मुंबई शहराध्यक्ष आशीष शेलार यांचा विश्वास

महापालिका निवडणुकीत भाजपला मुंबईतील प्रत्येक विभागात आणि जातीधर्माकडून प्रतिसाद मिळाला, तो पाहता आम्ही समाधानी असून २०१९ च्या निवडणुकीसाठी मुंबईचे दरवाजे खुले झाले, असे मत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना व्यक्त केले. महापौर निवडणुकीसाठी आकडय़ांची जमवाजमव करण्याचे प्रयत्न शिवसेना-भाजपकडून सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची रणनीती काय, असे विचारले असता, महापौरपदाची निवडणूक लढवायची किंवा नाही, याचा निर्णयही पक्षाची सुकाणू समिती घेईल, असे स्पष्ट केले.

भाजपने मुंबईत बहुमत मिळविण्याचा केलेला दावा यशस्वी झाला नसला, तरी दणदणीत यश मिळविल्याच्या पाश्र्वभूमीवर शेलार यांनी निवडणुकीचा आढावा घेत पुढील रणनीतीबाबतही मते व्यक्त केली. बहुमताचा दावा करताना माझ्याकडून काही धोरण ठरविताना वैयक्तिकरीत्या चूक झाली असावी,     मात्र पक्षाने कोणतीही चूक न करता दमदारपणे वाटचाल केली, असे सांगितले. प्रत्येक मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, गुजरातीसह सर्व समाजघटकांनी भरभरून पािठबा दिला. त्यामुळे ही २०१९ च्या निवडणुकीची तयारीच झाली असून मुंबईचे दरवाजे आम्हाला खुले झाले, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. भाजपला मिळालेला कौल हा जनतेने दिलेला शिवसेनाविरोधातील कौल आहे का आणि त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत व सत्तेत शिवसेनेबरोबर सहभागी होण्यात अडचण होईल का, असे विचारता आम्ही जनतेकडे कोणत्याही पक्षाविरोधात मते मागितली नाहीत, असा दावा शेलार यांनी केला. महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आम्ही आवाज उठविला, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराची मागणी केली. त्या भूमिकेला जनतेने पाठिंबा दिला. त्यामुळे आम्हाला मिळालेली मते ही कोणत्याही पक्षाविरोधात असल्याचे आम्ही मानत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ व विकासाभिमुख कारभाराला, नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे, असे ते म्हणाले. सत्तेत सहभागी होण्यासाठी आम्ही कोणालाही विचारणा केलेली नाही . पारदर्शी कारभार व भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणतीही तडजोड करणार नाही, असे आशीष शेलार यांनी  यांनी स्पष्ट केले.