मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना बहुमत मिळालेले नाही. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्ष युती करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण सध्या तरी मी युतीचा विचार केलेला नाही असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना भाजपसोबत युती करणार का असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या आम्ही आनंदात आहोत. मुंबईकर जनतेने सलग पाचव्यांदा एकाच पक्षावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आनंदात आहेत. आम्हाला मुंबईकर जनतेचे ऋण फेडायचे आहे. सध्या तरी आम्ही युतीचा कोणताही विचार केलेला नाही असे त्यांनी सांगितले.

शिवसेना बहुमताचा आकडा कसा गाठणार, भाजपशिवाय सत्ता स्थापन करणार असा प्रश्नांचा भडीमारही त्यांच्यावर होत होता. मात्र या सर्व प्रश्नांवर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. सेनेला ८४ तर भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला आहे. २२३ जागा असलेल्या मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ११४ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे.  दोन अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने शिवसेनेचे संख्याबळ ८६ वर पोहोचले आहे. हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे बंडखोर उमेदवार होते. तर आणखी एक अपक्ष नगरसेवकही शिवसेनेच्या गळाला लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये रक्ताचे नाते आहे. दोघांच्या रक्तात हिंदूत्वच असल्याने या दोघांनी एकत्र यायला पाहिजे असे ते म्हणालेत. दोघांनी एकत्र यावे यासाठी मी प्रयत्न करणार असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.