निवडणुकीत शहरातील ७५६ भाग संवेदनशील; २३ केंद्रांवर मतमोजणी

मुंबई महापालिका नवडणुकीसाठीचे मतदान दोन दिवसांवर असले तरी रविवारपासून गुरुवापर्यंतचे पाच दिवस मुंबई पोलिसांसाठी अत्यंत जिकिरीचे आहेत. रविवारी संध्याकाळी पाचनंतर प्रचार तोफा थंडावतील. त्यानंतर मतदान संपेपर्यंत पोलिसांना छुपा प्रचार, मतदारांना दाखवली जाणारी विविध प्रलोभने रोखण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींवर करडी नजर ठेवावी लागेल.

एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे शहरावरील दहशतवादी हल्ल्याची किंवा गंभीर गुन्ह्य़ांची टांगती तलवार कायम असल्याने पोलिसांना तिथेही दुर्लक्ष करून चालणारे नाही. त्यामुळे पुढले पाच दिवस मुंबई पोलीस दलावर अधिकचा ताण असेल.

मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शहरातील ७५६ भाग संवेदनशील ठरविण्यात आले आहेत. याआधीच्या निवडणुकांमध्ये घडलेले गुन्हे, घटना, प्रभागातील तुल्यबळ उमेदवारांमधील चुरशीच्या-अटीतटीच्या लढती, पक्षीय वर्चस्व, उमेदवार आणि समाज अशा विविध पातळ्यांवर हे भाग संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले. रविवारी संध्याकाळी प्रचार थांबल्यानंतर पोलिसांचे खरे काम सुरू होईल, असे हा अधिकारी सांगतो. आतापर्यंत आयोगाची परवानगी घेऊन प्रचार सुरू होता. पण रविवारी संध्याकाळनंतर मतदान संपेपर्यंत छुपा प्रचार सुरू होईल. या अडीच दिवसांमध्ये मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पैसे किंवा अन्य वस्तूंचे वाटप केले जाते, हा याआधीच्या निवडणुकांचा अनुभव आहे. तसेच मतदानाला उतरा किंवा उतरू नका यासाठी मतदारांवर दबाव आणणे असेही प्रकार घडतात. यापैकी कोणताही प्रकार न घडू देता, मोकळ्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी याची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर असते.

गुरुवारी २३ केंद्रांवर २२७ प्रभागांची मतमोजणी होईल. गुरुवारी जादाचा बंदोबस्त प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर असेल. तसेच संवेदनशील भागांमध्येही तेवढाच बंदोबस्त जोडून दिला जाईल. शहरातील महत्त्वाची, सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त कायम असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.