महानगर पालिकांचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रतिष्ठेच्या अशा मुंबई महानगरपालिकेत मोठा पक्ष ठरत असल्याचे दिसत आहे. युती तोडून स्वबळाचा नारा दिलेल्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत मुसंडी मारत भाजपचे सत्ता काबिज करण्याचे मनसुबे फोल ठरवले आहेत. शिवसेनेची शतकी आघाडीकडे वाटचाल सुरू असून मुंबापुरीत शिवसैनिकांनी जल्लोषाला देखील सुरूवात केली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालांची हवा सोशल मीडियावरही दिसत आहे. ट्विटरवर शिवसेनेचीच लाट दिसत असून शिवसेनेचा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आला आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात खरा कलगीतुरा रंगला. मुंबईत शिवसेना आणि भाजप यांच्यातच खरी लढत असल्याचे स्पष्ट चित्र होते. काँग्रेस-राष्ट्रवादी स्पर्धेच कुठेच नव्हते. मतदानोत्तर चाचणीनंतर शिवसेनेने ११० जागांवर यश मिळेल असा दावा केला होता. निकालाच्या दिवशी शिवसेनेने केलेले भाकीत खरे ठरत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या विजयी घोडदौडीवर नेटिझन्स मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. शिवसेनेचा हॅशटॅग वापरून आतापर्यंत आठ हजारांहून अधिक ट्विट्स केले गेले आहेत. तर फेसबुकवरही शिवसैनिकांचे भाजपवर कुरोघोडी केल्याचे स्टेटस अपडेट होताना दिसत आहेत.