भाजपकडून सर्वाधिक पक्षबदलूंना संधी, शिवसेनेचा दुसरा क्रमांक

सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षांतर केलेल्या, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता स्वच्छ, प्रामाणिक आणि निष्कलंक उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन केले जात असले तरी निवडून देणार तरी कोणाला, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद ठरलेला नाही! राज्यात सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या अनेकांना ‘पवित्र’ करून उमेदवारी दिली असून, त्यातील शंभराहून अधिक उमेदवारांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्याचबरोबर कोणताही विधिनिषेध न बाळगता, विचारनिष्ठेला तिलांजली देत पक्षांतर करणाऱ्या अनेक तथाकथित नेत्यांनाही सर्वच पक्षांनी तिकिट दिले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्यामुळे भाजप हेच अशा आयाराम-गयारामांचे सध्याचे ‘तीर्थक्षेत्र’ ठरले आहे. ‘लोकसत्ता’च्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी जमविलेल्या माहितीवरून या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक आयारामांना पावन केले आहे, तर त्याहून निम्म्या आयारामांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

‘लोकसत्ता’ने राज्यभरातून गोळा केलेल्या आयाराम-गयारामांच्या या प्राथमिक यादीवरून भाजपने सर्वाधिक आयारामांना उमेदवारी दिली ती काँग्रेसमधील. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या १० जणांना तिकिटे देण्यात आली असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस (९) आणि शिवसेना (५) यांचा क्रमांक लागतो.

अन्य पक्षांतून येऊन शिवसेनेची उमेदवारी मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या ११ एवढी आहे, तर भाजप सोडून अन्य पक्षांची उमेदवारी मिळविण्याची हिकमत सहा जणांनी साधली आहे. यात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या दोघांचा समावेश आहे.

मुंबई

देवेंद्र आंबेरकर (माजी विरोधी पक्षनेते) – काँग्रेसमधून शिवसेना, वकारुन्निसा अन्सारी – काँग्रेसमधून एएमआयएम, नाना आंबोले – शिवसेनेतून भाजप, प्रभाकर शिंदे (माजी सभागृह नेते) – शिवसेनेतून भाजप, दिनेश पांचाळ – शिवसेनेतून भाजप, प्रकाश पाटणकर – मनसेतून शिवसेना

ठाणे

अशोक राऊळ, माजी महापौर – राष्ट्रवादीतून भाजप, नारायण पवार – काँग्रेसमधून भाजप, भरत चव्हाण – राष्ट्रवादीतून भाजप, मनोहर डुंबरे – राष्ट्रवादीतून भाजप, योगेश जानकर – राष्ट्रवादीतून शिवसेना, मालती पाटील – शिवसेनेतून भाजप

नागपूर

यशश्री नंदनवार – काँग्रेसमधून भाजप, प्रगती पाटील – राष्ट्रवादीमधून भाजप, अनिल धावडे – भाजपमधून शिवसेना, अतुल सेनाड – भाजपमधून बसप, अनिता वानखेडे – भाजपमधून शिवसेना, विशाखा जोशी (भाजप महिला आघाडी पदाधिकारी) – भाजपमधून शिवसेना, मुरलीधर मेश्राम – बसपमधून राष्ट्रवादी, मुकुंद बापट – भाजपमधून शिवसेना, मालती मामीडवार – भाजपमधून शिवसेना, रामदास गुडधे – भाजपमधून शिवसेना, किशोर गजभिये – बसपमधून काँग्रेस, रमेश पुणेकर – भाजपमधून काँग्रेस, भावना ढाकणे – भारिप बहुजन महासंघातून काँग्रेस, यशस्वी नंदनवार-हेडाऊ – काँग्रेसमधून भाजप

कोकण

रमेश कदम (माजी आमदार) – राष्ट्रवादीतून भाजप, तसेच  खेड तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारीही दिली आहे.