राज्यातील दहा महानगर पालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी गुरूवारी होत आहे. महापालिका निवडणुकीत सर्वात प्रतिष्ठेची समजली गेलेली मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. युती संपुष्टात आल्यानंतर पालिकेतील सत्ता राखण्यात शिवसेनेला यश येणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर मनसेने शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा पुढाकार घेतला होता. पण शिवसेनेकडून त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळीसाठी दिलेला हात पुन्हा मागे केला. मुंबईत सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने सर्वच पक्षांची खरी ताकद यावेळी कळेल. भाजपला रोखण्यासाठी मुंबईत राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त करण्यात येत होती. त्यासाठी मनसेचे बाळा नांदगावर यांनीही प्रयत्न केले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनीही याआधी दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला होता. मराठी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी दोघांनी एकत्र यावे अशी सामाजिक भावना व्यक्त केली गेली. मुंबईच्या निकालात शिवसेना मोठा पक्ष ठरला आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी काही जागांची गरज असताना सेना मनसेशी हात मिळवणी करणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण मनोहर जोशी यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेला पूर्णविराम दिला आहे. शिवसेनेला नक्की यश येईल यात शंका नाही, पण राज आणि उद्धव एकत्र येणे अशक्य आहे, असे मनोहर जोशी म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून प्राथमिक कलानुसार शिवसेना आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर भाजप दुसऱया क्रमांकाचा पक्ष ठरत असल्याचे दिसत आहे.