मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर होईल असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेनेच्या भवितव्याबाबत चर्चा केली. मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तेव्हा मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर होईल असे ते म्हणाले. शिवसेना नेमकं कुणाची मदत घेणार, कुणाशी युती करणार या प्रश्नांच्या उत्तरांना त्यांनी बगल दिली. ज्या दिवशी महापौरपदासाठी महानगर पालिकेमध्ये मतदान होईल त्या दिवशी शिवसेनेच्याच उमेदवारीची निवड महापौरपदी होईल असे ते म्हणाले. महापौरपदासाठी महानगर पालिकेमध्ये हात वर करुन मतदान होत असते. त्यावेळी जो पक्ष किंवा जो उमेदवार आमच्या बाजूने हात वर करुन मतदान करेल तो आमचा मित्र राहील असे त्यांनी यावेळी म्हटले. भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी शिवेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र यावे असे म्हटले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी ही गोष्ट बोलण्यास उशीर केला आहे असे ते म्हणाले.

सध्या युती तुटली आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यावर भाष्य करुन आता उपयोग नसल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये ११ लाख मतदारांना मतदान करता आले नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका बाजूला निवडणुकीबाबत जनजागृती व्हावी म्हणून निवडणूक आयोग कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येत नाहीये हा मोठा विरोधाभास असल्याचे त्यांनी म्हटले.  भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळेच आम्हाला आमच्या सामर्थ्याची कल्पना झाल्याचे त्यांनी म्हटले. आमचे यावेळी जास्त उमेदवार निवडून आले आहेत. तसेच ज्या भागात आतापर्यंत आमचा नगरसेवक कधीही निवडून आला नव्हता त्याही भागात आमचे नगरसेवक निवडून आल्याचे त्यांनी म्हटले. बेहरामपाड्यामध्ये शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आहे. त्या उमेदवाराची ही पहिलीच निवडणूक होती तरीदेखील तो त्याच्या चांगल्या कामाच्या जोरावर निवडून आला. शिवसेनेनी त्याला उमेदवारी देताना तो मुस्लीम आहे की हिंदू हे न पाहता उमेदवारी दिली असल्याचे ते म्हणाले.