३४ जागांपैकी १८ जागा सेनेकडे ;  दादरमध्ये मात्र निर्भेळ यश नाहीच

दक्षिण मध्य मुंबई</strong>

मुंबईतील मोठय़ा लोकसभा मतदारसंघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आणि १९८९ पासून केवळ २००९ लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा ५० टक्के फडकला. सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या भागात एकूण ३४ प्रभाग होते. या ३४ पैकी १८ प्रभागांमध्ये सेनेचा भगवा फडकला. विशेष म्हणजे यापैकी धारावी विधानसभा मतदारसंघातील सहापैकी तीन जागांवर शिवसेनेने विजय मिळवत धारावीत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. या भागातील अनेक लढती चुरशीच्या होत्या. या चुरशीच्या लढतींमध्येही शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसत आहे. सेनेखालोखाल सात जागांवर विजय मिळवत भाजपने मुसंडी मारली आहे.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चेंबूर, अणुशक्ती नगर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि दादर-माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा मतदारसंघांमध्ये मिळून यंदा पालिकेचे ३४ प्रभाग होते. सध्या या सहापैकी अणुशक्ती नगर, चेंबूर आणि माहीम या तीन ठिकाणी सेनेचे आमदार असून काँग्रेसकडे धारावी आणि वडाळा हे दोन मतदारसंघ होते. भाजपने सायन कोळीवाडा काबीज केला होता. या मतदारसंघांचा विचार करता संमिश्र परिस्थिती आहे.

चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागांमध्ये असलेल्या ११ जागांपैकी पाच जागा शिवसेनेला मिळाल्या. या जागांपैकी १४४ क्रमांकाच्या प्रभागात खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना भाजपच्या अनिता पांचाळ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हा सेनेसाठी धक्का म्हणता येईल. प्रभाग क्रमांक १५० मधून संगीता हंडोरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रभावामुळे ही लढत चुरशीची मानली जात होती. या भागातील १४५ क्रमांकातून एमआयएमच्या शहानवाझ शेख यांनी बाजी मारली आहे.

पक्षनिहाय नगरसेवक

शिवसेना : ऋतुजा तिवारी, समृद्धी काते, निधी शिंदे, अनिल पाटणकर, श्रीकांत शेटय़े, प्रल्हाद ठोंबरे, मंगेश सातमकर, अमेय घोले, स्मिता गावकर, माधुरी डोके, जगदीश येवलपिल, वसंत नकाशे, मारिअम्मल थेवर, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, प्रीती पाटणकर, ऊर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर.

भाजप : अनिता पांचाळ, आशा मराठे, महादेव शिगवण, राजश्री शिरवडकर, कृष्णावेन्नी रेड्डी, नेहल शहा.

काँग्रेस : संगीता हंडोरे, रवी राजा, नियाझ बानू, गंगा माने, बब्बू खान, सुप्रिया मोरे

एमआयएम : शहानवाझ शेख.

सपा : आयशा शेख.

मनसे : हर्षला मोरे.

राष्ट्रवादी : रेशमबानो खान.

चुरशीच्या लढती

वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८ मध्ये शिवसेनेचे अमेय घोले, काँग्रेसचे जनार्दन किर्दत आणि काँग्रेसचे बंडखोर रमाकांत थवई या तिघांमध्ये चुरशीची लढत होती. या लढतीत काँग्रेसच्या बंडखोर रमाकांत थवई यांच्यामुळे जनार्दन किर्दत यांची मते कमी झाली. या लढतीत अमेय घोले यांनी बाजी मारली.

दादरमध्ये १९१ प्रभागात स्वप्ना देशपांडे या मनसेच्या उमेदवार आणि सेनेच्या विशाखा राऊत यांच्यात जोरदार लढत अपेक्षित होती. विद्यमान नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या आक्रमक प्रचारामुळे आणि राज ठाकरे यांच्या सभेमुळे स्वप्ना देशपांडे यांचे पारडे जड मानले जात होते; पण दादरकरांनी विशाखा राऊत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची निवड केली.

प्रभादेवी येथील प्रभाग क्रमांक १९४ मध्ये शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना सेनेतून तिकीट देण्यात आले होते. त्याविरोधात सरवणकर यांचे निकटवर्तीय महेश सावंत यांनी बंड करत उमेदवारी दाखल केली. तसेच या प्रभागातील विद्यमान नगरसेवक संतोष धुरी यांचे कडवे आव्हान होते. उद्धव ठाकरे यांच्या सामना चौकातील सभेनंतर सरवणकर यांचे पारडे जड झाले होते. मतदारांनीही या पारडय़ात मते टाकत सरवणकर यांचा विजय निश्चित केला.