मुंबई महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबईच्या काँग्रेस नेत्यांनी घराबाहेर पडणे टाळले. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही माध्यमांना घरी बोलावून प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयातही सकाळपासून शांतता होती. कार्यालयात चार ते पाच कर्मचारी सोडले तर कोणीही नव्हते. सकाळपासून या कार्यालयात एकही नेता, पदाधिकारी किंवा निवडून आलेले उमेदवार यापैकी कोणीही फिरकलेले नाही, अशी माहिती या कर्मचाऱ्यांकडून मिळाली.

याबाबत विचारले असता हातवाऱ्यांनीच कोण येणार, अशी प्रतिक्रिया देत कर्मचारी काहीही बोलायला तयार नव्हते.  निवडणुकीत धुव्वा उडाल्याचे स्पष्ट प्रतिबिंब काँग्रेसच्या कार्यालयात दिसत होते.

मनसेमध्ये सारे कसे शांत शांत..

मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि ‘शोले’ तील ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ या संवादाची आठवण झाली.. मनसेच्या ‘राजा’ला कोणीच ‘साथ’ दिली नाही. पक्षाच्या दादरमधील मुख्यालयात- ‘राजगडा’वर मुळातच तुरळक उपस्थिती होती. निकाल जाहीर झाले, दादरमध्येही मनसे भुईसपाट झाल्याच्या बातम्या आल्या आणि मनसेत सारे कसे शांत शांत झाले. ‘कृष्णकुंज’च्या बाहेरही शांतता होती.

मुंबईतील मनसेच्या मुख्यालयाबाहेर मुळातच फारसे कार्यकर्ते उपस्थित नव्हते. कारण चित्र निवडणुकीपूर्वीच स्पष्ट होते. राज ठाकरे यांनी मुलाच्या आजारपणामुळे प्रचाराला शेवटच्या टप्प्यात सुरुवात केली. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकमध्ये सभा घेतत्या. नेहमीप्रमाणे आक्रमक भाषणे केली, देवेंद्र फडणवीसांची नक्कल केली, सभांना गर्दीही चांगली झाली त्यामुळे थोडी धुगधुगी निर्माण झाली खरी, मात्र ती मतपेटीत फारशी प्रतिबिंबित झाली नाही. दादरचा शिवसेनेचा जिंकलेला बालेकिल्ला भुईसपाट झाला तसा ‘राजगडा’वर शुकशुकाट पसरला. दादरमध्ये मनसेचे सहाही उमेदवार पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली.