास आधी अर्ज मागे घेता येणार आहे. दरम्यान, २०१२ साली निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत ८ मार्च रोजी संपत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या दिवशी ते तांत्रिकदृष्ट्या पदावर असतील. त्यांना या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. कारण चिटणीस विभागाकडून त्यांना सभागृहाच्या बैठकीसाठी निमंत्रणच पाठवले जाणार नाही. यावर्षी निवडून आलेल्या नगरसेवकांनाच बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेने मात्र, जुन्या सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीच महापौरपदासाठी निवडणूक घेण्यावर आक्षेप घेतला आहे. ८ मार्चला निवडणूक घेतल्यास जुने नगरसेवकही मतदानाचा अधिकार मागू शकतात. त्यामुळे प्रशासकीय पेच निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने तोडगा काढला असून, ८ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी जुन्या नगरसेवकांना सभागृह बैठकीचे निमंत्रणच पाठवण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईचा महापौर आमचाच होईल, असा दावा शिवसेना आणि भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे महापौर कोणत्या पक्षाचा होईल, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, मनसे ७, एमआयएम ३ तर समाजवादी पक्ष ६ आणि अखिल भारतीय सेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. ८४ उमेदवार निवडून आलेला शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ भाजप आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.