मुंबई, ठाण्यासह १० महानगरपालिका ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. राज्यात सर्वत्र पोलीस फौजफाटा सज्ज असून सुरक्षेच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली पण तासाभरानंतर राज्यात ठिकठिकाणी मतदार यादीतील घोळाच्या बातम्या समोर येण्यास सुरूवात झाली आहे.

वाचा: मुंबई महापालिका निवडणुकीचे सर्व अपडेट्स

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना निवडणुक विभागाकडून वाटप करण्यात आलेल्या ‘व्होटर स्लिप’वर मतदान केंद्राचा क्रमांक नसल्याने मतदारांचे हाल झालेले पाहायला मिळत आहेत. मुंबईतील चारकोप भागात असा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. व्होटर स्लिपवर मतदान केंद्राचा क्रमांक नसल्याने अनेक मतदारांना आपले मतदान केंद्र शोधताना त्रास सहन करावा लागत आहे. काही मतदान केंद्रांबाहेर निवडणुक विभागाचे अधिकार माहिती देण्यासाठी उपलब्ध नसल्याचे समजते. पालिकेच्या निवडणुक विभागाच्या मतदारांची माहिती शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या वेबसाईटची माहिती देखील लोकांपर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे मतदार राजा संतापलेला पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, नागपूरमध्ये काही ठिकाणी मतदारांचे नाव यादीत आहे. पण मतदान केंद्रावर ऑनलाईन नाव मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मतदान केंद्रावरच मतदार आणि निवडणुक अधिकाऱयांमध्ये वाद सुरू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. नागपूरच्या जी.एस महाविद्यालयासह अनेक मतदान केंद्रांवर व्हिलचेअर नसल्याने वृद्धांना मतदान करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.