महापौरपद शिवसेनेला, ‘स्थायी’ भाजपला; फाटाफूट टाळण्यासाठी सेना सावध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेबाबत सबुरीचा सल्ला दिल्यावर भाजपकडून आता ‘तह’ करण्यासाठी शिवसेनेला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. महापौरपद शिवसेनेला देण्याच्या बदल्यात भाजपला स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची मागणी करण्यात येणार आहे. शिवसेनेने ते समझोत्यामध्ये न दिल्यास राजकीय खेळी करुन धोबीपछाड टाकण्याचाही भाजपचा विचार आहे. मात्र, महापौर व स्थायी समिती अध्यक्षपदाबाबत शिवसेना भाजपशी कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. त्यामुळे शिवसेनेला निवडणुकीत बऱ्यापैकी धूळ चारूनही मिळतील त्या समित्या पदरात पाडून घेऊन व अपमान सहन करून सरकार टिकविण्याची धडपड भाजप करणार, की शिवसेनेला अद्दल घडविणार, हे सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. याबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार मोदी यांनी फडणवीस यांना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

भाजपने शिवसेनेला मुंबईसह राज्यात चांगलाच दणका दिला आहे. तो सध्या पुरेसा आहे. भाजपचा महापौर मुंबईत बसविल्यास ते शिवसेनेला चांगलेच झोंबेल व सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे शिवसेनेला एकदम मोठा झटका देण्यापेक्षा गरजेनुसार असे धक्के देत भाजपची ताकद वाढवावी आणि पुढील दोन-अडीच वर्षे सरकारही टिकवावे, त्यासाठी शिवसेनेला भाजपच्या फायद्यासाठी वापरुन घ्यावे, अशी धोरणी खेळी भाजपकडून खेळली जाणार आहे. त्यासाठी महापौरपदावरचा आग्रह सोडून त्या बदल्यात स्थायी समिती अध्यक्षपद मागून किंवा मिळवून महापालिकेच्या आर्थिक नाडय़ा आपल्या ताब्यात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील.

मोदी यांच्या सल्ल्यानंतर समेटाचा प्रयत्न म्हणून भाजपकडून शिवसेनेला समेटाचा प्रस्ताव पाठविला जाईल व शिवसेनेच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल. स्थायी समिती अध्यक्षपद दिल्यास भाजप महापौरपदाची निवडणूक न लढविण्याचीही शक्यता आहे. मात्र भाजपशी कोणतीही तडजोड करण्याची शिवसेनेची तयारी नाही. आतापर्यंत असे काही प्रस्ताव आले आहेत. अडीच वर्षे महापौरपद व स्थायी समिती अध्यक्षपद वाटून घेण्याचे प्रस्ताव काही नवीन नाहीत. शिवसेना स्वबळावरच ही पदे मिळविणार असल्याने भाजपची गरजच नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

भाजपचा अवमान होणार

सरकार टिकविण्यासाठी भाजपने शिवसेनेशी समेटाची बोलणी सुरु केली तर भाजपला अवमानास्पद वागणूक किंवा टिप्पण्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस, खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपत्ती, पैसा यावरच घाव घातल्याने व शिवसेना संपविण्याचे प्रयत्न केल्याने आता ठाकरे हे तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे या निवडणुका समेट घडवून पार पडल्यानंतरही भाजपला शिवसेनेकडून होणाऱ्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

शिवसेनेचे संख्याबळ ८९वर

शिवसेनेचे संख्याबळ ८९वर गेले असून कोणताही धोका होऊ नये यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी आघाडीची नोंदणी करण्यात आली आहे.  शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले. आता पाच अपक्ष सेनेच्या गळाला लागलेले आहेत. भाजपकडून अपक्षांची पळवापळवी होऊ नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून शिवसेनेने या अपक्षांचा पाठिंबा आपल्यालाच आहे, अशी नोंद विभागीय आयुक्तांकडे केली. त्यामुळे या अपक्षांना महापौर निवडीत शिवसेनेलाच मतदान करणे भाग पडणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेल.